पुणे/प्रतिनिधी ः राज्यात ऑगस्ट महिन्यांमध्ये पाऊस न पडल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. आलेले पीक करपतांनाचे पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा
पुणे/प्रतिनिधी ः राज्यात ऑगस्ट महिन्यांमध्ये पाऊस न पडल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. आलेले पीक करपतांनाचे पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये हवामान विभागाने राज्यात 10 ऑगस्टपासून मान्सून सक्रिय होईल आणि 19 ऑगस्टनंतर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र हवामान विभागालाच पाऊस् हुलकावणी देत असल्याचे दिसून येत आहे. येलो अलर्टनंतरही मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा थेंब देखील पडलेला नाही.
हवामान विभागाने सोमवारी देखील विदर्भ, कोकण तसेच घाटमाथा परिसरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र ढगाळ वातावरणाव्यतिरिक्त पाऊस न पडल्यामुळे शेतकर्यांचा हिरमोड होतांना दिसून येत आहे. मान्सूनचा आस हा पूर्व स्थितीकडे आला असल्याने महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. रविवारी विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी उर्वरित विदर्भामध्ये केवळ ढगाळ वातावरण झाले होते. तसेच कोकणात माथेरान येथे पाऊस पडला. उर्वरित कोकण आणि घाटमाथा परिसरात केवळ ढगाळ वातावरण होते. तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस झाला. मराठवाड्यात रविवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे जोरदार पावसाची अपेक्षा होती. अनेक भागात दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. पण प्रत्यक्षात पाऊस झालाच नाही. तर आज औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात सकाळपासून कुठे ऊन तर कुठे ढगाळ वातावरण दिसत आहे. त्यामुळे पावसाचे वातावरण निर्माण होत आहे, पण पाऊस पडत नसल्याने शेतकर्यांची चिंता वाढत आहे. तर, या आठवड्यात चांगला पाऊस न झाल्यास अनेक ठिकाणी खरीपाची पिके वाया जाण्याची भीती आहे.
मराठवाड्यात 71.7 टक्के पावसाची तूट – जुलै महिन्यात झालेल्या पावसावर शेतकर्यांनी पेरणी केली व पिकाची उगवण ही झाली. परंतु, गेल्या वीस दिवसांपासून पाऊस न पडल्याने आणि कडक उन्हामुळे पिके सुकू लागली आहेत. ऑगस्ट महिन्यात तर पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने भयावह स्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील काही भाग सोडल्यास विभागात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. मराठवाड्यात ऑगस्ट महिन्यात तब्बल 71.7 टक्के पावसाची तुट आहे. त्यात आता ऑगस्ट महिना संपण्यासाठी फक्त 9 दिवस शिल्लक राहिले आहेत.
COMMENTS