Homeताज्या बातम्याअग्रलेख

राष्ट्रवादीतील संदोपसुंदी !

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँगे्रसमधील संदोपसुंदी समोर येतांना दिसून येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँगे्

कड्यात शोकसभेनिमित्त कडकडीत बंद
अजित पवारांसह 9 आमदारांचे निलंबन
केशरी पगडीतील अजितदादा यांची आठवण; नांदेडकरांच्या मनात कोरलेली अविस्मरणीय भेट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँगे्रसमधील संदोपसुंदी समोर येतांना दिसून येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांनी आपल्या काकांवर कधीही टीका केली नाही. याउलट माझ्या चुलत्याच्या कृपेने माझं मस्त सुरू आहे, तर कुणाला दमत घ्यायचे असेल तर, माझा काकां लयं मोठा आहे, असे विधान करून अजित पवारांनी काकांशी अर्थात शरद पवारांशी आपली नाळ अजूनही घट्ट असल्याचे अनेक भाषणांतून संकेत दिले होते. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँगे्रस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यासंदर्भात म्हणजे 12 फेबु्रवारी रोजी निर्णय होणार होता. असे असतांना आज अजित पवारांच्या पश्‍चात पक्षातील काही नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको आहेत. त्यामुळेच राज्यात सत्तासंघर्षाचा खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक पाहता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जवळपास या बाबी निश्‍चित झाल्या आहेत, मात्र त्याची गंधवार्तादेखील शरद पवारांना नाही. खरंतर पवार कुटुंबांत शरद पवार सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहेत. अशावेळी त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र राष्ट्रवादी काँगे्रसमधील काही चांडाळचौकडींना शरद पवार मधे आल्यास आपले महत्व कमी होईल, अशी भीती वाटतांना दिसून येत आहे. खरंतर अजित पवारांचा या नेत्यांनी आदर्श ठेवण्याची खरी गरज होती. दोन्ही शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात कधीही संवाद झाला नाही. मात्र दोन्ही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कौटुंबिक दुरावा कधीही आला नाही. मात्र अजितदादांच्या पश्‍चात हा दुरावा अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक आलेली पोकळी कधी भरून न निघणारी असते. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने अशीच एक पोकळी निर्माण झाली आहे. एकीकडे राज्याच्या सत्ताकारणातील प्रभावी, निर्णयक्षम आणि धाडसी नेता काळाच्या पडद्याआड गेला, तर दुसरीकडे त्यांच्या पश्‍चात दोन महत्त्वाचे प्रश्‍न उभे राहिले आहेत. पहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील सूत्रे कोणाच्या हाती जाणार? आणि दुसरा, अधिक व्यापक परिणाम करणारा प्रश्‍न तीन वर्षांपूर्वी विभक्त झालेले अजित पवार गट आणि शरद पवार गट आता पुन्हा एकत्र येणार का? एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी काँगे्रस एकत्र येण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे, तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी आत्ता विलीनीकरणासाठी तयार नसल्याचे सूर दिसून येत आहे. उपलब्ध सूत्रे, पडद्यामागील घडामोडी आणि अलीकडील बैठका पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफूट मिटवण्याची प्रक्रिया जवळपास पूर्णत्वाकडे गेली आहे. विशेष म्हणजे, या विलीनीकरणाचा आराखडा स्वतः अजित पवार यांनीच त्यांच्या हयातीत तयार केला होता. सातत्याने बैठका घेऊन, दोन्ही बाजूंचे नेते विश्‍वासात घेऊन त्यांनी एक प्रकारे राजकीय सेतू उभारण्याचे काम केले होते. त्यांच्या निधनानंतरही या प्रक्रियेला खंड पडतांना दिसून येत आहे. त्यामुळेच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे सारखे नेते पक्षाला दुसर्‍या बाजूला घेऊन जातांना दिसून येत आहे. खासदार शरद पवारांनी शनिवारी सकाळी बारामतीत पत्रकार परिषद घेऊन अनेक बाबींचा उलगडा केला, त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची कोणतीच कल्पना आपल्याला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी खासदार सुनेत्रा पवार यांची भेट घेतली, यावर कोण नरेश अरोरा आपल्याला माहीत नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीची फरफट करण्याचा प्रयत्न काही नेतेमंडळी करतांना दिसून येत आहे. त्यातून पक्ष वाढीऐवजी पक्ष लयाकडे जाईल, याचा अंदाज सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ  आणि जय पवार या मुलांना देखील येण्याची खरी गरज आहे. प्रश्‍न इथेच संपत नाही. अजित पवार यांच्या पश्‍चात पक्षाची प्रत्यक्ष कमान कोण सांभाळणार, हा तितकाच संवेदनशील मुद्दा आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर ही कमान सोपवण्याची चर्चा सुरू आहे. मात्र सहानुभूती, घराणेशाहीचा प्रभाव आणि अजित पवारांचा वारसा – या तीनही घटकांमुळे त्यांचे नाव पुढे येणे स्वाभाविक मानले जात आहे. मात्र, प्रफुल्ल पटेल यांसारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांच्या दाव्यांमुळे अंतर्गत ओढाताण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच कसोटी राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे भावनिक निर्णय आणि राजकीय व्यवहार्यतेतील समतोल साधण्याची. अजित पवार यांचे निधन ज्या परिस्थितीत झाले, तेही राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे आहे. बारामतीसारख्या त्यांच्या बालेकिल्ल्यात, नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी जात असताना झालेला विमान अपघात केवळ एक दुर्दैवी घटना नाही, तर त्यांच्या अखेरच्या क्षणांपर्यंत असलेली राजकीय सक्रियताही अधोरेखित करतो. त्यामुळेच त्यांच्या नावाभोवती निर्माण झालेली सहानुभूती ही केवळ भावनिक नसून, राजकीय भांडवल ठरण्याची शक्यता आहे.

COMMENTS