नवाब मलिकांना आठ दिवसांची ईडी कोठडी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवाब मलिकांना आठ दिवसांची ईडी कोठडी

दाऊद संबंधित आर्थिक व्यवहाराप्रकरणी कारवाईसिल्वर ओकनंतर वर्षा बंगल्यावर आघाडीच्या बैठका आणि खलबतेमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आणि राज्याचे

अखेर, आव्हान मिळालेच…!
जामखेडमध्ये विवाहितेवर अत्याचार
दोघा शिवसैनिकांवर तलवारीने जीवघेणा हल्ला! .

दाऊद संबंधित आर्थिक व्यवहाराप्रकरणी कारवाई
सिल्वर ओकनंतर वर्षा बंगल्यावर आघाडीच्या बैठका आणि खलबते
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या घरावर बुधवारी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या टीमने पहाटे साडेचार ते पाच वाजता छापे टाकले. यानंतर नवाब मलिक यांची तासभर चौकशी केल्यानंतर त्यांना दुपारी अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत कोर्टात वादविवाद सुरू संपल्यानंतर न्यायालयाने मलिकांना 8 दिवसांची ईडी कोठडी सुनावली.
दरम्यान, चौकशी संपल्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर येत मलिक यांनी झुकेंगे नही लढेंगे अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयात नेण्यात आले. ईडीनं केलेल्या कारवाईमुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगतांना दिसून येत आहे.
गुन्हे जगताशी संबंधीत आर्थिक व्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. दाऊद इब्राहिमशी संबंधित काही व्यक्ती आणि खात्यांमधून मलिक यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत 1993 साली झालेल्या बाँम्बस्फोटातील एका आरोपीची जमीन मलिकांनी विकत घेतली होती. यासंदर्भात काही आर्थिक व्यवहारांची उकल ईडीकडून केली जात असल्याची शक्यता आहे. मलिक यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. सध्या त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. नवाब मलिक यापूर्वी गुन्हेगारी जगताशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीकडे आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई सूडाचे राजकारण असल्याचा आरोप मलिकांच्या समर्थकांनी केला आहे. इकबाल कासकरने नाव घेतल्यानंतर मलिक यांची चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इकबाल कासकर, इकबास मिरची, आणि अस्लम फ्रूट यांना ईडीने ताब्यात घेतले होते. इकबाल कासकरने ईडी चौकशीत मलिक यांचे नाव घेतल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर ईडीने कारवाई करत मलिकांची चौकशी सुरु केली आहे. तर याच दरम्यान ईडी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ईडी कार्यलयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर पोलिस आणि कार्यकर्ते समोरा-समोर आले आहेत.

ईडी माफिया टोळीप्रमाणे मागे लागल्या : संजय राऊत
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या ईडी कारवाईचे पडसाद बुधवारी महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले. ईडी माफिया टोळी प्रमाणे मागे लावल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. 20 वर्षानंतर चौकशी का केली जात आहे?. किरीट सोमय्यांनी भाजपच्या नेत्यांची काही प्रकरणे ईडीकडे दिली आहे. त्याचे काय झाले? त्यांची चौकशी का केली जात नाही? असे सवाल त्यांनी केले आहेत. महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला केंद्रीय यंत्रणा घेऊन गेली आहे. पण कितीही खोटं करू द्या. सत्याचा विजय होतो, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे.

भाजपकडून सत्तेचा गैरवापर : शरद पवार
नवाब मलिक यांच्यावर ईडीने जी कारवाई केली, त्याचे अजिबात आश्‍चर्य नाही. आज ना उद्या होणारच होते. जाहीरपणे अनेक विषयांवर मलिक सतत विरोधात बोलत असल्याने ही कारवाई करण्यात आली. मलिकांवर ईडी कारवाई करणार याची पुसटशी कल्पना होतीच. परंतु हा सत्तेचा गैरवापर होतोय. जे केंद्र सरकार किंवा केंद्रीय यंत्रणांबाबत बोलतात, त्यांना नोटीस दिली जाते. त्यांची चौकशी होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

लिकांचा राजीनामा घेणार नसल्याची राष्ट्रवादीची भूमिका
मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रससह विविध पक्षांच्या नेत्यांची शरद पवार यांनी सिल्वर ओकवर बैठक घेतल्या. यावेळी मलिकांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादी काँगे्रसने घेतली आहे. ज्या आरोपामध्ये मलिकांना अटक दाखवण्यात आली, ते आरोपच खोटे असून, अनेक वर्षांपूर्वी जी जमिन खरेदी करण्यात आली, त्याचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे राष्ट्रवादी काँगेसने म्हटले आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक ईक्बाल मिर्ची याच्या वरळीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीने विकास केला होता. पटेल यांच्या कंपनीने येथे सीजे हाऊस नावाची 15 मजली इमारत बांधून मिर्ची फॅमिलीला तिसर्‍या मजल्यावर 9 हजार चौरस फूट आणि चौथ्या मजल्यावर 5 हजार चौरस फूट असे एकूण 14 हजार चौरस फुटांचे बांधकाम दिले होते. ईडीने ही मालमत्ता जप्त केली आहे. तर, याप्रकरणात ईडीने प्रफुल्ल पटेल यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदविला आहे. ईडीने आतापर्यंत वरळीतील सीजे हाऊस इमारतीतील मालमत्तेसह साहिल बंगल्यातील तीन फ्लॅट, ताडदेवमधील अरुण चेंबसमध्ये असलेले कार्यालय, क्रॉफर्ड मार्केटमधील तीन व्यावसायिक दुकाने, बंगले आणि लोणावळ्यातील 5 एकर पेक्षा अधिक जमीन अशा ईक्बाल मिर्चीच्या तब्बल 600 कोटींच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे.

पुढचा नंबर अनिल परब यांचा : किरीट सोमय्या
मंत्री नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात आठ तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब हे देखील ईडीच्या रडारवर असून पुढचा नंबर त्यांचा आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल. असा खळबळजनक दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.सोमय्या हे नवाब मलिक आणि अनिल परब यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे सांगत होते. अखेर मलिक यांना अटक झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे.

COMMENTS