Homeताज्या बातम्याक्रीडा

यशाच्या शिखरावर असलेल्या टिम इंडियाचा शेअर बाजार एकाएकी कोसळला कसा ?                

क्रिकेट समिक्षक

अनेक दिवसांपासून विश्वचषक विजयाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या टिम इंडियाच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आणि त्या विजया प्रित्यर्थ मिळालेला करंडक प्रत

लाइव्ह सामन्यात गौतम गंभीर आणि श्रीसंत भिडले
टी -२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा… धोनीचाही महत्वाचा ‘रोल’
कोहलीचा नवा मोठा विक्रम

अनेक दिवसांपासून विश्वचषक विजयाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या टिम इंडियाच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आणि त्या विजया प्रित्यर्थ मिळालेला करंडक प्रतिष्ठेचा एशेस जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या हाती गेला. त्यानंतर संपूर्ण भारत दुःखसागरात अक्षरशः डुबून गेला. खेळाडूंनाही त्यांच्या कष्टाचे चिज न झाल्यामुळे अतिव दुःख झाले. याच पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंना भेटण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ड्रेसिंग रूममध्ये गेले. तेथे त्यांनी प्रत्येक खेळाडूंशी हस्तांदोलन करून त्यांचे सात्वंन केले. त्यामुळे खेळाडूंच्या शिरावरील तणाव काहीसा कमी झालाही असेल. मात्र त्यानंतरही या अनपेक्षीत पराभवानंतर संपूर्ण देशभर चर्चा सुरू होती की संपूर्ण स्पर्धेत १०० % बुलेटप्रुफ कामगिरी करणाऱ्या टिम इंडियाचे सुरक्षा कवच फाटलेच कसे कि त्यातून थेट विजयाचे कवचकुंडल गळून पडले ?

             सामन्यासाठी बनवलेली खेळपट्टी सर्वात प्रथम चर्चेचा विषय बनली. एवढ्या महत्वाच्या व निर्णायक सामन्यासाठी अशी खेळपट्टी बनवलीच कशी की, ती थेट टिम इंडियावरच बुमरँग सारखी उलटली ? नेहमीच्या सामन्यांसारखी फलंदाज धार्जिणी खेळपट्टी बनवली असती तर प्रबळ भारतीय फलंदाजांनी चारशेच्यावर धावा ठोकून आपल्या गोलंदाजांना योग्य ते पाठबळ दिले असते. त्यामुळे विजय साकारण्यात मदत झाली असती. शिवाय प्रेक्षागारात बसलेले जवळ जवळ दिड लाख प्रेक्षक सुतकी चेहरे घेऊन गेले नसते व संपूर्ण देश शोकसागरात डुबला नसता. अशी खेळपट्टी उपांत्य सामन्यात न्यूझिलंडविरुद्ध होतीच ना ?

               दुसरे महत्वाचे असे की, दिड महिना आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेल्या टिम इंडियाच्या मनात कसली धडकी भरली होती की, त्याचा अतिरिक्त ताण थेट खेळाडूंच्या मानसिकतेवरच झाला. टिम इंडियाचे सर्व पंधरा खेळाडू पूर्ण जोशात होते. तसे प्रत्येकाने वेळोवेळी सिद्धही केले असल्याने कोणाच्याही क्षमतेविषयी शंका नव्हती. एखाद्या दडपणाच्या परिस्थितीत एखाद -दोन खेळाडूंचा खेळ खराब होऊ शकतो. पण एका वेळेस सर्वच खेळाडू साफ कोसळले कसे ? कधी फलंदाज अपयशी ठरले तर गोलंदाज त्यावर पांघरून घालून संघाला विजयी करायचे, तर कधी गोलंदाजांच्या अडचणीत फलंदाज त्यांना सावरून घ्यायचे. मात्र या महत्वाच्या सामन्यात नेमकं काय झालं ? धावांचे इमल्यावर इमले रचणारे, शतकांचा महापूर आणणारे फलंदाज एकाएकी गारठले कसे ?  एरवी बळींचे गोदामं भरणारे गोलंदाज नेमके याच सामन्यात अवसान कसे हरवून गेले ? आपल्या कणखर व चाणाक्ष नेतृत्वाने सर्व जगात लोकप्रिय झालेल्या कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वगुणांचा महासागर एकदम आटला कसा ? गुरूंचा गुरु म्हणून ख्याती प्राप्त, अनुभवांचा खजिना जवळ असलेला सर्वज्ञानी गणला जाणारा प्रशिक्षक राहुल द्रविड अचानक बोथट कसा झाला ?

