राहाता : शहरातील १५ चारी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून नर-मादीसह दोन पिल्ले अशा बिबट्यांच्या कुटुंबाचा वावर असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसर

राहाता : शहरातील १५ चारी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून नर-मादीसह दोन पिल्ले अशा बिबट्यांच्या कुटुंबाचा वावर असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. ऊस व पेरूच्या मोठ्या प्रमाणातील शेतीमुळे बिबट्यांचा वावर वाढला.परिणामी सायंकाळनंतर नागरिक व शेतकरी घराबाहेर पडण्यास धजावत नव्हते.
ऍड. नारायणराव कार्ले यांच्या ऊस शेतीतील सर्वे नंबर २०१ व २०२ या ठिकाणी वन विभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला होता. पिंजऱ्यात आमिष म्हणून दोन कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. या आमिषाला बळी पडत बिबट्या पिंजऱ्यात अडकला. या बिबट्यामुळे अनेक दिवसांपासून परिसरातील शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. रात्री पाणी भरण्यासाठी शेतमजूरही येण्यास तयार नव्हते. स्थानिक नागरिकांनी याबाबत वन विभागाला वारंवार माहिती देत पिंजरा लावण्याची मागणी केली होती. पिंजरा लावलेल्या ठिकाणी आवाज येत असल्याचे लक्षात येताच शेतकरी व नागरिकांनी तेथे धाव घेतली. पाहणी केली असता पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे आढळून आले. नागरिकांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली व बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी घेऊन गेले.
या घटनेची सविस्तर माहिती स्थानिक रहिवासी चंद्रशेखर कार्ले, संजय कार्ले, मयूर कार्ले आणि कृष्णा कार्ले यांनी दिली. बिबट्या पकडल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

COMMENTS