मध्यपूर्वेत तणाव आणि युद्धाची परिस्थिती निर्माण होण्यास प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्वाकांक्षी धोरण. त्याम

मध्यपूर्वेत तणाव आणि युद्धाची परिस्थिती निर्माण होण्यास प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्वाकांक्षी धोरण. त्यामुळेच जगभरात अशांतता निर्माण होतांना दिसून येत आहे. खरंतर ट्रम्प आपण शांततेचे दूत असल्याचे भासवत इतर देशांमध्ये मध्यस्थी करत युद्ध मिटवल्याचा दावा करत असले तरी, ट्रम्प यांनीच अशांतता निर्माण करण्यासाठी इतर देशांना प्रोत्साहित केल्याचे दिसून येत आहे. त्याचे ताजेे उदाहरण म्हणजे मध्यपूर्वेतील तणाव. ट्रम्प यांनी यापूर्वीच इराणवर हल्ल्याची धमकी दिली होती, त्यानंतरच इस्रायलने इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर केलेल्या हल्ल्यांमुळे संपूर्ण जगाचे लक्ष या प्रदेशाकडे वेधले गेले आहे. स्फोटांचे आवाज, हवाई हल्ल्यांचे सायरन आणि संवेदनशील भागांचे रिकामीकरण-या सर्व घटनांनी युद्धाच्या सावल्या आणखी गडद केल्या आहेत. इस्रायलने या कारवाईला ‘प्रतिबंधात्मक हल्ला’ असे संबोधले असले, तरी त्याचे दूरगामी परिणाम काय असतील, याचा गंभीर विचार करण्याची ही वेळ आहे.
इस्रायली संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई संभाव्य धोक्याला आधीच आळा घालण्यासाठी करण्यात आली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या मोहिमेला ‘लायन्स रोर’ असे नाव दिल्याचे सांगितले जाते. या नावातून शक्तीप्रदर्शनाचा आणि ठाम भूमिकेचा संदेश देण्याचा प्रयत्न दिसतो. मात्र, सामर्थ्याचे प्रदर्शन आणि प्रत्यक्ष युद्ध यातील सीमारेषा फारच पातळ असते. एका देशाची ‘प्रतिबंधात्मक’ कारवाई दुसर्या देशासाठी उघड आक्रमण ठरू शकते, आणि याच ठिकाणी संघर्षाची ठिणगी पेट घेते. हल्ल्यानंतर इराणने आपली हवाई हद्द बंद करून सर्व उड्डाणे थांबवली आहेत. दुसरीकडे इस्रायलमध्येही सायरन वाजू लागले असून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या परस्पर प्रतिक्रिया सूचित करतात की संघर्ष एकतर्फी नाही; तो द्विपक्षीय आहे आणि क्षणाक्षणाला तीव्र होऊ शकतो. विशेषतः, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या कार्यालयाजवळ हल्ला झाल्याच्या बातम्यांमुळे परिस्थिती अधिक संवेदनशील झाली आहे. नेतृत्वाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला, तर राष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्न उपस्थित होतो आणि त्यातून कठोर प्रत्युत्तराची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. ही संयुक्त लष्करी कारवाई असल्याचे संकेत मिळतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी इराणवर हल्ल्याची धमकी दिली होती, तसेच अमेरिकन नागरिकांना तत्काळ इस्रायल सोडण्याचे आवाहनही केले होते. या सर्व घडामोडी सूचित करतात की हा संघर्ष केवळ दोन देशांपुरता मर्यादित नाही; तो प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय समीकरणांशी जोडलेला आहे. मध्यपूर्वेतील कोणतीही लष्करी