महाराष्ट्रात चळवळीच्या इतिहासामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारे प्राध्यापक मा.म. देशमुख यांचे काल निधन झालं. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातल्या

महाराष्ट्रात चळवळीच्या इतिहासामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारे प्राध्यापक मा.म. देशमुख यांचे काल निधन झालं. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातल्या वैचारिक प्रबोधनाच्या चळवळीत पोकळी निर्माण झाली असली; तरी, त्यांनी लिहिलेलं सकस साहित्य, महाराष्ट्राच्या जनतेला आणि तरुणांना सतत मार्गदर्शन करत राहील! प्राध्यापक मा.म. देशमुख यांनी लिहिलेली पुस्तके, इतिहासविषयक दृष्टिकोन विकसित करणारी आहेत. इतिहासामध्ये अनेक घटनाक्रम जे घडलेले असतात, त्या घटनाक्रमाचा योग्य क्रम लावून त्याचा अन्वयार्थ काढण्याची बाब, इतिहासकारांना करावी लागते. त्या दृष्टीने म्हटले तर, प्राध्यापक मा. म. देशमुख हे संशोधक म्हणून इतिहास लेखन करीत नव्हते; तर, त्यांच्या काळी सुरू झालेल्या बहुजन चळवळीच्या वैचारिक गरजेतून मध्ययुगीन इतिहासाला त्याच्या घटना क्रमातूनच समजावणारा, ऐतिहासिक दृष्टिकोन त्यांनी तरुणांपर्यंत नेण्यामध्ये मोठी भूमिका बजावली. यामध्ये, एखाद्या इतिहासकाराला लोकप्रियता मिळण्याची अभूतपूर्व घटना महाराष्ट्राने पाहिली. मा. म. देशमुख यांनी लिहिलेल्या पुस्तकांना महाराष्ट्रातल्या बहुजन चळवळीतील तरुणांची प्रचंड मागणी असायची. त्यांच्या पुस्तकांचा संच हा महाराष्ट्रातील तरुण आवडीने विकत घेतात आणि घ्यायचे! इतिहासाचे लेखन, सोप्या भाषेत इतिहासाचा दृष्टिकोन समजवताना अगदी ओघवती आणि सहज भाषा, त्यात लालित्यापेक्षाही आक्रमकता ही अधिक ठेवून, त्यांनी आपलं लेखन केलं. खास करून इतिहासाच्या लेखनाला वाचक फार कमी असतो. परंतु, मा. म. देशमुख हे त्याला अपवाद ठरले. त्यांच्या इतिहास मांडणीच्या दृष्टिकोनात त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य दडलेले आहे. मध्ययुगीन इतिहासाला समजावून सांगताना, त्यांनी ज्या प्रकारे १५ : ८५ चा सिद्धांत, जो बहुजन चळवळीचे अधिष्ठान होता, तोच त्या इतिहासाच्या आकलनाला लावून, ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली, ती वस्तुनिष्ठ होती. चळवळीतील कार्यकर्त्यांनी, समाजातील बुद्धिजीवी वर्गाने ही मांडणी स्वीकारली आणि या स्वीकारांमध्येच त्यांची लोकप्रियता आहे. नागपूर सारख्या शहरामध्ये त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या विरोधात बंदीची मागणी ही करण्यात आली होती. तत्कालीन सरकारने त्यांच्या पुस्तकांवर बंदीही घातली होती. परंतु, या बंदी विरोधात महाराष्ट्रातील बहुजन जनतेने लढा दिला आणि तो जिंकला. बॉम्बे हायकोर्टाने त्यांच्या पुस्तकांवरची बंदी हटवली आणि त्यानंतर माम देशमुख यांच्या पुस्तकांचा खप महाराष्ट्रामध्ये आणखीच दुपटीने वाढला. एखाद्या इतिहास लेखन करणाऱ्या लेखकाविषयी अशा प्रकारचा अनुभव हा भारतामध्ये तरी निश्चितपणे वेगळा आहे, नवा आहे! आणि यामध्येच मा म देशमुख यांचं मोठेपण सामावलेले आहे. ८० च्या दशकापासूनच त्यांचं लेखन महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय होऊ लागलं होतं. त्यांच्या लेखनाला डोक्यात आणि डोक्यावर घेणारा तरुण वर्ग महाराष्ट्रात होता आणि आजही आहे. आज चाळीशी-पन्नाशीत असले तरीही, माम देशमुख यांच्या ग्रंथातून त्यांचं झालेलं प्रबोधन, आजही प्रत्येकाच्या डोक्यातही आहे आणि मनातही आहे. फार क्वचितच इतिहासामध्ये एखाद्या लेखकाला अशी लोकप्रियता लाभली असेल. ही लोकप्रियता लाभण्यामागे त्यांचा दृष्टिकोन जसा आहे, तसा त्यांच्या पाठीमागे बहुजन चळवळीची कार्यकर्त्यांची फळी जी खंबीरपणे उभी राहिली, ती देखील महत्त्वाचे आहे कारण आहे. आपण लिहीत असलेल्या नव्या दृष्टिकोनाला लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यासाठी संघर्ष स्वीकारणं यामधून जे पुढे जात असतात, त्यांना इतिहास निश्चितपणे लोकप्रिय बनवतो. इतिहास लेखक म्हणून माम देशमुख लोकप्रिय तर झालेच; परंतु, त्यांच्याविषयी समग्र महाराष्ट्र कसा विचार करतो हे देखील, समाज माध्यमांच्या भरभरून आलेल्या प्रतिक्रियांमधून आपल्यासमोर स्पष्ट होतं; तरीही, माम देशमुख यांनी इतिहास मांडून, फुले-शाहू-आंबेडकरवाद स्वीकारला. बुद्धालाही त्यांनी स्वीकारले. परंतु, जेव्हा प्रत्यक्षात बुद्ध आपल्या आचरणशील जीवनासाठी स्वीकारण्याचा भाग आला, त्यावेळी, माम देशमुख हे शिवधर्माकडे सरकले. इथून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, विचारांची, लेखनाची समीक्षा व्हायला लागली. परिणामी त्यांना महाराष्ट्रातील कार्यक्रमांची संख्या ही रोडावली आणि हळूहळू ते चळवळीच्या परिघातून बाहेर होत गेले. अलीकडे तर काही वर्षांपासून वृद्धावस्था ने त्यांना गाठलं होतं. अतिशय आक्रमक इतिहास लेखन करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने वयाच्या ९० मध्ये जगाचा निरोप घेतला; ही बाब देखील त्यांच्या व्यक्तिमत्व संदर्भात स्पृहणीय आहे; कारण, दीर्घायुष्य त्यांनाच मिळतं, जे आपल्या आयुष्याला एखाद्या कार्यासाठी समर्पित करतात! माम देशमुख यांचे आयुष्य बहुजन चळवळीला असे समर्पित राहिले, त्यांना विनम्र अभिवादन.
COMMENTS