नाशिक प्रतिनिधी - मला कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरवायचं सुख मला नको, माझ्यात आहे ताकद तेवढी, असं म्हणत महार

नाशिक प्रतिनिधी – मला कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरवायचं सुख मला नको, माझ्यात आहे ताकद तेवढी, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली. मनसेचा १८ वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होत आहे. यावेळी राज ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मनसेचा वर्धापनदिन दरवर्षी महाराष्ट्रातील प्रत्येक प्रमुख शहरात साजरा करण्याचा आमचा मानस आहे. राजकारणात टिकण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट लागते ती म्हणजे पेशन्स. तुमच्या आजूबाजूच्या पक्षांचं यश पाहिलंत तर लक्षात येईल, की संयम महत्त्वाचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली मिळवलेलं यश हे आजचं नाही, तर त्याचं संपूर्ण श्रेय इतकी वर्ष पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं आहे. १९५२ साली पक्ष स्थापन झाला जनसंघ, १९८० मध्ये त्याचं भारतीय जनता पक्ष असं नामकरण झालं. अडवाणी, अटलजी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे अशा अनेकांनी झटल्याने पक्षाला आज यश मिळालं, असं राज ठाकरे म्हणाले. अटलजींचं पहिलं सरकार १३ दिवसाचं, दुसरं १३ महिन्याचं, मग साडेचार वर्ष… मनसेने १८ वर्षात अनेक चढउतार पाहिले, चढ कमीच पाहिले उतारच जास्त पाहिले. पण तुम्हाला यश मिळवून देणार, हा माझा शब्द आहे, त्यासाठी संयम हवा, ठहराव हवा.. मला कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरवायचं सुख मला नको, माझ्यात आहे ताकद तेवढी, असं राज ठाकरे म्हणताच हशा पिकला.
COMMENTS