कर्जतला राष्ट्रवादी व अकोल्यात भाजपने राखले वर्चस्व….

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतला राष्ट्रवादी व अकोल्यात भाजपने राखले वर्चस्व….

पारनेरला त्रिशंकु स्थिती, घोडेबाजार होणार?

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्ह्यातील तीन नगर पंचायतींचा निवडणूक निकाल तीन तर्‍हेचा लागला. कर्जतमध्ये राष्ट्रवादीने झेंडा फडकावला तर अकोल्यात कमळ फुलले

नगरकरांनो गाडी चालवताय तर १ चूकही पडू शकते महागात | LOKNews24
चोंडी ते निमगाव डाकू रस्त्यासाठी 2 कोटी 7 लाख मंजूर  
शाळा कॉलेजच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे


अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्ह्यातील तीन नगर पंचायतींचा निवडणूक निकाल तीन तर्‍हेचा लागला. कर्जतमध्ये राष्ट्रवादीने झेंडा फडकावला तर अकोल्यात कमळ फुलले. मात्र, पारनेरला राष्ट्रवादी वा शिवसेना यापैकी कोणत्याही पक्षाला स्वतःचा झेंडा फडकावता आला नाही. तेथे शहर विकास आघाडीने दोन जागा घेतल्याने त्रिशंकू स्थिती झाली आहे. त्यामुळे पारनेरला सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेला शहर विकास आघाडीचा किंवा भाजप आणि एका अपक्षाचा दांडा समवेत घेऊन आपल्या सत्तेचा झेंडा फडकावा लागणार आहे. मात्र, त्यामुळे येथे घोडेबाजार रंगण्याची चिन्हे आहेत. कर्जत, पारनेर व अकोले या तीन नगर पंचायतींच्या निवडणुकीमुळे मागील तीन महिन्यांपासून या तिन्ही तालुक्यांतून राजकीय गदारोळ जोरात सुरू होता. कर्जतला राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार रोहित पवार व भाजपचे माजी आमदार प्रा. राम शिंदे यांच्यात, पारनेरला राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार निलेश लंके व शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्यात तर अकोल्यात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे व भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांच्यात सव्वा दोन वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आमने सामने गाठ पडली होती. अर्थात या आजी-माजी आमदारांचे समर्थक रिंगणात होते. पण त्यांच्यामागे ताकद आजी-माजींचीच असल्याने त्यांच्याच राजकीय अस्तित्वाची ही लढत होती. यात पिचड व पवारांनी निर्विवाद वर्चस्व राखले तर लंके-औटींना समसमान साथ मिळाली. या निकालातून प्रा. शिंदे व आ. डॉ. लहामटे यांना मात्र योग्य तो संदेश गेला आहे.

राष्ट्रवादीचे वर्चस्व
तीन नगर पंचायतींच्या प्रत्येकी 17 नुसार एकूण 51 जागा होत्या. त्यापैकी सर्वाधिक 21 जागा जिंकून राष्ट्रवादीने वर्चस्व राखले तसेच कर्जत नगर पंचायत ताब्यात घेतली असून, पारनेरलाही सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर भाजपने एकूण 15 जागा जिंकताना अकोल्यात सत्ता मिळवली आहे. याशिवाय शिवसेनेने 8, काँग्रेसने 4, शहर विकास आघाडीने 2 व एक अपक्ष असे उमेदवार निवडून आले आहेत.

दोन निकाल विशेष
पारनेरला शिवसेनेचे माजी आमदार औटी यांच्या पत्नी जयश्री औटी यांचा अवघ्या 13 मतांनी पराभव झाला. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रभागात नोटा (यापैकी कोणीही नाही) या बटनावर 13 मतदारांनीच मतदान केल्याचेही स्पष्ट झाले आहे. येथील राष्ट्रवादीच्या युवा उमेदवार हिमानी नगरे यांनी 375 मते मिळवली तर औटी यांना 362 मते मिळाली व येथे नोटाला 13 मत पडली. दुसरा विशेष निकाल अकोल्यात लागला. तेथे भाजपच्या वैष्णवी धुमाळ यांनी राष्ट्रवादीच्या वंदना शेटे यांना 251 मते मिळाली. अवघ्या 7 मतांनी धुमाळ यांनी विजय मिळवला.

निकालानंतर जल्लोष
पारनेर, अकोले व कर्जत येथे नगरपंचायतींच्या दोन टप्प्यात निवडणुका झाल्या. पहिल्या टप्प्यातील मतदान मागील महिन्यात 21 डिसेंबरला झाल्यानंतर राहिलेल्या प्रत्येकी 4 जागांचे मतदान काल मंगळवारी 18 जानेवारीला झाले. त्यामुळे आज बुधवारी (19 जानेवारी) मतमोजणीची उत्सुकता होती. सकाळी जसजसे निकाल जाहीर होऊ लागले, तसतसे विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांचा जल्लोष जोरात सुरू झाला. गुलाल उधळत, फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव साजरा केला गेला.

COMMENTS