मुंबई/जळगाव : राज्यात सध्या उष्णतेचा कहर बघायला मिळत असून, विदर्भात अनेक जिल्ह्यांनी 42 अंश तापमानाची सीमा ओलांडली आहे. वाढत्या उष्माघाताने मृत्यूचे
मुंबई/जळगाव : राज्यात सध्या उष्णतेचा कहर बघायला मिळत असून, विदर्भात अनेक जिल्ह्यांनी 42 अंश तापमानाची सीमा ओलांडली आहे. वाढत्या उष्माघाताने मृत्यूचे प्रमाण वाढले असून, काल राज्यात चार जणांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जळगावमध्ये दोघांचा तर नागपूरमध्ये उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पार सतत वाढत असल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक घराबाहेर न पडतांना देखील विचार करत आहेत. दरम्यान सावलीचा व थंड पेयाचा आधार घेत आहेत. जळगाव आणि विदर्भात उन्हाने कहर केला आहे. नागपूर शहरातील सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिजर्व बँक चौकात एका व्यक्तीचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. तर दुसरी घटना कॉटन मार्केट परिसरात घडली आहे. जळगावात आणखी एकाचा उष्माघाताने बळी घेतला आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबार येथील 48 वर्षीय शेतमजुराचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. उष्णाघाताचा चाळीसगाव तालुक्यात पहिला तर जळगाव जिल्ह्यातील दुसरा बळी गेल्याने संपुर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. सुंदरलाल सुकदेव गढरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुंदरलाल सुकदेव गढरी हे सकाळी नेहमीप्रमाणे बकर्या चारण्यासाठी गेले असतांना त्यांना अचानक चक्कर आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत सुंदरलाल गढरी यांची घरची परिस्थिती बेताची व गरीबीची आहे. मोलमजुरी करून तसेच बकर्या चारून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत चालवत होते. सुंदरलाल यांच्या मृत्युनंतर मेहूणबार परिसरात एकच शोककळा पसरली आहे. दरम्यान मृत गढरी यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे. सुंदरलाल गढरी हे घरातील कमावता व्यक्ती असल्याने त्यांचा परिवार आज उघड्यावर पडला आहे. उष्माघाताची तालुक्यात ही पहिलीच घटना असून जळगाव जिल्ह्यातील उष्माघातामुळे मृत्यू पावल्याची ही दुसरी घटना समोर आली आहे. विदर्भ व त्यानंतर मराठवाड्यात सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. चंद्रपूर, अकोला येथे तापमानाचा पारा 43 अंशांच्या पुढे, तर वर्धा, यवतमाळ, अमरावती, सोलापूर, धुळे, परभणी येथे तापमान 42 अंशांच्या पुढेच आहे. महाराष्ट्रात आता उष्णतेची लाट ओसरली असली तरी उन्हाचा चटका कायम राहिल, असे केंद्रीय हवामान विभागाने म्हटले आहे. तर, राजस्थान, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, गुजरात राज्यात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
अकोल्यात देशातील उच्चांकी तापमानाची नोंद
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून, विदर्भातील अनेक जिल्ह्यात 43 अंशांच्या वर तापमानाची नोंद करण्यात येणार आहे. गेल्या 24 तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोद झाली आहे. आजदेखील राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो दुपारी घराबाहेर पडणे टाळावे. काही काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
COMMENTS