Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री जगदंबा देवीच्या पालखी सोहळ्यास लाखोंची गर्दी

कर्जत : उदो बोला, उदो उदो, साहेबाचा उदो उदो, बोल भवानी की जय, असा गगनभेदी जयघोष सोबतच ढोल, ताशे, नगारे आदींचा सातत्यपूर्ण गजर, रणशिंगाचा लक्षवेधी

संगमनेरमध्ये स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ मॅरेथॉनचे आयोजन
थोरात कारखान्याकडून शेतकर्‍यांना 200 रुपये प्रतिटन अनुदान व कामगारांना 20 टक्के बोनस
कोपरगाव तालुक्यात 26 सरपंच पदासाठी 85 उमेदवार रिंगणात

कर्जत : उदो बोला, उदो उदो, साहेबाचा उदो उदो, बोल भवानी की जय, असा गगनभेदी जयघोष सोबतच ढोल, ताशे, नगारे आदींचा सातत्यपूर्ण गजर, रणशिंगाचा लक्षवेधी निनाद, तोफांची आसमंत दणाणून टाकणारी सलामी, चंगाळे- बंगाळयांचा मर्दानी खेळ अशा चैतन्यमय वातावरणात महाराष्ट्राचे आराध्य दैवत राशीनच्या श्री जगदंबा (यमाई ) देवीचा पालखी उत्सव भाविकांच्या साक्षीने दिमाखात पार पडला. या सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
घटस्थापनेला सुरू झालेल्या जगदंबा मातेच्या यात्रेची कोजागिरी पौर्णिमेला सांगता होते. विजयादशमीनिमित्त उत्साहात सीमोउल्लंघन झाले. दसर्‍याच्या दिवशी सायंकाळी सर्व ग्रामस्थ सीमोउल्लंघनासाठी आले. तिथे एकमेकांना सोने देऊन अभिवादन केले. घरी गेल्यानंतर सुहासिनींकडून औक्षण केले गेले. त्यानंतर रात्री नऊ वाजता भाविक देवीच्या मुख्य यात्रेसाठी मंदिरात आले. यानिमित्त देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक पद्धतीने देवीला फूल लावून कौल मागण्यात आला. शंकरराव देशमुख यांच्या हस्ते देवीचे मुखवटे पालखीमध्ये ठेवण्यात आले. रात्री साडेअकरा वाजता निघालेली मिरवणूक रात्री आठ वाजता देवीच्या मंदिराजवळ विसर्जित झाली. पालखी सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान भाविकांनी एकच जल्लोष करत पालखीवर गुलाल आणि खोबर्‍याची मुक्तहस्ते उधळण केली. सिंहाच्या आवारात पालखी आल्यानंतर भक्तीच्या या अनोख्या सागरास उधाण आले होते. भान हरपून भाविक भक्तीरसात चिंब झाले होते. रात्री एक वाजता मंदिरातून पालखीने प्रस्थान ठेवले. सकाळी पालखी गावाच्या मुख्य रस्त्यावर आली. यानंतर दिवसभर संपूर्ण गावात पालखीने प्रदक्षिणा घातली. यावेळी गावातील महिलांनी पालखी मार्गावर सडा, मनमोहक रांगोळी काढल्या होत्या. गावातील प्रत्येक रस्त्यावर पालखीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यात्रेमुळे सर्व रस्ते बाजारपेठेत अलोट गर्दी होती. बाजारपेठेत संसार उपयोगी साहित्य, खेळणी, स्टेशनरी, कटलरी, मिठाई आदींची दुकाने थाटली होती. तसेच आनंदनगरी उभारण्यात आली होती. यावेळी पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम बळप व पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. महिलांना धक्काबुक्की होऊ नये तसेच चोर्‍या होऊ नयेत  याची खबरदारी घेऊन पालखी सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी रथावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्यानिमित्त विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली होती. पालखी मिरवणुकीदरम्यान ज्यांचे दर्शन होईल त्यांनी तात्काळ बाजूला व्हावे, तसेच ज्यांना दर्शन घ्यायचे त्यांनी शिस्तीत दर्शन घ्यावे, मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात अशा प्रकारच्या सूचना करण्यात येत होत्या. या उत्सवात विविध धर्मातील लोक सहभागी झाले होते. सामाजिक संस्थांच्या वतीने चहा पाण्याचे वाटप करण्यात आले.

COMMENTS