Homeताज्या बातम्यासंपादकीय

निवडणुकीच्या निकालाचा अर्थ

देशात त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या राज्यात विधानसभेच्या तर महाराष्ट्रात कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकाचा निकाल कालच जाहीर झाला आहे.

राज्यपालांचा राजीनामा आणि काही प्रश्‍न ?
संविधानाचे यश आणि अपयश
चीनमधील निर्बंध आणि कोरोना उद्रेक

देशात त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या राज्यात विधानसभेच्या तर महाराष्ट्रात कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकाचा निकाल कालच जाहीर झाला आहे. कसबा मतदारसंघ हा गेल्या तीन दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र यंदा भाजपला पहिल्यादांच मात खावी लागल्यामुळे भाजपची हवा ओसरत असल्याचा सूर विरोधकांकडून लावण्यात येत असला तरी, या निवडणुकांच्या निकालाचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे. त्रिपुरा राज्यात भाजपने निर्विवाद वर्चस्व राखले, एकहाती सत्ता मिळवली. मात्र नागालँडमध्ये भाजपने जरी सत्ता मिळवली असली, तरी यात भाजपचा वाटा नगण्य आहे. कारण नागालँडमध्ये भाजपची नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीसोबत युती होती. या पक्षाने 25 जागा जिंकल्या तर भाजपने केवळ 12 जागा जिंकल्या. त्यामुळे नागालँडमध्ये भाजप विजयी झाले असे म्हणता येणार नाही. तर दुसरीकडे मेघालयात ना काँगे्रसला बाजी मारता आली ना भाजपला. तिथे संगमा यांची नॅशनल पीपल्स पार्टीने सर्वाधिक 24 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या राज्यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँगे्रसने 7 जागा तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइं पक्षाने 2 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने देखील 2 जागा जिंकल्या आहेत. याचाच अर्थ मेघालयात मतदारांनी भाजपला नाकारल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय स्तरावर तीन राज्यांपैकी केवळ त्रिपुरात भाजपला एकहाती सत्ता मिळवता आली आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांकडे बघितल्यास भाजपने चिंचवडची जागा जिंकली आहे, मात्र जर राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी जर बंडखोरी केली नसती, तर चिंचवडमध्ये कदाचित महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले असते. मात्र राहुल कलाटे यांनी तब्बल 44 हजारांपेक्षा अधिक मतदान घेतल्यामुळे नाना काटे यांचा पराभव पत्करावा लागला आहे. कसब्यात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होता. भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली. टिळक यांचे पती आणि मुलगा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र भाजपने महेश रासने यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने रविंद्र धंगेकर यांना तिकीट दिले. उत्तम जनसंपर्क असलेले रविंद्र धंगेकर रिंगणात उतरल्याने निवडणुकीची चुरशीची झाली. ’बिग बॉस’फेम अभिजीत बिचुकले यांनीदेखील ही निवडणूक लढवली. वास्तविक पाहता कसबा विधानसभा मतदार संघात भाजपचे 16 नगरसेवक आहेत. त्यापैकी एकाही नगरसेवकाच्या प्रभागात भाजपला मताधिक्य मिळालेले नाही. हे विशेष. त्याचप्रमाणे ब्राम्हण समाजाची नाराजी असल्याचे बोलले जात होते. मात्र ब्राम्हण समाजाने आनंद दवे यांना देखील मतदान केले नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे, त्याचप्रमाणे नोटाला देखील मतदान झालेले नाही, याचाच अर्थ ब्राम्हण समाजाने थेट काँगे्रसच्या उमेदवाराला मतदान करून आपला रोष व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कसब्यातील 16 नगरसेवकांनी उमेदवाराचे काम केले नसल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टीने भाजपने माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे रासने हे प्रतिनिधित्त्व करत असलेल्या शनिवार पेठ या प्रभागातही त्यांना मताधिक्य का मिळाले नाही, याचीही कारणमीमांसा होण्याची गरज आहे. या निकालानंतर मरगळलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी लाभली आहे. रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर अनेक वर्षांनंतर काँग्रेसमध्ये उर्जितावस्था आली आहे. कायम शुकशुकाट असलेले काँग्रेस भवन पुन्हा गजबजले. मात्र, काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी असल्याने ही गटबाजी थोपविण्याचे आव्हान असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कसब्याच्या निमित्ताने आगामी महापालिकेच्या प्रचाराची रंगीत तालीम करून घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसची या निवडणुकीत ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका होती. या निवडणुकीमुळे काँगे्रसला एक आत्मविश्‍वास प्राप्त होतांना दिसून येत आहे. 

COMMENTS