Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासकीय सेवा झाल्या ठप्प

कार्यालये पडली ओस संपामुळे जनतेचे हाल

मुंबई/प्रतिनिधी ः जुन्या पेन्शन योजनेसाठी मंगळवारी शासकीय कर्मचार्‍यांनी संप पुकारल्यामुळे दिवसभर बहुतांश सेवा ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.  काही

प्रवराच्या कृषी महाविद्यालाचा जर्मनीतील कंपन्यांशी सामंजस्य करार
यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्याला आचारसंहितेचा अडसर
करमाळा ते संगोबा रस्त्याच्या कामाची चौकशी करून ठेकेदार व अधिकाऱ्यावर कारवाई करावी (Video)

मुंबई/प्रतिनिधी ः जुन्या पेन्शन योजनेसाठी मंगळवारी शासकीय कर्मचार्‍यांनी संप पुकारल्यामुळे दिवसभर बहुतांश सेवा ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.  काही महापालिकांमध्ये अधिकारी व कंत्राटी कर्मचार्‍यांकडून कामकाज सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरु असले तरी जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व अनुदानित शाळा-महाविद्यालये, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आणि अनेक शासकीय रुग्णालयांमधील आंतररुग्ण सेवेचाही बोजवारा उडाला आहे. तर अनेक जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांनी देखील संपात उडी घेतल्यामुळे आरोग्यव्यवस्था कोलडमडल्याचे दिसून येत आहे.
संपामुळे मुंबई, पुणे, अहमदनगर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, आणि नाशिकसह राज्यातील शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. परिणामी सामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुण्यातील आरटीओ विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात संपात सहभागी झाले आहेत. त्यातच आता पुण्यातील ससून रुग्णालयातील कर्मचारी आणि छत्रपती संभाजीनगरमधील घाटीतील कर्मचार्‍यांनी संपात सहभाग घेतल्यामुळे आरोग्ययंत्रणा कोलमडल्याचे दिसून आले. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय, विधान भवन, मध्यवर्ती शासकीय इमारत, नवीन प्रशासकीय इमारत येथील शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. शैक्षणिक तसेच अन्य कामासाठी लागणारे दाखले, जमीन किंवा इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी, तसेच जातीचे प्रमाणपत्र, जयंती-उत्सव काळात लागणारे परवाने, तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणार्‍या कागदपत्रांची पूर्तता, आधार प्रमाणीकरण, केवायसी अपडेट आदी कामांसाठी विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांचा तहसील कार्यालयात राबता असतो. ही कामे संपामुळे ठप्प झाली आहेत.जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या राज्य कर्मचार्‍यांच्या संपाला ससून सर्वोपचार रुग्णालयातील सुमारे 90 टक्के कर्मचार्‍यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होऊ नयेत, यासाठी मार्डच्या डॉक्टरांकडून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्याची माहिती आहे. रुग्णालयाच्या बी.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचीही सेवेसाठी मदत घेतली जात असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. नागपुरात राज्य कर्मचार्‍यांसह शिक्षक मोठ्या प्रमाणात संपात सहभागी झाले आहेत. याशिवाय शहरातील अनेक रुग्णालयात काम करणारे डॉक्टरांनी देखील संपात सहभागी होत जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी निदर्शने केली आहेत. मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये आंतर रुग्ण विभागातील सेवा आणि शस्त्रक्रियेवर कर्मचारी संपाचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातही कर्मचारी संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. मराठवाड्याची जीवनदायीनी असलेल्या घाटी रुग्णालयातील अनेक कर्मचारी संपात सहभागी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या संपामुळे सामान्यांना मोठा फटका बसत आहे.

आरोग्यव्यवस्था कोलमडली – शासकीय रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ डॉक्टरांच्या मदतीने बाह्यरुग्ण विभागातील कामकाज सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न शासकीय रुग्णालयांमध्ये करण्यात आला. पण रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णसेवेला मात्र चांगलाच फटका बसला आहे. कारकून, वॉर्डबॉय, परिचारिका, दाया आणि अन्य कर्मचारी संपात उतरल्याने दाखल रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयातील एक्सरे, सोनोग्राफी, रक्ततपासणी आणि अन्य वैद्यकीय चाचण्यांवरही परिणाम झाला आहे.

जुन्या पेन्शनसाठी सकारात्मक ः मुख्यमंत्री शिंदे – येत्या काळात जुन्या पेन्शन धारकांच्या प्रश्‍नांवर विचार केला जाणार असून, त्यासाठी आम्ही सकारात्मक असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जुन्या पेन्शनबाबत तीन महिन्यात समिती अहवाल देणार असून आता कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा, आम्ही सकारात्मक आहोत, याबरोबरच आम्ही निर्णय घेण्याची तयारी केली आहे. फक्त कर्मचार्‍यांनी संयम ठेवावा. त्यांची भूमिका आम्हाला समजावून घ्यायची आहे. हा जो प्रश्‍न आहे तो चर्चेनं सुटेल हे लक्षात घ्यावे. असेही आवाहन ही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

COMMENTS