अहमदनगर/प्रतिनिधी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी येथील समविचारी संघटना व लहू योद्धा ग्रुपच्यावतीने क
अहमदनगर/प्रतिनिधी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी येथील समविचारी संघटना व लहू योद्धा ग्रुपच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारचा निषेध निदर्शनांद्वारे करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव नाकारल्याच्या घटनेचा समविचारी संघटना व लहू योद्धा ग्रुपच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी भारत पवार, मतीन सय्यद, लहु योद्धा ग्रुपचे आकाश लोखंडे, अंकुश मोहिते, सुनील सकट, अशोक भोसले, रोहित शिंदे, वरूण वाघमारे, दिलीप जाधव, सचिन घोरपडे, गणेश आडागळे, हर्षद शिर्के, ओमकार नवखीले, अविनाश भालेराव, अजय शिंदे, सनी उमाप, अविनाश जाधव, सनी जगधने, आकाश साबळे, संतोष शिरसाठ, संजू खरात, प्रकाश लोखंडे, कृष्णा कुर्हाडे आदी उपस्थित होते.
आंदोलनाचा इशारा
भारत सरकार अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन या संस्थेमार्फत राज्यातील महापुरुष, प्रबोधनकार व प्रतिष्ठित व्यक्तींची नावे यादीत समाविष्ट आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव या यादीत घेणे गरजेचे असतानादेखील फाउंडेशनचे संचालक विकास त्रिवेदी यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव नाकारला व ते प्रतिष्ठित नव्हते, असे नमूद केले. त्यामुळे समविचारी संघटना व लहू योद्धा ग्रुपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर केंद्र सरकारचा निषेध नोंदवून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळा शिकून पंधरा पोवाडे, आठ गीत लेखन, सात चित्रपटकथा अशा असंख्य साहित्य संपत्तीची निर्मिती केली. या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी उपेक्षित घटकांच्या व्यथा मांडल्या. जगाच्या 27 भाषेत त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अण्णाभाऊ साठे यांनी सातासमुद्रापार पोहोचवला. असे असताना सत्यशोधक बहुजन समाजाचे जननायक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
COMMENTS