या सर्व प्रश्नांचे उत्तरं अजूनही अनुत्तरीतच आहे–  हो, आपण समजू शकतो समोरचा संघ चांगला खेळला. खेळाच्या सर्वच क्षेत्रात ते वरचढ ठरले. पण याच संघाला सलामीच्या साखळी सामन्यात भारताने हरविलेच होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनेही कांगारूंना लोळविले होते. मात्र त्यानंतर त्यांच्या संघात बदल झाले. नवीन खेळाडू आले. त्यांनतर त्यांनी सलग आठ विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. त्या विजयांत त्यांचा सांघिक खेळ होत नव्हता तर प्रत्येक सामन्यात वेगवेगळा खेळाडू चमकून जायचा. ऑस्ट्रेलियन संघ यापूर्वी पाच वेळा विश्वविजेता होता, त्यांना अंतिम सामने खेळण्याचा अनुभव होता. ५ ते ६ खेळाडू मागच्या विजयी संघातही होते. परंतु अहमदाबादच्या स्टेडियममध्ये सुमारे दिड लाख भारतीय समर्थकांसमोर खेळताना कागारूंच्या खेळाचा आलेख ढासळण्या ऐवजी उंचावला. तर  यशोशिखरावर असलेल्या 

भारतीय संघाचा शेअर बाजार कोळसळा कसा ?– खरे तर ऑस्ट्रेलियन्स या दबावाच्या प्रसंगात गोंधळायला हवे होते. मात्र तसे न होता. यजमान संघ एखाद्या लाजऱ्या बुजऱ्या नववधू सारखा बावरला.  एवढया साऱ्या प्रश्नांनी डोक्यात थैमान घालत असताना काही ठिकाणी दबक्या आवाजात चर्चा होती, हा सामना सट्टेबाजांनी फिक्स तर केला नव्हता ना ? कारण भारतच विजयाचा प्रबळ दावेदार होता. भारतावर डाव लावणाऱ्यांचे प्रमाण मोठे असल्याने सटोडियांना भारत जिंकल्यावर घाटा होणार होता, म्हणून त्यांनी ऐनवेळी चक्र फिरवून भारताच्या पराभवाचा घाट घातला व ऑस्ट्रेलियाला विजयी केले. परंतु या गोष्टी अतिशय दक्ष असलेल्या आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या लक्षात येऊ शकतात व आयसीसी असे होऊ देणार नाही आणि कदाचित फिक्सिंग वगैरे झालेही नसेल. असे असते तर भारतीय खेळाडू धाय मोकलून रडत बसले नसते. तसेच पंतप्रधानही त्यांचे सांत्वन करायला गेले नसते.

                 मग भारताच्या पराभवाचं नेमकं कारण काय हे कोडं आहे तसंच अनुत्तरीत आहे. भारत द्विपक्षीय मालिका सहज जिंकते, आयसीसी स्पर्धात साखळीत गुणतालिकेत अव्वल ठरते. नेमकं नॉकआऊट सामन्यात पचकते. यावेळी तर उपांत्य फेरीचा अडथळाही पार केला. मग अंतिम फेरीतच घोडे का अडले ? अंतर्गत हेवेदावे जागृत तर झाले नाही ? का दृष्ट प्रवृत्तींच्या वाईट नजरेचा कोप झाला ? तमाम भारतीयांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर सध्या जरी नसलं. तरी जून २०२४ मध्ये वेस्ट इंडिज -अमेरिकेत होणाऱ्या वीस देशांच्या टि -२० विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळवून टिम इंडिया नक्कीच भारतीयांच्या दुःखावर पांघरून घालेल. मात्र या संघाचा कर्णधार रोहित शर्मा अथवा विराट कोहली नसावा.

लेखक – डॉ.दत्ता विघावे क्रिकेट समिक्षक

COMMENTS