प्रेम आणि युध्दात सारे काही क्षम्य असते, अशी एक अंगवळणी पडलेली म्हण आहे. आता या दोघांच्याही जोडीला राजकारणही जोडले जायला हरकत नाही! अलीकडच्या क
प्रेम आणि युध्दात सारे काही क्षम्य असते, अशी एक अंगवळणी पडलेली म्हण आहे. आता या दोघांच्याही जोडीला राजकारणही जोडले जायला हरकत नाही! अलीकडच्या काळात राजकारणात ज्या घडामोडी घडत आहेत, जी वक्तव्य समोर येतात, जे व्यवहार होतात ते बघून राजकारणात देखील आता सारे काही क्षम्य होऊ लागले आहे. अर्थात, निवडणुकीच्या काळात ही बाब अधिक प्रकर्षाने जाणवायला लागली आहे. अर्थात, ही बाब केवळ एखाद्या मतदारसंघापूरती, प्रदेशापूरती किंवा देशापूरती मर्यादित असती तर गोष्ट वेगळी; परंतु, राजकारण आणि राजकीय निवडणुका यांच्या संदर्भात या बाबी जगभर घडत आहेत. गेल्या अध्यक्ष निवडणुकीत, अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीने राजकीय प्रचार यंत्रणा राबवण्यात आली, त्यामध्ये देखील अमेरिकन निवडणुकीत प्रचाराचे तंत्र बऱ्यापैकी खाली आले होते. त्यामुळे कधी नव्हे तो एथिकल व्हॅल्यू चा म्हणजे राजकीय नैतिकतेचा किंवा नीतिमत्तेचा प्रश्न जगातील समृद्ध अशा लोकशाही देशांमध्ये देखील उभा राहिला. भारतात तर राजकीय एथिक्सचे समीकरण सामाजिक एथिक्स म्हणजे सामाजिक नीतिमत्तेच्या आधारावरच जोडले जाते. त्यामुळे राजकारणात राजकीय लोक कोणत्याही पद्धतीचे वक्तव्य करत असतील, तरीही, ते भारतीय समाजात अजून समाजमान्य होणारे मत नसते. त्यामुळे सामाजिक नैतिकता ही भारतात राजकीय नैतिकते पेक्षा अधिक वरचढ ठरते. राजकीय निवडणुकीत जरी राजकीय पक्ष, व्यक्ती काही मूल्य दुर्लक्षित करत असतील, तरीही, भारतीय समाज त्या मूल्यांचा स्वीकार करण्यात अजूनही सक्षमपणे तयार नाही; आणि हेच भारतात राजकीय अनैतिकतेला अजूनही फार मोकळा वाव नाही. ही खरे तर भारतीय नागरिकांची किंवा भारतीय मतदारांची एक जमेची बाजू म्हणता येईल. सध्या महाराष्ट्रात मुंबई येथील अंधेरी मतदार संघाची निवडणूक ही फार प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिंदे गट यांची युती आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी या दोन गटांमध्ये सरळ लढत असणार आहे. या दोन्ही आघाड्यांच्या राजकीय लढती उमेदवार शेवटपर्यंत कोण ही निश्चाती यावर चर्चा मोठ्या प्रमाणात झाली असली तरी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांची निश्चिती होईल की नाही हा प्रश्न कायम होता. याचं कारण असं की अंधेरी येथील जागा ही दिवंगत आमदार रमेश लटके यांची होती त्या जागेवर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेने उमेदवारी दिली परंतु त्यांची उमेदवारी दाखल होऊ नये यासाठी भाजप आणि शिंदे गटाने राजकारणाच्या अनुषंगाने सर्व शक्ती पणाला लावली; परंतु न्यायालयाच्या मदतीने शिवसेना आणि पर्यायने महाविकास आघाडीला आपली इभ्रत राखणारी संधी मिळाली. अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार ठरवताना, कोणत्या राजकीय आघाडीतील कोणता पक्ष नेमका निवडणूक लढेल, या संबंधात शेवटपर्यंत अनिश्चिती दिसून येत होती. कारण भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत मुरजी पटेल यांच्या निमित्ताने आपला उमेदवार पुढे रेटू इच्छित असताना शिंदे गट ही जागा लढवेल, असं वातावरण निर्माण झालं. परंतु शिंदे गटाने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतूजा लटके यांनी त्यांच्या गटात प्रवेश केला तरच ती जागा लढवायची, असा जवळपास निर्धार केलेला होता; असेच, आता एकूण वातावरणावरून दिसते. ॠतुजा लटके यांचा राजीनामाचा प्रश्न मार्गी लागला. त्यांचा उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीचे उपस्थितीत शिवसेनेने भरला, आणि शिंदे गटाने अपेक्षेप्रमाणे ही जागा शक्ती नसल्यामुळे भाजपला सोडली. हे समीकरण आता अंधेरी पोट निवडणुकीत पक्के झाले आहे. परंतु, या पुढची लढाई प्रचारात आरोप प्रत्यारोपांची जी होणार आहे, ती कदाचित भारतीय राजकारणाच्या निवडणुकीत एक पराकोटीची ठरणार आहे. त्यामुळे या पुढच्या काळात युद्ध आणि प्रेम यांच्यासारखंच राजकारणातही सारं काही क्षम्य ठरणार आहे का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे!
COMMENTS