मुंबई ः ठाकरे गटाच्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. कारण कोरोना काळातील कथित खिचडी वितरण गैरव्यवहार प्रकरणात ठाकरे गटाच्या सूरज च

मुंबई ः ठाकरे गटाच्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. कारण कोरोना काळातील कथित खिचडी वितरण गैरव्यवहार प्रकरणात ठाकरे गटाच्या सूरज चव्हाण यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. कोरोना काळात वाटप करण्यासाठीच्या खिचडीचा दर्जा आणि त्याचं प्रमाण घटवून यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.
खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विधानसभेत केलेल्या भाषणादरम्यान या मुद्द्याचा उल्लेख करून ठाकरे गटाला लक्ष्य केले होते. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले होते. या घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाण यांचा संबंध असल्याचा संशय ईडीला असून त्याअनुषंगाने अटकेची कारवाई करण्यात आली आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असून त्यांना झालेली अटक आदित्य ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान आदित्य ठाकरेंनी या पोस्टमध्ये सूरज चव्हाण यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. निर्लज्ज हुकूमशाही आणि त्यांच्या यंत्रणेसमोर न झुकणार्या अशा निष्ठावान व्यक्तीचा सहकारी असण्याचा मला अभिमान आहे. सूरज चव्हाण हे कायमच सत्य, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आपल्या राज्यघटनेसाठी उभे राहिले आहेत. सत्तेकडून आलेले प्रलोभनांचे प्रस्ताव त्यांनी धुडकावून लावले. त्यामुळेच त्यांना अशा प्रकारे त्रास दिला जात आहे, असे आदित्य ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. आम्ही लोकशाहीसाठी या काळ्या कालखंडाशी लढा देऊ आणि विजयी होऊ. आपल्या राज्यातील हुकूमशाही सत्तेच्या कृती जग पाहात आहे, असेही त्यांनी पोस्टमध्ये शेवटी म्हटले आहे.
राजन साळवीच्या घरी एसीबीचे छापे – ठाकरे गटाचे कोकणातील आमदार राजन साळवी यांच्या घरी गुरूवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अर्थात एसीबीच्या अधिकार्यांनी चौकशीसाठी धाड टाकली. राजन साळवी यांच्या चार मालमत्तांच्या ठिकाणी शोधकार्य सुरू आहे. राजन साळवी यांचे घर, त्यांचे जुने घर, त्यांच्या भावाचे घर आणि त्यांच्या हॉटेलमध्ये धाडसत्र सुरू असल्याची माहिती राजन साळवींनी दिली. दरम्यान, त्यांच्याकडे 118 टक्क्यांनी जास्त बेकायदेशीर मालमत्ता सापडल्याने ही चौकशी सुरू असल्याचं समोर आले आहे. यासर्व प्रकरणात त्यांना उद्धव ठाकरे यांनीही फोन करून दिलासा दिला आहे. याबाबत त्यांनी माध्यमांना माहिती दिली. राजन साळवी म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मला तातडीने फोन केला. त्यांनी विचारपूस केली. म्हणाले राजन तुझ्या पाठिशी संपूर्ण महाराष्ट्र आहे. याचा मला अभिमान आहे.
COMMENTS