Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपाच्या प्रोफेसर कॉलनी संकुलात पोटभाडेकरूंचाच दबदबा

केवळ चारजणच राहिलेत मूळ भाडेकरू, आयुक्त कठोर निर्णयाच्या विचारात

अहमदनगर प्रतिनिधी - मनपाने सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौकातील आपल्या व्यावसायिक संकुलातील गाळेधारकांपैकी किती मूळ गाळेधारक आहेत, याची तपासणी के

रेशनिंग घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी रासकरला अटक
रेमडेसिविर च्या वापरामुळे अनेक रुग्णांवर झाले दुष्परिणाम | पहा १२ च्या १२ बातम्या | LokNews24
तीन दुचाकीसह चार चोरांना पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर प्रतिनिधी – मनपाने सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौकातील आपल्या व्यावसायिक संकुलातील गाळेधारकांपैकी किती मूळ गाळेधारक आहेत, याची तपासणी केल्यावर मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे(Dr. Pankaj Jawle) यांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. या संकुलातील 30 गाळ्यांच्या तपासणीत केवळ चार गाळेधारक मूळ राहिले असून, अन्य 26 गाळ्यांपैकी 3 रिकामे असून, दोन गाळ्यांमध्ये मनपाची व दोन गाळ्यांमध्ये महावितरणची कार्यालये आहेत व राहिलेल्या 19 गाळ्यांमध्ये पोटभाडेकरूंचाच दबदबा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या 30 गाळ्यांव्यतिरिक्त राहिलेल्या गाळ्यांचीही अशी माहिती घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे सगळे पाहून आता आयुक्त डॉ. जावळे हे या संकुलाबाबत ताब्यात घेण्यासह हे गाळे पाडून नवे संकुल उभारण्याबाबत कठोर निर्णयाच्या विचारात आहेत व तसे सुतोवाचही त्यांनी केले आहे.

झपाट्याने विकसित होत असलेल्या सावेडी परिसरातील प्रसिद्ध अशा प्रोफेसर कॉलनी चौकातील मनपाचे खूप वर्षांपूर्वीचे गाळे पाडून तेथे भव्य व्यावसायिक संकुल उभारण्याचे मनपाने ठरवले आहे. पण याला या संकुलातील गाळेधारकांचा आणि त्यांना ताकद देणार्‍या राजकीय मंडळींचा विरोध आहे. प्रोफेसर कॉलनी चौकातील मनपाच्या व्यापारी संकुलात 43 गाळे असल्याचे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात परिसरातील मोकळ्या जागा, स्वच्छतागृहेही पाडून तेथे गाळे केल्याने येथे प्रत्यक्षात 48 गाळे असल्याचे बोलले जाते. ही इमारत जुनी असल्याने महापालिकेने ती पाडून तेथे भव्य व्यावसायिक संकुल उभारण्याचा निर्णय 2015 मध्ये घेतला आहे. सुमारे 11 कोटी रुपये खर्चून होणार्‍या या प्रकल्पावर अनेक आक्षेप घेतले गेले होते. संबंधित जागेचे व्हॅल्युएशन चुकीचे काढल्याचेही दावे झाले होते. त्यावरून राजकीय रणकंदन सुरू असताना दुसरीकडे येथील 43 गाळेधारकांनी महापालिकेच्या व्यावसायिक संकुल उभारणीच्या निर्णयास न्यायालयात आव्हान दिले होते. याची मागील महिन्यात सुनावणी होऊन न्यायालयाने 35 गाळेधारकांच्या याचिका फेटाळल्या. तर राहिलेल्या 8 याचिकांची सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर मनपा आयुक्त डॉ. जावळे यांनी या संकुलात किती मूळ गाळेधारक आहेत, याची माहिती संकलित केली असता येथे मूळ गाळेधारकांनी पोटभाडेकरू घातल्याचे सर्वाधिक गाळे असल्याचे स्पष्ट होत आहे. पहिल्या टप्प्यात 30 गाळेधारकांची अशी माहिती घेतल्यावर फक्त चार मूळ भाडेकरूंचे तेथे व्यवसाय सुरू आहेत व अन्य 26 गाळ्यांपैकी तीन गाळे रिकामे असून, दोन गाळ्यांमध्ये मनपाचीच आरोग्य व वीज विभागाची कार्यालये तसेच दोन गाळ्यांमध्ये महावितरणची बिल भरणा केंद्रे आहेत. तर राहिलेल्या 19 गाळ्यांतून पोटभाडेकरू व्यवसाय करीत असल्याचे मनपाला तपासणीत आढळले आहे.

फक्त चारच मूळ गाळेधारक – प्रोफेसर कॉलनी शॉपींग सेंटरमध्ये मूळ गाळेधारक सचिन शिलवंत यांची सनशाईन गॅलरी आहे. तर नेमीचंद गांधी यांचे दोन गाळ्यांमध्ये शुभम किराणा दुकान आहे. तसेच राजेंद्र धोंगडे यांचे साई सर्व्हीस सेंटर आहे. हे चारही गाळेधारक मूळ आहेत. त्यांनी पोटभाडेकरू घातलेले नाहीत. मात्र, अन्य 19 गाळ्यांमध्ये मूळ गाळेधारकांनी पोट भाडेकरू घातले आहेत. यात भरत कुकरेजा यांनी आकाश खुबचंदानी यांना, दुर्गा कुकरेजा यांनी आकाश खुबचंदानी यांना, प्रदीप सोलट यांनी दोन गाळ्यांपैकी एक आकाश कुलथे व दुसरा मयुर माखिजा यांना, अरुण आडेप यांनी सुनील खंडागळे यांना, रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेने सचिन शिलवंत यांना, दिगंबर म्याना व संतोष लांडगे यांनी अनिकेत ठकार यांना, नारायण बुंदेले यांनी किशोर बुंदेले यांना, नवनीत सहकारी संस्थेने ज्युस सेंटरला, यशवंत ग्राहक भांडारने रमेश सब्बन यांना, मंदाकिनी गाडीलकर यांनी मनोज बलदोटा यांना, वर्षा वाडेकर यांनी अनिरुद्ध कुलकर्णी यांना, सुनीता परदेशी यांनी दिनेश भाटियांना, अशोक परदेशी यांनी दिनेश भाटियांना, लक्ष्मण हर्दवाणी यांनी दोन गाळे अमित घायतडक यांना, रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेने हरदीपसिंग कथुरिया यांना, दीपक सासवडे यांनी सुनील थोरात यांना व धैर्यशील वाडेकर यांनी सागर ठाकूर यांना पोटभाडेकरू म्हणून गाळे दिल्याचे मनपाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे.

काहींनी भाडे भरले ? सावेडी शॉपिंग सेंटरमधील अनेक गाळेधारकांच्या कराराची मुदतही सुमारे 30 वर्षांपूर्वी संपल्याचे सांगितले जाते. यापैकी काही गाळेधारकांनी मनपाकडे पत्रव्यवहार करून करार वाढवून मिळण्याची मागणीही केली होती. पण त्याचा त्यांनी पुुढे पाठपुरावा केला नाही व मनपा प्रशासनानेही त्यात गांभीर्य दाखवले नाही. या पार्श्‍वभूमीवर या गाळेधारकांपैकी काहींनी त्यांची थकबाकी मनपाकडे भरल्याचे समजते. तसेच काहींनी गाळ्यांची रचना बदलली आहे, ज्या व्यवसायांसाठी मनपाने गाळे दिले होते, ते व्यवसाय बंद होऊन तेथे अनेक मोठे व्यवसाय सुरू झाले आहेत, असेही सांगितले जात आहे.

COMMENTS