माई : संत गाडगेबाबा यांचा कृतीवारसा !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

माई : संत गाडगेबाबा यांचा कृतीवारसा !

लाख मरोत, पण लाखांचा पोशिंदा ना मरो, अशी एक म्हण मराठी साहित्यात रा. ग. गडकरी या साहित्यिकाने अजरामर केली. सिंधुताई सपकाळ अर्थात माई यांच्या अकाली जा

टीडीएफ माध्यमिक शिक्षक संघाच्या सभेत एकजुटीचा नारा
साखळी उपोषणास त्रिदल माजी सौनिक सेवा संघाचा पाठिंबा
अजित पवार यांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

लाख मरोत, पण लाखांचा पोशिंदा ना मरो, अशी एक म्हण मराठी साहित्यात रा. ग. गडकरी या साहित्यिकाने अजरामर केली. सिंधुताई सपकाळ अर्थात माई यांच्या अकाली जाण्याने त्या म्हणीची सार्थकता लक्षात आली. विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यात जन्मलेल्या आणि जेमतेम अक्षर ओळख होण्यापर्यंत म्हणजे चौथी पर्यंत चे शिक्षण झालेल्या सिंधू सपकाळ या आपल्या महान कार्याने सिंधुताई सपकाळ आणि पुढे चालून माई बनल्या.  सिंधू सपकाळ ते माई पर्यंत चा त्यांचा प्रवास अक्षरशः थक्क करणारा आहे. मराठी साहित्यात मानवतेच्या मूल्यांची परखड शब्दात पेरणी करणारे दिवंगत कवीश्रेष्ठ नामदेव ढसाळ यांनी आपल्या कवितांमधून मांडणी केली होती की, माण्साने आधी स्वतःला गाडून घ्यावं, नष्ट कराव, उध्वस्त करावं, मग गाडून घेतलेल्या दाण्याला जो नवा अंकुर फुटेल ते जीवन. मग नंतर उरल्यासुरल्यांनी काय करावं याचं त्यांनी जे वर्णन केले ते वाचकांनी त्यांच्या साहित्यात वाचावं. परंतु, आम्ही  नामदेव ढसाळ यांना याठिकाणी जे उद्धृत केले ते त्यांच्या गाडून घेऊन अंकुरलेल्या त्या दाण्याचे उदाहरण याचसाठी देतोय की, सिंधुताई सपकाळ यांचे जीवन हे असेच होते. चौथी पर्यंत चे शिक्षण, बाराव्या वर्षी लग्न, विसाव्या वर्षी संसार उद्धवस्त आणि थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर अक्षरशः भिक मागण्याची वेळ अशा अवस्थेतून हजारोंची माई बनलेल्या सिंधुताई या जात, धर्म, पंथ अशा भेदभाव असणाऱ्या विश्वाच्या पलिकडे जाऊन माणूस बनल्या हेच खरं. माणूसपणाचे पहिले लक्षण ही मानवता. आपल्याला लागते तशी भूक अनुभवणाऱ्या लाखों जिवांशी त्याचा तादात्म्य भाव जोडून ती जाणिव होणं यापलिकडे अध्यात्म तरी काय असू शकते. स्वतःला शिक्षण मिळाले नाही, तरी इतर अभावग्रस्त बालकांच्या जीवनात शिक्षणाचा अभाव राहू नये, म्हणून झटणाऱ्या माई या संत गाडगेबाबा यांचा अर्वाचीन वारसाच म्हटल्या पाहिजे. वर्धा येथूनच आपल्या उद्ध्वस्त जीवनाची सुरूवात करणा-या सिंधुताई आज संबंध महाराष्ट्राच्या माई म्हणून स्थिरावल्या असल्या तरी त्यांच्या कार्याचा वारसा त्यांनी इतका मजबूतीने मागे ठेवलाय की, तो यापुढे आणखी मजबूत होत जाणार आहे. उण्यापुऱ्या त्र्याहत्तर वर्षाच्या आयुष्यात पहिली वीस वर्षे तर त्यांची कुटुंबं या संज्ञेखाली माहेर-सासरच्या जोखडात म्हणजे परावलंबित्वात गेली. उर्वरित त्र्येपन्न वर्षाच्या त्यांच्या नव्या अंकुरणाऱ्या आयुष्यात त्यांना सातशे पेक्षा अधिक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. ज्यात गेल्या वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले गेले. खरेतर, त्यांनी ज्या पध्दतीने आपले जीवन इतरांच्या सेवेसाठी व्यतित केले, त्याअर्थी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा सन्मान भारतरत्न देऊन करायला हवा होता. परंतु, पैशाचे इमले उभारणाऱ्या एखाद्या सप्ततारांकित खेळाडू ला भारतरत्न देणाऱ्या आमच्या व्यवस्थेचे टाळकं फार ठिकाणावर आहे, असं म्हणता येत नाही. अर्थात, सिंधुताई सारखी व्यक्तिमत्त्व अशा पुरस्कारांनी घडत नाही, तर त्यांच्या कार्याचा गौरव त्यांच्या नावानेच पुरस्कार बनण्यात होईल, यात आम्हाला शंका नाही. मात्र, सिंधुताई सपकाळ अर्थात माई यांचे आधुनिक वैद्यकीय सुविधा असणाऱ्या अति सुसज्ज काॅर्पोरेट बनलेल्या हाॅस्पिटलमध्ये बारा दिवसांपूर्वी दाखल करूनही परत न येणं ही बाबही मनाला धक्का लावणारी आहे. अर्थात सिंधुताई यांच्या कार्याला सलाम करतानाही आम्ही हे भान ठेवतोच की, त्यांनी आदिवासी समाजात काम केल्यानंतर ही त्यांच्याशी संबंधित काही संस्थांमध्ये वनवासी नाव असणं खटकणारं. कधी-कधी आपला परिघ वेगळा असतानाही सामाजिक क्षेत्रात काही अनावश्यक वक्तव्य जी टाळली जाऊ शकतात, अशी वक्तव्य त्यांच्याकडून काही प्रवृत्तींनी करून घेतल्या. ज्यात आरक्षणासारखा नाजूक मुद्दाही येतो. तरीही, अतिशय सक्रिय आयुष्य जगणाऱ्या व्यक्ती या दीर्घायुषी ठरतात. मात्र, अलिकडे वेगवेगळ्या क्षेत्रात सक्रिय आयुष्य जगणाऱ्या व्यक्ती अत्याधुनिक रूग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांचे परत येणेच निश्चित राहिले नाही, त्यामुळे या अत्याधुनिक हाॅस्पिटल्सना नैतिक कसोट्यांवर तपासणे गरजेचे आहे.

COMMENTS