Homeताज्या बातम्यादेश

ओडिशाच्या 3 जिल्ह्यांत सापडले सोन्याचे साठे

भुवनेश्‍वर/वृत्तसंस्था : जम्मू-काश्मिरात लिथियम आढळल्यानंतर आता ओडिशातून सोन्याच्या खाणी गवसल्याची आनंदवार्ता आलीय. राज्यातील देवगड, केओंझार आणि

रायगडावर अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा
खदानीच्या डबक्यात बुडून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू.
येवल्यात ब्रह्माकुमारी वासंती दिदी यांचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न (Video)

भुवनेश्‍वर/वृत्तसंस्था : जम्मू-काश्मिरात लिथियम आढळल्यानंतर आता ओडिशातून सोन्याच्या खाणी गवसल्याची आनंदवार्ता आलीय. राज्यातील देवगड, केओंझार आणि मयूरभंज या तीन जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे सापडल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ओडिशाच्या खाण मंत्र्यांनी ही माहिती दिली.
 यासंदर्भात त्यांनी सांगितले की, गेल्या 2 वर्षांपासून भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि ओडिशाचे भूविज्ञान संचालनालय याबाबत सर्वेक्षण करत होते. ओडिशातील 3 जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे असल्याची माहिती पुढे आली आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि ओडिशाच्या भूगर्भशास्त्र संचालनालयाने देवगड, केओंझार आणि मयूरभंजमध्ये सोन्याचे साठे असल्याचे संकेत दिले आहेत. या तीन जिल्ह्यांतील ज्या भागात सोन्याचा साठा दर्शविला गेला आहे त्यामध्ये दिमिरमुंडा, कुष्कला, गोटीपूर, केओंझार जिल्ह्यातील गोपूर, मयूरभंज जिल्ह्यातील जोशीपूर, देवगड जिल्ह्यातील सुरियागुडा, रुन्सिला, धुशुरा हिल आणि अडास यांचा समावेश आहे. या क्षेत्रातील पहिले सर्वेक्षण खाण आणि भूविज्ञान संचालनालय आणि जीएसआय यांनी 1970 आणि 1980च्या दशकात केले होते. परंतु, त्याचे निकाल सार्वजनिक करण्यात आले नव्हते. राज्याचे खाण मंत्री प्रफुल्ल कुमार मलिक म्हणाले की, जीएसआयने गेल्या दोन वर्षांत या तीन जिल्ह्यांमध्ये आणखी एक सर्वेक्षण केले आहे. ढेंकनालचे आमदार सुधीर कुमार सामल यांनी विधानसभेत सोन्याच्या साठ्याशी संबंधित प्रश्‍न विचारला होता. याला उत्तर देताना प्रफुल्ल कुमार यांनी तीन जिल्ह्यांमध्ये ’खजिना’ सापडल्याची सांगितली. मात्र, सध्या तीन जिल्ह्यांत सापडलेल्या सोन्याच्या साठ्यात किती सोन्याचे प्रमाण आहे, हे स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी, जम्मू आणि काश्मीरमध्ये सापडलेला लिथियमचा साठा 5.9 दशलक्ष टन आहे. जो चिली आणि ऑस्ट्रेलियानंतर जगातील सर्वात मोठा आहे. या शोधानंतर भारत लिथियम क्षमतेच्या बाबतीत तिसर्‍या क्रमांकावर आला आहे. लिथियम हा असा नॉन-फेरस धातू आहे, ज्याचा वापर मोबाईल-लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहनांसह अनेक वस्तूंसाठी चार्ज करण्यायोग्य बॅटरी बनवण्यासाठी केला जातो. या दुर्मिळ पृथ्वी घटकासाठी भारत सध्या इतर देशांवर अवलंबून आहे. जगातील लिथियम साठ्याची स्थिती पाहिली तर या बाबतीत चिली 9.3 दशलक्ष टनांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलिया 63 लाख टनांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. काश्मीरमध्ये 59 लाख टन साठा मिळाल्यानंतर भारत तिसर्‍या क्रमांकावर आला आहे. अर्जेंटिना 27 दशलक्ष टन साठ्यासह चौथ्या, चीन 2 दशलक्ष टन साठ्यासह पाचव्या आणि अमेरिका 1 दशलक्ष टन साठ्यासह सहाव्या स्थानावर आहे. आत्तापर्यंत भारतात आवश्यक असलेल्या लिथियमपैकी 96 टक्के लिथियम आयात केले जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च करावे लागते.

COMMENTS