पाटण / प्रतिनिधी : पतीच्या निधनानंतर हळदी-कुंकू पासून दूर असलेल्या, पंच्याहत्तरीतील आजीनींही हळदी-कुंकू लावून तेवढ्या वरच न थांबता वडालाही फेर्य
पाटण / प्रतिनिधी : पतीच्या निधनानंतर हळदी-कुंकू पासून दूर असलेल्या, पंच्याहत्तरीतील आजीनींही हळदी-कुंकू लावून तेवढ्या वरच न थांबता वडालाही फेर्या मारून विधवा प्रथेला मुठमाती दिली. पाटण तालुक्यातील मालदन गावच्या पानवळवाडी या छोट्याशा वस्तीत तब्बल 19 विधवा महिलांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतल्याने ग्रामस्थांनीही त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी आयोजित केलेल्या या सोहळयात मात्र उपस्थित सर्वांच्याच आश्रुंचा बांध फुटला तरही ही चळवळ अखंडीत चालू ठेवण्याचा निर्धार येथील सर्व महिलांनी केला.
पाटण तालुक्यातील पानवळवाडी ही मालदन ग्रामपंचायतीची छोटीशी वस्ती. बहुतेक कुटुंबे कामाधंद्यानिमित्त परगावी. तर वस्तीवर काही ठराविक कुंटुंबेच वास्तव्य करतात. गावात एखादा कार्यक्रम असला तर सुवासिनीची संख्या खुपच कमी. त्यामुळे येथील लोकांनी हेरवाड पॅटर्नचा आधार घेतला. नुकताच शासनाने ही याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्याचा अधार घेत येथे असलेल्या विधवा महिलांमध्ये प्रबोधन चालू झाले. यासाठी प्रा. ए. बी. कणसे, लक्ष्मण कदम यांनी पुढाकार घेतला.
येथीलच तब्बल 70 वर्षे वयाच्या इंदुकाकीशी चर्चा झाली. त्यांच्याही पतीचे दोनच वर्षांपूर्वी निधन झाले. तरीही त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत त्यांनीच पुढाकार घेतला. संपूर्ण वस्तीत प्रबोधनाची चळवळ चालू झाली. अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर वस्तीतील घराघरात पोहोचले. काही महिलांच्या घरातील मुले-मुली परगावी होते, त्यांच्याशाही संपर्क साधला. त्यांनीही या निर्णयाचे स्वागत करत पाठींबा दिला. जवळपास एक महिन्यापासून चाललेली ही प्रबोधन चळवळीला अखेर यश आले. मंगळवारी सकाळी हा सोहळा पार पडला. यावेळी गावातील सर्व महिलांनी हळदी-कुंकू कार्यंक्रम करून वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाला फेरे मारले. या कार्यक्रमासाठी सत्तरीतील इंदुताई बोत्रे, सुमन चाळके, सरपंच भीमराव गायकवाड, उपसरपंच संदिप पाटील, मान्याचावाडीचे सरपंच रवींद्र माने, शशिकांत बोत्रे, तानाजी बोत्रे, आबासाहेब काळे, अरुण चव्हाण, रवींद्र कदम, सुधीर चव्हाण आदिंची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सरपंच रवींद्र माने म्हणाले, पानवळवाडीतील ग्रामस्थ आणि महिलांनी विधवा प्रथाबंदीची प्रत्यक्षात कार्यवाही करून ऐतिहासिक क्रांती केली आहे. आता एवढ्यावरच न थांबता गावागावात याचा प्रसार झाला पाहिजे. यावेळी जयवंतराव मोरे, लक्ष्मण कदम, आबासाहेब काळे, संदिप पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक प्रा. ए. बी. कणसे यांनी केले. सुत्रसंचालन विलास साळुंखे यांनी केले. आभार अनिता चव्हाण यांनी मानले.
माझ्या पतीचे निधन 2 वर्षापूर्वी झाले आहे. त्यामुळे मला हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी उपस्थित राहता येत नव्हते. त्यावेळी खूप वाई वाटायचे. विधवा प्रथा म्हणजे निरापराध महिलांना दिलेली सामाजिक शिक्षा आहे, असे मला वाटते. या ऐतिहासिक निर्णय गावाने केल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते. अशा शब्दात इंदूबाई बोत्रे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
COMMENTS