नव्या वर्षात नवे निर्बंध…आता उपस्थिती फक्त 50 ; प्रशासनाचा निर्णय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नव्या वर्षात नवे निर्बंध…आता उपस्थिती फक्त 50 ; प्रशासनाचा निर्णय

. अहमदनगर/प्रतिनिधी : कोरोनाची तिसरी लाट व त्याचबरोबर ओमायक्रॉन या नव्या विषाणूच्या प्रादुर्भावाचे संकट नव्याने गडद होऊ लागले आहे. परिणामी, जिल्हा

प्रवरा नदी पात्रातून दोन मृतदेह सापडले ; मृतांची संख्या सहा
दहावीच्या परीक्षेत प्रवरेच्या 14 शाळाचा शंभर टक्के निकाल
संवत्सर येथील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्रा विषयी मार्गदर्शन

.

अहमदनगर/प्रतिनिधी : कोरोनाची तिसरी लाट व त्याचबरोबर ओमायक्रॉन या नव्या विषाणूच्या प्रादुर्भावाचे संकट नव्याने गडद होऊ लागले आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाने नव्या वर्षापासून नवे निर्बंध जारी केले आहेत. आज शनिवारपासून (1 जानेवारी 2022) कोणत्याही उपक्रम वा कार्यक्रमास फक्त 50जणांचीच उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे तसेच अंत्यविधीसाठीही फक्त 20जणांना उपस्थितीची परवानगी दिली गेली आहे. साथरोग अधिनियम 1897 कलम 2(1) नुसार कोरोना प्रतिबंध आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी (31 डिसेंबर) जारी केले आहेत.
कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग अधिनियम 1897 च्या नियमावलीनुसार जिल्हयात 31 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून प्रतिबंधात्मक निर्बंध आदेश जारी केले आहेत. त्यानुसार विवाह समारंभ हे बंद जागेमध्ये किंवा मोकळया जागेत आयोजित करताना उपस्थितांची संख्या जास्तीत जास्त 50 पर्यंत मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले आहे. तसेच कोणतेही मेळावे, कार्यक्रमाच्याबाबतीत मग ते सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रम असले तरी ते बंद जागेत अथवा मोकळया जागेत आयोजित करताना उपस्थितांची संख्या जास्तीतजास्त 50 पर्यंत मर्यादित ठेवण्याचे आणि अंत्यविधीसाठी उपस्थितांची संख्या जास्तीत जास्त 20 व्यक्तीपर्यंत मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग अधिनियम 1897 च्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार दंडनीय व कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असाही इशारा या आदेशात देण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करणे, नो व्हॅक्सिन-नो एंट्री व रात्री 9 ते सकाळी 6दरम्यान जमावबंदी आणि पाच वा त्यापेक्षा जास्तजणांना एकत्र येण्यास बंदीसह इतर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. आता पुन्हा कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी आणि
त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी विवाह समारंभ व अन्य सार्वजनिक कार्यक्रमांना फक्त 50 जणांची व अंत्यविधीला 20जणांच्या उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे.

लसीकरणावर देणार भर
कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाय योजनाबाबत सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी संवाद साधला. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी तसेच कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढले पाहिजे यासाठी नियोजन करावे, गावात व तालुक्यात 100% लसीकरण लवकर कसे पूर्ण होईल, याबाबत नियोजन करावे. संभाव्य तिसरा लाटेचा धोका लक्षात घेता आणि जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या यादृष्टीने आरोग्य विभागाने रुग्णालयातील बेडची संख्या, ऑक्सिजन व्यवस्था, अतिदक्षता विभागातील सेवा सुविधा, औषधसाठा याबाबत सुद्धा नियोजन करणे आवश्यक आहे. प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांनी सतर्क राहावे, आरोग्य विभागाने रुग्णालयातील फायर ऑडिट, सेफ्टी ऑडिट, स्ट्रक्चर ऑडिट बाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या. जिल्ह्यात नववर्षाचे स्वागत करताना धार्मिक स्थळी, पर्यटन स्थळे तसेच कोणत्याही कार्यक्रमात, नागरिकांची जास्त गर्दी होणार नाही तसेच, सामाजिक अंतर पाळले जाईल व कोविडच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याबाबत स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. याबैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित उपस्थित होते.
जिल्ह्यामधील धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळे येथे नागरिकांची जास्त गर्दी होणार नाही, त्यासाठी संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार आणि गट विकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पथकाची नेमणूक करावी तसेच कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणि प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे काटेकोरपणे पालन होत आहे किंवा नाही, याबाबत पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर तात्काळ कारवाई करावी व त्याचा अहवाल देण्याचे आदेश दिले.

नव्या 73 बाधितांची भर
जिल्ह्यात शुक्रवारी 64 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 51 हजार 472 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.90 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 73 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 369 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 37, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 27 आणि अँटीजेन चाचणीत 9 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा 9, अकोले 1, नगर ग्रामीण 2, नेवासा 1, पारनेर 3 पाथर्डी 4, राहाता 1, संगमनेर 4, श्रीगोंदा 11 आणि श्रीरामपूर 1 तर खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा 4, अकाले 1, जामखेड 1, नगर ग्रामीण 1, पारनेर 1, राहाता 3, राहुरी 1, संगमनेर 2, शेवगांव 1, श्रीगोंदा 6, श्रीरामपूर 4, इतर जिल्हार 1 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. तसेच अँटीजेन चाचणीत शुक्रवारी 9 जण बाधित आढळून आले. यात पाथर्डी 2, संगमनेर 4, श्रीरामपूर 2 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 9, अकोले 8, कर्जत 2, कोपरगांव 3, नगर ग्रामीण 6, नेवासा 3, पारनेर 7, पाथर्डी 1, राहाता 2, राहुरी 5, संगमनेर 4, शेवगाव 1, श्रीगोंदा 8, श्रीरामपूर 4 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत बरे झालेली रुग्ण संख्या:3,51,472. उपचार सुरू असलेले रूग्ण:369. पोर्टलवरील मृत्यू नोंद:7,155. एकूण रूग्ण संख्या:3,58,996.

COMMENTS