हालचाल जागतिक राजकारणावर, तेलबाजारावर आणि सुरक्षाव्यवस्थेवर परिणाम घडवू शकते. सध्या सुरू असलेल्या अणुकराराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला अधिकच गंभीर ठरतो. इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम हा मुख्य वादाचा मुद्दा बनला आहे. इराण याला आपली ‘लाल रेषा’ मानतो. त्याच्या मते, हा कार्यक्रम केवळ संरक्षणासाठी आवश्यक आहे. इराणचा दावा असा आहे की, पूर्वीच्या हल्ल्यांदरम्यान त्याच्या क्षेपणास्त्र क्षमतेमुळेच त्याने स्वतःचे संरक्षण केले. मात्र, इस्रायल आणि अमेरिकेच्या दृष्टीने हा कार्यक्रम प्रादेशिक सुरक्षेसाठी धोका आहे. अशा परस्परविरोधी भूमिकांमुळे चर्चेचा मार्ग अरुंद होत जातो आणि लष्करी पर्यायांना वाव मिळतो. या संघर्षात सर्वांत मोठे नुकसान सामान्य नागरिकांचे होते, हे इतिहासाने वारंवार दाखवून दिले आहे. सायरनच्या आवाजात, बंद पडलेल्या विमानसेवांमध्ये आणि रिकाम्या करण्यात येणार्या वस्त्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरते. अर्थव्यवस्था डळमळते, बाजार अस्थिर होतात आणि स्थलांतराचे संकट निर्माण होते. युद्ध जिंकणारा आणि हारणारा कोण, हा प्रश्न नंतरचा; परंतु मानवी हानी मात्र दोन्हीकडे होते. इस्रायलने ‘प्रतिबंधात्मक’ कारवाईचा दावा केला असला, तरी प्रतिबंधाचा अर्थ केवळ शत्रूला रोखणे एवढाच नसतो; तो संवादाच्या मार्गालाही चालना देऊ शकतो. जर खरोखरच उद्दिष्ट प्रादेशिक स्थैर्य असेल, तर लष्करी आघातांपेक्षा कूटनीतिक प्रयत्न अधिक परिणामकारक ठरू शकतात. अणुशस्त्रांचा प्रसार रोखणे, क्षेपणास्त्र क्षमतेवर मर्यादा आणणे आणि परस्पर विश्वास निर्माण करणे-या बाबींसाठी सातत्यपूर्ण आणि पारदर्शक चर्चा आवश्यक आहे. आजची परिस्थिती जागतिक समुदायासाठीही कसोटीची आहे. संयुक्त राष्ट्रांसारख्या संस्थांनी तातडीने मध्यस्थीची भूमिका घ्यावी, तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि दोन्ही बाजूंना संयमाचे आवाहन करावे. अन्यथा, हा संघर्ष प्रादेशिक सीमारेषा ओलांडून व्यापक युद्धात परिवर्तित होऊ शकतो. मध्यपूर्वेतील इतिहास सांगतो की, प्रत्येक लष्करी कारवाई नवी वैरभावना निर्माण करते. सूडाची साखळी तुटली नाही, तर शांततेची संधी दूर जाते. इस्रायल आणि इराण यांच्यातील सध्याचा संघर्षही याच वळणावर उभा आहे. ‘सिंहाची गर्जना’ ही ताकदीची निशाणी असू शकते; पण खरी ताकद संयमात, संवादात आणि परस्पर आदरात असते. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी तातडीने तणाव कमी करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. अणुकार्यक्रम आणि क्षेपणास्त्र प्रश्नावर ठोस, पण तडजोडीची भूमिका स्वीकारल्यासच स्थैर्याचा मार्ग मोकळा होईल. अन्यथा, मध्यपूर्वेतील आणखी एक दीर्घकालीन संघर्ष जगासमोर उभा राहू शकतो. शांततेची हाक आज अधिक तीव्रतेने देण्याची गरज आहे. कारण युद्धाची किंमत केवळ रणांगणावर मोजली जात नाही; ती पुढील पिढ्यांच्या भविष्यावर उमटते. त्यामुळे सामर्थ्याच्या गर्जनेपेक्षा विवेकाचा आवाज मोठा ठरला पाहिजे.

COMMENTS