चाँद शेख ; जिल्हा परिषदेसमोर उपोषणाचा इशारा शेवगाव : सन २०२१–२२ या आर्थिक वर्षातील दिव्यांगांसाठीच्या ५ टक्के सेस निधीच्या कथित नियमबाह्य वापरासह तात्
चाँद शेख ; जिल्हा परिषदेसमोर उपोषणाचा इशारा
शेवगाव : सन २०२१–२२ या आर्थिक वर्षातील दिव्यांगांसाठीच्या ५ टक्के सेस निधीच्या कथित नियमबाह्य वापरासह तात्पुरत्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे करण्यात आलेल्या शिक्षक नियुक्त्यांतील गैरप्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते चाँद कादर शेख (रा. पिंगेवाडी, ता. शेवगाव) यांनी केला आहे. या प्रकरणात कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या शेख यांनी २५ फेब्रुवारी २०२६ पासून जिल्हा परिषद अहिल्यानगर कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
चाँद शेख यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रारी, पुरावे, अर्ज व स्मरणपत्रे सादर केल्याचे सांगण्यात आले. २३ जानेवारी २०२६ रोजी तात्पुरत्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे झालेल्या शिक्षक नियुक्तीची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक व कायदेशीर कारवाई करण्याची लेखी मागणी करण्यात आली होती. सदर नियुक्ती रद्द करण्यात आली असली, तरी संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय २८ जानेवारी २०२६ रोजी सन २०२१–२२ मधील दिव्यांग ५ टक्के सेस निधीच्या कथित गैरवापराबाबत स्वतंत्र पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असा आरोपही करण्यात आला आहे. लोकशाही मार्गाने केलेल्या सर्व प्रयत्नांकडे दुर्लक्ष झाल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत असून न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार चाँद शेख यांनी व्यक्त केला आहे. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
\\\\\\\\\\\\
संजीवनी इंजिनिअरिंगच्या पाच विद्यार्थ्यांना नोकरी
कोपरगाव : संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाच विद्यार्थ्यांची नामांकित आयटी कंपनी ड्रिझल आयटी सर्विसेस मध्ये नोकरीसाठी निवड झाली. विशेष म्हणजे इंटर्नशिप कालावधीतच त्यांना पगार सुरू झाला आहे अशी माहिती कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने विद्यार्थ्यांना उद्योगमान्य कौशल्यांचे प्रशिक्षण, मुलाखतींचा सराव, तांत्रिक मार्गदर्शन आणि सॉफ्ट स्किल्स विकास यांची प्रभावी तयारी करून घेतली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या तन्मय राजेंद्र आचारे, रामेश्वर दिलीप भांड, आदित्य संजय लोंढे, प्रियंका वसंत मोहन व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या समीक्षा किशोर नरोडे यांचा समावेश आहे.
संजीवनीचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन करून छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी डॉ. एम.व्ही. नागरहल्ली, डॉ. विशाल तिडके, डॉ. माधुरी जावळे उपस्थित होते.

COMMENTS