अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीत चार जागा बिनविरोध झाल्याचा आनंद सहकार पॅनेलने ढोल-ताशांचा गजर करीत व गुलालाची मुक्त उधळण करीत साजरा
अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीत चार जागा बिनविरोध झाल्याचा आनंद सहकार पॅनेलने ढोल-ताशांचा गजर करीत व गुलालाची मुक्त उधळण करीत साजरा केला. यावेळी बोलताना सहकार पॅनेलचे नेते व मनपाचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी विरोधी बँक बचाव कृती समिती पॅनेलवर टीका केली. विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळेच त्यांच्यावर माघार घेण्याची नामुष्की आली, असा दावा गांधी यांनी केला.
अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दिवसभर नाट्यमय घटना घडत विरोधी सर्व उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने सहकार पॅनलचे चार उमेदवार सायंकाळी बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. सर्व प्रमुख विरोधकांनी माघार घेतल्याने निवडणूक संपल्यातच जमा आहे. त्यामुळे सुवेंद्र गांधीच्या नेतृत्वाखालील सहकर पॅनलच्या सर्व उमेदवारांनी व समर्थक कार्यकर्त्यांनी जल्लोष करत रात्री स्व.दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी सुवेंद्र गांधी यांना खांद्यावर घेत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी गुलालाची उधळण करत ढोल-ताशाच्या गजरात स्व.दिलीप गांधी यांचा फोटो डोक्यावर घेत समर्थकांनी जल्लोष केला.
यावेळी बोलताना गांधी म्हणाले, जनता जनार्दन हे कायम चांगले काम करणार्यांच्या पाठीशी असतात. स्व.दिलीप गांधींनी आयुष्यभर बँकेसाठी, बँकेच्या उन्नतीसाठी काम केले आहे. त्यामुळे सभासद आमच्या पाठीशी नेहमी होते. विरोधकांनी व्यक्तीद्वेषातून चुकीचे आरोप केले, मात्र सभासदांनी त्यांना काहीच प्रतिसाद दिला नसल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरली होती. त्यामुळेच त्यांच्यावर माघार घेण्याची नामुष्की आली आहे. खरे काय व खोटे काय आहे, हे जनतेला सर्व काही माहीत आहे. आता आमचे चार उमेदवार बिनविरोध झाले आहेत, येत्या दोन-चार दिवसानंतर सर्व पॅनल बिनविरोध होईल, असा विश्वास मला आहे, असे सांगून ते म्हणाले, यासाठी खा.सुजय विखे यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले, अनेक इतर पक्षातील नेत्यांनी व मित्रांनी भरपूर मदत केली. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी निवासस्थानी येवून गांधी कुटुंबाला दिलेला आधार व पाठिंबा यामुळे मिळत असलेला हा विजय स्व.दिलीप गांधी यांना खरी श्रद्धांजली आहे. कायम सत्याचाच विजय होत असतो, त्यामुळेच बँकेच्या इतिहासात प्रथमच असा चमत्कार घडला आहे, अशी भावना गांधी यांनी व्यक्त करत आता नव्या उत्साहात अधिक काम करत बँक पाच हजार कोटींची करण्याचे स्व.दिलीप गांधी यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, असे ते म्हणाले. यावेळी बिनविरोध निवडून आलेले दिनेश कटारिया, संगीता गांधी, मनीषा कोठारी व मनेष साठे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहकार पॅनलचे उमेदवार अशोक कटारिया, दीप्ती गांधी, अनिल कोठारी, शैलेश मुनोत, राजेंद्र अग्रवाल, अजय बोरा, महेंद्र गंधे, संपत बोरा, गिरीष लाहोटी, ईश्वर बोरा, राहुल जामगावकर,अतुल कासट, कमलेश गांधी, सचिन देसर्डा आदींसह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
दिलीप गांधींचा जयजयकार
माजी केंद्रीय मंत्री स्व. दिलीप गांधी यांचे वर्चस्व असलेल्या नगर अर्बन बँकेत त्यांच्या पश्चातही युवा नेते सुवेंद्र गांधी यांनी सहकार पॅनलची धुरा सांभाळत नेतृत्व सिद्ध केले आहे. यावेळी श्रीमती सरोज गांधी यांनी स्व.दिलीप गांधी यांच्या फोटोला गंध लावतांना त्यांच्यासह अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. दिलीप गांधीच्या जयजयकाराच्या यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.
COMMENTS