देशात कधी नव्हे ते, यंदा महागाईने उच्चांक गाठला आहे. हा उच्चांक सर्वसामान्यांना धडकी भरवणारा आहे. इंधन दरवाढ, खाद्यतेलांचे वाढणारे भाव यासह जीवनावश्य
देशात कधी नव्हे ते, यंदा महागाईने उच्चांक गाठला आहे. हा उच्चांक सर्वसामान्यांना धडकी भरवणारा आहे. इंधन दरवाढ, खाद्यतेलांचे वाढणारे भाव यासह जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठया प्रमाणावर वाढल्यामुळे सर्वसामान्यांची होरपळ वाढतांना दिसून येत आहे. मार्च महिन्यातील सर्वसाधारण महागाई निर्देशांक (डब्ल्यूपीआय) 14.55 टक्क्यांवर गेला आहे. महागाई दराचा हा गेल्या चार महिन्यातील उच्चांकी स्तर आहे. महागाईमुळे बहुतांश वस्तुंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. महागाईमुळे होत असलेली होरपळ कधी थांबणार? असाच सवाल सध्या जनतेमधून केला जात आहे.
इंधनाचे दरवाढ सातत्याने सुरू असल्यामुळे शेतीची मशागत देखील वाढली आहे. वाढता उत्पादन खर्च आणि त्या तुलनेत शेतीमालाला मिळणारा भाव यामुळे शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याचे स्वप्न दिवास्वप्नच ठरण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीत महागाईचा दर 13.11 टक्के इतका होता तर जानेवारीत 12.96 टक्के महागाई दर होता. मूल्यांकनाच्या आधारे महागाई दर वाढल्याने त्याचा फटका सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर होत असतो कारण लोकांना लागणार्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात ही वाढ होऊन वस्तू महाग होतात. डब्ल्यूपीआयचा अर्थ होलसेल प्राइस इंडेक्स अर्थात घाऊक महागाई निर्देशांक. हा दराने मार्च महिन्यात उच्चांक नोंदवल्यामुळे सर्वसामन्यांनी होरपळ होतांना दिसून येत आहे. तेल, तांदूळ, डाळी आदी सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत असताना त्या तुलनेत शेतीमालाच्या किंमती मात्र वाढलेल्या नाहीत. इंधन आणि खतांच्या किंमतीवरचं नियंत्रण सरकारनं काढून घेतलं. जागतिकीकरणावर ते सोडून दिलं; परंतु त्याच वेळी त्याच्यावरचे कर मात्र सरकार कमी करायला तयार नाही. डिझेलच्या दरात वाढ झाल्यानं मशागतीच्या दरातही वाढ झाली आहे. नांगरणी, रोटावेटर, खुरपणी, या सर्वच बाबींना डिझेल दरवाढीचा शॉक बसतांना दिसून येत आहे. उत्पादन खर्च वाढला असला, तरी उत्पन्न मात्र तेवढंच राहात असल्यानं शेतकर्यांसमोर मोठे संकट उभे टाकले आहे. मार्च महिन्यात खाण्या-पिण्याच्या वस्तूंची घाऊक महागाई दर 8.47 टक्क्यांवरून 8.71 टक्के इतका झाला आहे. इंधन आणि वीज महागाई दर 31.50 टक्क्यांवरून 34.52 टक्क्यांवर पोहचला आहे. बटाट्याचे घाऊक दरातही वाढ झाल्याचं दिसून येते. बटाट्याचा दर 14.78 टक्क्यांवरून 24.62 टक्के वाढला आहे. कांद्याचे घाऊक दर 26.37 टक्क्यांवरून जास्त झाला आहे. अंडी, मांसाहार दर 8.14 टक्क्यांवरून 9.24 टक्के इतका झाला आहे. गेल्या 4 महिन्यात क्रूड ऑयलचे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेल, सीएनजी, स्वयंपाकाचा गॅस, दूध, भाजीपाला, मांस, अंडी यासारखे खाद्यान्न तसेच दैनंदीन वापराच्या वस्तूच्या किंमतीत वाढ झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात महागाईचा आगडोंब उसळला आहे. मात्र हा आगडोंब शांत कसा करणार, यावर केंद्र सरकारकडे अद्यापतरी कोणताह उतारा असल्याचे दिसून येत आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती कमी असतांना देखील केंद्र सरकार इंधनाचे दर कमी करू शकले नाही. आता तर कच्च्या तेलांच्या किंमती वाढत असल्यामुळे दर वाढत असल्यामुळे केंद्र सरकार हात वर करण्यास मोकळे झाले आहे. मात्र महागाईच्या वाढत्या झळामुळे नागरिकांमधून संतापाची लाट उसळतांना दिसून येत आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून, यातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाने करण्याची गरज आहे. मात्र महागाईवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी राज्यातच नव्हे तर देशात सध्या धार्मिक धुव्रीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
COMMENTS