कांदा आणतोय…आतापासूनच डोळ्यांत पाणी…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कांदा आणतोय…आतापासूनच डोळ्यांत पाणी…

ढगाळ हवामानामुळे पीक संकटात, फवारणीचा खर्च वाढला

अहमदनगर/प्रतिनिधी : कांदा विळीवर वा चाकूने चिरल्यावर चिरणार्‍याच्या डोळ्यात पाणी आणतो. पण बाजारात चांगला भाव मिळाला तर तो पिकवणार्‍या शेतकर्‍याच्या ड

डॉ. संजय दवंगे यांची मुक्त विद्यापीठाच्या हिंदी साहित्य लेखनासाठी नियुक्ती
अर्थव्यवस्थेबाबत मोदी सरकारच्या फसव्या घोषणा
हिंदुत्ववादी मोर्चापासून शहर भाजप अलिप्त

अहमदनगर/प्रतिनिधी : कांदा विळीवर वा चाकूने चिरल्यावर चिरणार्‍याच्या डोळ्यात पाणी आणतो. पण बाजारात चांगला भाव मिळाला तर तो पिकवणार्‍या शेतकर्‍याच्या डोळ्यात आनंदाश्रू आणतो. मात्र, सध्याच्या ढगाळ हवामानामुळे कांदा पीक संकटात सापडले असून, त्याला रोगापासून वाचवण्यासाठी दररोज औषध फवारणी करावी लागत आहे. यासाठीच्या वाढत्या खर्चाने शेतकरी हवालदिल झाले असून, खर्चाची तोंडमिळवणी करताना त्यांच्या डोळ्यांत पाणी येऊ लागले आहे. सतत ढगाळ हवामान, कधी थंडी तर कधी पाऊस, तर कधी कडक ऊन अशा विचित्र हवामानात सध्या कांदा उत्पादक शेतकरी सापडला आहे. कांदा रोपापासून ते कांदा लागवड झाल्यानंतर दर दिवसाला पिकावर फवारणी करावी लागत असल्याने यंदा सुरुवातीलाच प्रमाणापेक्षा जादा खर्च होऊ लागल्याने कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे. गेल्या काही वर्षापासून उसापेक्षा कांदा व कपाशी पिकाचे कमी दिवसात जादा उत्पन्न व जादा पैसा मिळत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा व कपाशी पिकांकडे वळले आहेत. परिणामी यंदाही कांद्याची विक्रमी लागवड झाली. कांदा लागवडीची सध्या झुंबड उडाली आहे. त्यामुळे कांदा लागवडीसाठी मजूर मिळेनासे झाले आहे. परिणामी कांदा लागवडीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सरी पध्दतीने कांदा लागवड एकरी 10 ते 11 हजार रुपये दर आहेत. तर वाफा पध्दतीने 11 ते 12 हजार रुपयांचा दर चालू आहे.

खर्च वाढल्याने अस्वस्थता
कांदा लागवडीसाठी येणार्‍या महिला मजुरांची जाण्या-येण्याची व्यवस्था रिक्षा किंवा टेम्पोद्वारे करावी लागत आहे. त्यातच इंधनाचे दर आभाळाला भिडल्याने वाहतूकदारांनी दरवाढ केल्याने अंतर किती आहे, हे बघून पाचशे ते हजार रुपये रोज वाहतुकीसाठी खर्च करावे लागत आहेत. त्यातच कांद्याची रोपे जर बाहेरुन आणायची असेल तर रोप उपटण्याचे व वाहतुकीचे आणखी पैसे वाढतात. एकूण सुरुवातीलाच लागवडीचा खर्च पंधरा-सोळा हजारापर्यंत यंदा गेला आहे. या अगोदर कांदा बी तीन हजार दोनशे ते साडेतीन-चार हजार रुपये किलोने विकत घ्यावे लागले. रोपासाठी वाफे तयार करुन त्यामध्ये एका पायली रोपाला म्हणजेच तीन किलो बियाणांसाठी एक गोणी रासायनिक खत 1700 रुपये, एक गोणी बुरशीनाशकांचे 2200 रुपये, वाफे तयार करण्याची मजुरी दीड हजार रुपये असा सुरुवातीला रोपे तयार करण्यासाठीच साधारणपणे आठ ते दहा हजाराच्या आसपास खर्च एक पायलीसाठी होत आहे. त्यातच मध्यंतरी पाऊस झाला. त्यानंतर धुके पडले. यामुळे रोपे पिवळी पडली. त्याला तीन ते चार वेळा महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागली, तो खर्च पाच हजार रुपये आला. यानंतर लागवड खर्च मिळून असा एकूण तीस हजार रुपये खर्च सुरुवातीला होत आहे.
या अगोदर रान तयार करण्यासाठी एक एकरासाठी नांगरट दोन हजार पाचशे रुपये, रोटा मारणे दोन हजार पाचशे, रासायनिक खताच्या एकरी पाच गोण्या त्याचा खर्च साडेआठ हजार रुपये. सरी पाडणे किंवा वाफे तयार करणे एकरी साडेतीन हजार रुपये, रानबांधणी खर्च तीन हजार रुपये असा हा खर्च लागवडीआधी सोळा ते सतरा हजार होत आहे. म्हणजेच रोपासह लागवड खर्च एकूण सुरुवातीलाच 45 ते 50 हजार रुपये होत आहे. त्यानंतर चार महिन्यात खुरपणी, तणनाशक, कीटकनाशक फवारणी हा खर्च वेगळाच आणि ठिबक असेल तर ठिबकचा खर्च वेगळाच. याशिवाय ज्या दराने लागवड झाली, त्याच दराने कांदा काढणी दर घेण्यात येतो. काढणीनंतर वाहतूक खर्च, चाळणी करुन कांदा चाळीत भरुन ठेवण्यापर्यंत यंदा एकरी एक लाखाच्या आसपास खर्च होण्याची शक्यता आहे. परिणामी, कांदा शेतातून बाहेर येण्याआधीच शेतकर्‍यांच्या डोळ्यांतून पाणी तरळू लागले आहे

ती आशा कायम
कांदा लागवडीसाठीचा सर्व मिळून सुमारे लाखभर रुपये खर्च होणार असला तरी त्यानंतरची सारी आशा उत्पादित कांद्याला भाव मिळण्यावर केंद्रीत होणार आहे. चार महिन्यांनी कांदा तयार होऊन तो बाजारात नेताना समाधानकारक भाव मिळाला तरच पैसे होणार आहे. त्यात एकदम आवक वाढून भाव पडायला लागले तर चांगले भाव मिळेपर्यंत तो पुन्हा कांदा चाळीत टाकावा लागेल व तेथेही तो टिकला पाहिजे, असे सारे आडाशे व आशा यात गुंतल्याने शेतकर्‍यांची अस्वस्थता वाढत आहे.

COMMENTS