नाशिक:- लेखक समाजाकडे हजार डोळ्यांनी पाहत राहतो आणि त्याला दिसलेलं लेखनातून समाजाला सांगत राहतो. या सांगण्यामध्ये त्याचं गाव असतं, अनुभव असतात.
नाशिक:- लेखक समाजाकडे हजार डोळ्यांनी पाहत राहतो आणि त्याला दिसलेलं लेखनातून समाजाला सांगत राहतो. या सांगण्यामध्ये त्याचं गाव असतं, अनुभव असतात. माणूस पोटापाण्याच्या निमित्ताने शहरात आला आणि तिथेच स्थिरावला; तरीही त्याची नाळ आजही मातीशी घट्ट जुळलेली असते. राजेंद्र उगले यांच्या ‘काळाच्या कॅमेऱ्यातून’ अशा विविध गुजगोष्टी ऐकू येतात, असे प्रतिपादन मविप्र शिक्षणाधिकारी आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ.भास्कर ढोके यांनी केले.
ग्रंथालयभूषण मु.शं.औरंगाबादकर सभागृहात कवी आणि अभिनेते राजेंद्र उगले यांच्या वैशाली प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘काळाच्या कॅमेरातून’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. लेखकासह मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, कवी प्रा.लक्ष्मण महाडिक, विवेक उगलमुगले, प्रकाशक विलास पोतदार, मातोश्री दगूबाई उगले, संजय उगले, मनीषा उगले मंचावर उपस्थित होते.
डॉ.ढोके पुढे म्हणाले की, राजेंद्र उगले यांची लेखनशैली प्रवाही आहे. त्यामुळे हे लेख वाचताना ते आपल्याशी संवाद साधत आहेत, असे वाटते. प्रा.लक्ष्मण महाडिक यांनी या पुस्तकातील सौंदर्यस्थळे उलगडून सांगतानाच हे लेखन वाचताना माणूस अंतर्मुख होतो आणि आपल्या आठवणींचे खोदकाम करतो. हे लेखन वाचकाला नक्कीच भावेल, असे सांगितले. विजयकुमार मिठे यांनी राजेंद्र उगले यांचा लेखनप्रवास उलगडून दाखवला तर विवेक उगलमुगले यांनी साहित्याच्या सर्व प्रकारांत उगले यांनी मुशाफिरी केली असल्याचे गौरवोदगार काढले. रवींद्र परदेशी यांनी राजेंद्र उगले यांची बालपणापासून तर आजपर्यंत माणूस, लेखक आणि मित्र म्हणून एक-एक बाजू उलगडून दाखवली. ॲड.नितीन ठाकरे म्हणाले की, सध्याच्या काळात आपण आपल्या डोळ्यांनी कमी आणि मोबाईलच्या कॅमेऱ्यातून जास्त बघत असतो. राजेंद्र उगले यांचा ‘काळाचा कॅमेरा’ मात्र या सगळ्यांना नवी दिशा नक्कीच देईल; याची खात्री आहे, असे सांगितले.
प्रयोगशील नाटककार दत्ता पाटील आणि ख्यातनाम दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी पुस्तकातील निवडक लेखांचे अभिवाचन करून उपस्थितांची मने जिंकली. साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह जिल्ह्यातील रसिक उपस्थित होते. गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी प्रास्ताविक आणि प्रेरणा उगले यांनी स्वागतगीत सादर केले. प्रा.राजेश्वर शेळके यांनी स्वागत केले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन तर मनीषा उगले यांनी आभार मानले. अरुण इंगळे यांनी पसायदान सादर केले.
COMMENTS