खंडाळा तालुक्यातील तोतयास बेड्या : सातारा एलसीबीची कारवाईगोंदवले / वार्ताहर : मी स्वत: सैन्य दलात असून माझी आतमध्ये ओळख आहे. तुम्हाला भरती व्हायचे अस
खंडाळा तालुक्यातील तोतयास बेड्या : सातारा एलसीबीची कारवाई
गोंदवले / वार्ताहर : मी स्वत: सैन्य दलात असून माझी आतमध्ये ओळख आहे. तुम्हाला भरती व्हायचे असेल तर मला पैसे द्या, असे खोटे सांगुन 15 लाख 60 हजार रूपये घेवून फसवणुक करणार्या तोतया सैन्य अधिकार्यास सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाच्या पथकाने प्रवीण शिवाजी मरगजे (रा. कान्हवडी, ता. खंडाळा) याला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी सातारा जिल्ह्यात दोन पोलिस ठाण्यात त्याच्या विरूध्द तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सैन्य दलात नोकरीस नसतानाही एकजण माण-खटाव तालुक्यातील युवकांना व त्यांच्या पालकांची फसवणूक करत असल्याची माहिती भारतीय सैन्य दलास मिळाली त्यानुसार त्यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती घेण्यास एलसीबीचे पोनि किशोर धुमाळ यांना सांगीतले. एलसीबीने याप्रकरणी तपासाला सुरूवात केल्यानंतर संशयिताने आतापर्यत सचिन खरात (रा. शिंदी, ता. माण) मनिषा निकाळजे (रा. डांबेवाडी, ता. खटाव), आप्पासाहेब जानकर (रा. शिंगाडवाडी, ता. खटाव) या तिघांची फसवणूक केल्याचे समोर आले.
एलसीबीने त्यानुसार तक्रारदारांना संबंधित पोलीस ठाण्यामध्ये तक्रार द्यायला लावले. वडूज पोलीस ठाण्यात दोन व दहिवडी पोलीस ठाण्यात एक असे तीन गुन्हे दाखल झाल्यानंतर एलसीबीने संशयित आरोपी प्रवीण मरगजे याला अटक केली. दहिवडी पोलिसांकडे संशयिताचा ताबा दिल्यानंतर प्राथमिक चौकशी केली असता त्याने फसवणूक केल्याची कबुली दिली. तपासी अधिकारी सपोनि संतोष तासगावकर यांनी संशयितांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान ही कारवाई सपोनि रमेश गर्जे, पोलीस उत्तम दबडे, तानाजी माने, संतोष सपकाळ, शरद बेबले, मंगेश महाडीक, प्रवीण फडतरे, लक्ष्मण जगदने, प्रमोद सांवत, अमित सपकाळ, गणेश कापरे, अजित कर्णे, निलेश काटकर, केतन शिंदे, रोहित निकम यांनी कारवाईत सहभाग घेतला.
COMMENTS