Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप विरुद्ध ‘मविआ’आज सामना रंगणार

महाविकास आघाडीचा मोर्चा तर, भाजपची माफी मांगोची निदर्शने

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्‍न आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी महाविक

महाविकास आघाडीतच रस्सीखेच सुरू
महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांबाबत बेरकी कळवळा
आयजीच्या जीवावर बायजी उदार; महाविकास आघाडीचा भंकस कारभार

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्‍न आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडी आज शनिवारी मुंबईत महामोर्चा काढणार असून, या मोर्च्याला परवानगी मिळालेली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या विरोधात भाजप देखील मैदानात उतरली असून, याविरोधात आजच शनिवारी मोर्चा काढणार असल्याची घोषणा भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. त्यामुळे आज भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.

भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा आज 17 डिसेंबरला मुंबईत काढण्यात येणार आहे. यासंदर्भात बोलतांना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले की, महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यांमागे शंभर टक्के एक अजेंडा आहे. एखादा बुरुज जर पाडायचा असेल तर त्या बुरुजाचा एका एका दगडावर हल्ला केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. आपल्या स्वाभिमानावर हल्ला करून हा बुरुज पाडण्याचा प्रकार सुरू आहे. ही वक्तव्य चुकून केली जात नाही, अज्ञानाने झालेले नाही, जाणीवपूर्वक केली जात आहेत. जुना इतिहास पुसून काढायचा, महाराष्ट्राचा वेगळा इतिहास रचायचा हे कारस्थान असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या महामोर्चाला पोलीस परवानगी देतील का, असा प्रश्‍न उपस्थित होत असतानाच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जो काही मोर्चा निघणार आहे, तो शांतपणे व्हावा. या मोर्चाला परवानगी दिली आहे. लोकशाही पद्धतीने विरोध करायचा असेल तर ते करतील. कायदा आणि सुव्यवस्था राखली गेली पाहिजे, अशी माहिती फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना दिली. संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचे वक्तव्य केले होते. तर सुषमा अंधारे यांनीही काही दिवसांपूर्वी वक्तव्ये केली होती. याविरोधात भाजप आज मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याबाबत फडणवीस यांना विचारण्यात आले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वारकरी, संतांबद्दल बोलतात, प्रभू श्रीराम, कृष्णांबद्दल जे काही उद्गार काढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे बोलले जाते, अशा प्रकारच्या वक्तव्यांविरोधात लोकांमध्ये मोठा संताप आहे, तो व्यक्त करावाच लागेल, असेही फडणवीस म्हणाले.

सरकारला धडकी भरणार : जयंत पाटील
राज्यातील मंत्री खालच्या पातळीवर बोलून महापुरुषांचा अवमान करत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात प्रचंड बेरोजगारी आहे. यावर तोडगा न काढता बेरोजगारीवर अधिक भर घालण्याचे काम राज्यातील शिंदे टोळी आणि भाजपचे सरकार करत आहे त्यामुळेच उद्याचा महाविकास आघाडीचा महामोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा असेल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीकडून दैवतांचा अपमान ः आशिष शेलार
महाविकास आघाडीकडून सातत्याने महापुरुषांचा अवमान सुरु आहे. सुषमा अंधारेंकडूनही दैवतांचा अपमान सुरूय. मात्र, त्यानंतरही उद्धव ठाकरे शांतच आहेत, असा टोला लगावताना मोर्चा कशाला करताय, असा टोलाही भाजप नेते आशिष शेलार यांनी लगावला. या सर्व वक्तव्याविरोधात आज भाजपकडूनही मुंबईभर माफी मांगो निदर्शने करणार असल्याचेही शेलारांनी सांगितले.

महामोर्चासाठी अडीच हजार पोलिस देणार सुरक्षा –
महाविकास आघाडीचा महामोर्चा आज 17 डिसेंबरला मुंबईत काढण्यात येणार आहे. या महामोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली असली तरी राजकीय वातावरण पाहता महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. भाजपही मविआच्या मोर्चाविरोधात प्रतिमोर्चा काढणार आहे. यापार्श्‍वभूमीवर प्रचंड पोलिस बंदोबस्तात हा मोर्चा पार पडणार आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चाला 2 ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यात 2 अतिरिक्त पोलिस आयुक्त 4 ते 5 पोलिस उपायुक्त यांच्याद्वारे हा बंदोबस्त हाताळण्यात येणार आहे. या सोबतच या मोर्चात एसआरपीएफच्या वाढीव तुकड्यांचाही बंदोबस्त लावण्यात येणार. तसेच ड्रोनच्या माध्यमातून पोलिस मोर्चावर लक्ष ठेवणार आहेत.

COMMENTS