राजकीय मूल्य अबाधित ठेवा!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकीय मूल्य अबाधित ठेवा!

काल शरद पवार यांचे अचानक दिल्लीला जाणे आणि त्याचवेळी महाराष्ट्र भाजपचे काही नेते दिल्लीत असणं यावरून काही राजकीय अफवा पसरल्या. अफवा जेव्हा सर्वसामान्

सातारा जिल्ह्यात मुलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू
आदित्य ठाकरेंनी घेतली केजरीवालांची भेट
नया पाकिस्तान

काल शरद पवार यांचे अचानक दिल्लीला जाणे आणि त्याचवेळी महाराष्ट्र भाजपचे काही नेते दिल्लीत असणं यावरून काही राजकीय अफवा पसरल्या. अफवा जेव्हा सर्वसामान्य कुवतीच्या नेत्यांकडून येते तेंव्हा ते समजू शकतो. परंतु, राज्याचे कधीकाळी मुख्यमंत्री राहिलेले राजकीय नेतेच अशा अफवांच पीक आणतात त्यावेळी महाराष्ट्राची मान खाली जातेय का असे वाटू लागते. मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तींकडून प्रगल्भ राजकारणाची अपेक्षा असते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अपेक्षेवर खरे उतरले नाहीत. त्यांनी अनेक वेळा महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत सरकार कोसळेल आणि नवीन सरकार गठित होईल असे सातत्याने सांगून त्यांची पुरती एनर्जी संपली आणि व्यक्तिमत्त्व हास्यास्पद ठरू लागले. व्यक्तिमत्त्वावर उठणारे ताशेरे पाहता त्यांनी याकामी चंद्रकांत पाटील यांना पुढे केले. पाटलांच्याही वक्तव्याने हास्यास्पद ठरण्याची पातळी गाठली, असं लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांनी पुन्हा एका माजी मुख्यमंत्र्यांकरवी मार्चमध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळणार असे म्हटले. ते एवढ्यावरच थांबले असते तरी ठिक होते. भविष्य आणि कुंडली पाहण्याचा कोणताही वारसा नसताना त्यांनी मार्चमध्ये आमचे सरकार गठित होईल, असं भाकितही करून टाकले. त्यांच्या भाकिताला कोणीही गंभीर घेतले नाही. गंभीर घेतलं ते भाजपच्या आयटी सेलने. त्यांनी शरद पवार, फडणवीस यांचा अमित शहा यांच्यासोबत काही फोटो व्हायरल केले. ते फोटो माॅर्फ असल्याचे सांगत राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी चे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप आयटी सेलचा फर्जिवाडा असल्याचा थेट आरोपच केला आहे. हिंदी भाषेत एक म्हण आहे की, ” जो गरजते है, वह बरसते नहीं,” या म्हणीच्या उक्तीनुसार आपण विचार केला तर सातत्याने सरकार कोसळणार असं वक्तव्य करणारे हास्यास्पद ठरत असतानाही त्यांच वक्तव्य थांबण्याचं नाव घेत नाही! परंतु, मलिक यांच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याच आशा पल्लवित केल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजप आयटी सेल सातत्याने फर्जिवाडा करित असून आता लवकरच त्यांचा फर्जिवाडाही उघडा होईल. संसदीय लोकशाही व्यवस्थेतील कोणत्याही पक्षाकडे येणारी सत्ता चिरकाल किंवा कायम राहत नाही. सत्ता ही येते आणि जाते. येणे जाणे हा सत्तेचा स्थायीभाव आहे. परंतु, स्वातंत्र्याच्या दीर्घकाळानंतर सत्ता मिळालेल्या भाजप पक्षाच्या नेत्यांना सत्ता ही आपली दास आहे, असे वाटू लागले आहे. त्यामुळे, त्यांना सातत्याने असे वाटू लागले की, सत्ता उपभोगण्यास आमच्या इतका कोणीही लायक नाही, असा भ्रमभोपळा त्यांनी आपल्या डोक्यात फिट्ट बसवला आहे. असो. राजकारण करताना त्याचे गांभीर्य कदापिही कमी होऊ देऊ नये, हे राजकारणाचे मूल्य आहे. हे मूल्य न समजल्याने केवळ सत्तेची सुंदोपसुंदी हीच आपली मूल्य असतील हे जेव्हा पक्षीय नेत्यांना वाटू लागते तेंव्हा राजकारणाचे केवळ गांभीर्यच हरवत नाही, तर त्याची मूल्य देखील लोप पावतात. गेली दोन वर्षे भाजप नेत्यांनी आणि खासकरून मुख्यमंत्रीपद कधीकाळी भूषविलेल्या नेत्यांनी या राजमूल्यांना पायदळी तुडविले आहे. कधीकाळी ‘ राजधर्म’ पालनाचा आग्रह धरणारे वाजपेयी यांना अशी राजमूल्य देखील अपेक्षित होती. अलिकडच्या काळात ही मूल्य हरविण्यात भाजप नेत्यांनी चालवलेली स्पर्धा तात्काळ थांबवणे हे महाराष्ट्राच्या राजकीय हिताचे तर राहिलच परंतु, लोकशाही व्यवस्थेतील राजकीय मूल्य देखील शाबूत राहून पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शनही घडेल. ही पत्थ्य सांभाळत राजकारण करण्यातून संवैधानिक राजकारणाचा दर्जा राखला जाईल!

COMMENTS