चाचण्याही करणे अनिवार्य

Homeताज्या बातम्यासंपादकीय

चाचण्याही करणे अनिवार्य

देशातील करोना रुग्णांची संख्या मागील दोन आठवड्यांमध्ये पुन्हा वाढत असल्याचं चित्र स्पष्ट आहे. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांमध्

सरकारचे धोरण, शेतीचे मरण
विद्युत वाहनांना मंत्र्यांचीच नकारघंटा
सत्तासंघर्षात शिंदे गटाची गोची

देशातील करोना रुग्णांची संख्या मागील दोन आठवड्यांमध्ये पुन्हा वाढत असल्याचं चित्र स्पष्ट आहे. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांमध्ये दिवसाला एक हजारहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये रविवारी विक्रमी १४४ रुग्ण आढळून आले. करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परवा म्हणजेच २७ एप्रिल रोजी एक बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीमध्ये सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सहभागी होण्यास सांगण्यात आल आहे. मागील अडीच वर्षे देशासह जगात कोरोनाने कहर घातला होता. दोन अडीच महिन्यापूर्वी चिंतेचे प्रमुख कारण असलेला कोविडचा विषाणू कायमचा हद्दपार झाला म्हणून संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण झाले होते. आता कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि लगतच्या राज्यांमध्ये या विषाणूच्या वाढत्या प्रभावाने केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. मागील आठ दिवसांत सात हजार नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यांमध्ये कोरोनाच्या संक्रमणाची वाढ झाली आहे. त्यामध्ये आठवडाभरात नवीन प्रकरणे दुप्पट, तिप्पट झाली आहेत. दिल्लीमधील संख्या तीन हजारांच्या घरात पोहोचली. ती गेल्या आठवड्यातील एक हजाराच्या तुलनेत दीडशे पटीने वाढली आहे. हरियाणामध्ये मागील दोन आठवड्यात ५१४ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मागच्या आठवड्यातील संख्या १२०० आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील बाधितांच्या संख्येत १४१ टक्क्यांनी वाढ झाली. यूपीमध्ये गेल्या आठवड्यात ५४० कोविड प्रकरणे नोंदली गेली होती. त्या आधीच्या आठवड्यातील संख्येच्या तुलनेत आताचा हा आकडा दुप्पट झाला आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये, बहुतेक नवीन बाधित रुग्ण हे दिल्लीला लागून असलेल्या गुडगाव, नोएडा आणि गाझियाबाद या एनसीआर शहरांमधून आलेले आहेत. केरळ, महाराष्ट्र, गुजरात आणि मिझोराममध्येही कोरोनाचा आकडा हळूहळू वाढत असल्याचे समोर येत आहे. कोरोना पुन्हा वाढतोय, यामुळे देशवासीयांची चिंता वाढत असतानाच कोरोना मृत्यूंवरून वादंग पाहायला मिळत आहे. अवघ्या जगाला जेरीस आणणाऱ्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताने यशस्वी प्रयत्न केल्याचे व देशातील लसीकरणाचा वेगही अनेक देशांच्या तुलनेत जास्त असल्याचे केंद्र सरकारने अनेकदा म्हटले आहे. मात्र, सरकारची कोरोना मृत्यूंसंबंधित अधिकृत आकडेवारी व जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) जाहीर करण्यात आलेली मृत्यूसंख्या यात प्रचंड तफावत असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत पाच लाख २१ हजार ७५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या आकडेवारीनुसार भारतात ४० लाख नागरिक कोरोनामुळे दगावले आहेत. हा आकडा देशातर्फे जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत मृत्यूसंख्येच्या जवळपास आठपट आहे. जगभरातील कोरोना मृत्यूंची संख्या खुली करण्यास भारताचा विरोध होता. त्यामुळे जगभरातील मृत्यूंची आकडेवारी जाहीर करण्यास काही महिने विलंब झाला, असा दावा ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने केला होता. या वृत्तानुसार २०२१ अखेरपर्यंत जगभरात सुमारे दीड कोटी नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही संख्या देशांनी वैयक्तिकरीत्या जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीच्या दुप्पट आहे. भारताचा मूळ आक्षेप कोरोना मृत्यूंच्या संख्येवर नसून, ते मोजण्यासाठी अवलंबलेल्या पद्धतीवर आहे. सध्याची कोविड रुग्णवाढ काही राज्यांपुरती मर्यादित आहे. मात्र कोरोनाचा मोठा प्रभाव नसलेल्या राज्यांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील कुठल्याही घटनेचे पडसाद येथे उमटतात. यापूर्वीच्या कोरोना लाटांमध्ये त्याचा प्रत्यय आला आहे. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर पर्यटन वाढले आहे. त्यात दिल्लीतून महाराष्ट्रात ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाच्या चौथ्या लाटेनंतर महाराष्ट्राने विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश येथून येणाऱ्या प्रत्येकाला आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करणे आवश्यक आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशन तसेच बसस्थानकांवर बाहेरून येणाऱ्या तापमान चाचणी केली जात आहे. मात्र, ती पुरेशी नाही. कोरोना प्रतिबंधक अन्य चाचण्याही करणे अनिवार्य करणे आवश्यक आहे. जेणेकरून महाराष्ट्र, मुंबईत कोरोनाची लाट पोहोचणार नाही.

COMMENTS