बँक बचावची आश्‍चर्यकारक माघार, सहकार वर्चस्वाच्या दिशेने…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बँक बचावची आश्‍चर्यकारक माघार, सहकार वर्चस्वाच्या दिशेने…

अहमदनगर/प्रतिनिधी : दिवसभराच्या अनेक नाट्यमय घडामोडींनंतर नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीतून बँक बचाव कृती समितीच्या पॅनेलने शुक्रवारी आश्‍चर्यकारक माघार

नगर अर्बन बँकेची अखेर निवडणूक होणार ; चिन्ह वाटप जाहीर, बँक बचाव पॅनेलचा बिनविरोध सूर बासनात
नगर अर्बन बँकेला चुकते करावे लागणार डिपॉझीट गॅरंटीचे पैसे
चार जागा बिनविरोध झाल्याचा ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

अहमदनगर/प्रतिनिधी : दिवसभराच्या अनेक नाट्यमय घडामोडींनंतर नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीतून बँक बचाव कृती समितीच्या पॅनेलने शुक्रवारी आश्‍चर्यकारक माघार घेतली. त्यामुळे बँकेचे माजी अध्यक्ष व माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी यांच्या प्रेरणेने या निवडणुकीत उतरलेल्या सहकार पॅनेलने बँकेवर एकहाती वर्चस्व मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. या पॅनेलचे चारजण बिनविरोध निवडले गेले आहेत. तर आता निवडणूक रिंगणात राहिलेल्या 14 जागांसाठी 21जण उरले असल्याने या जागाही सहकार पॅनेल दणक्यात जिंकून बाजी मारण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, बँक बचाव पॅनेलने मागील महिनाभरापासून बँक निवडणुकीत विविध पोस्टच्या माध्यमातून हवा तापवली होती. त्यामुळे बचाव पॅनेल व सहकार पॅनेलमध्ये जोरदार लढतीची अपेक्षा होती. पण बचाव पॅनेलने अचानक माघार घेतल्याने सभासदांतून नाराजी व्यक्त होत आहे व सहकार पॅनेलच्या गोटात खुशीचे वातावरण पसरले आहे.
बँकेच्या 18 जागांसाठी येत्या 28 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. निवडणूक रिंगणात बँक बचाव पॅनेल व सहकार पॅनेलसह काही स्वतंत्र उमेदवारांनीही अर्ज दाखल केले होते. सुमारे 90च्यावर अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. त्यात बँक बचाव कृती समितीच्या पॅनेलने मागील सत्ताधारी असलेल्या सहकार पॅनेलमुळे ही निवडणूक बँकेवर लादली गेल्याचा दावा करून मागील सत्ताधार्‍यांच्या कारभारावर सोशल मिडियातून विविध भाष्यही केले होते. मात्र, यामुळे बँकेची बदनामी होत आहे तसेच बँक आर्थिक अडचणीत असल्याने निवडणूक बिनविरोध करावी, आपसातील कटुता टाळावी, असा सूर काही सभासदांतून व्यक्त होत असल्याने तसे प्रयत्नही सुरू होते. पण हे सारे प्रयत्न फोल ठरले व सहकार पॅनेलने बिनविरोधच्या तहात बँक बचाव पॅनेलला गारद करून टाकले. परिणामी, बँक वाचवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या बँक बचाव कृती समितीच्या यापुढील अशा प्रयत्नांनाही खीळ बसणार आहे.

आमदार-खासदारांचे प्रयत्न?
बँक बचाव कृती समिती व सहकार पॅनेलमध्ये समेट घडावा व बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून शहराचे आमदार संग्राम जगताप व नगर दक्षिणेचे खासदार डॉ. सुजय विखे यांनीही प्रयत्न केल्याचे बोलले जाते. पण कोणाला किती जागा, यावरून बोलणी फिसकटल्याचे सांगितले जाते. दोन्ही पॅनेलने 9-9 जागा घ्याव्यात, असा मतप्रवाह होता तर सहकार पॅनेलद्वारे सहा जागा देण्याची तयारी होती, शिवाय त्यांना बँक बचावचे प्रमुख राजेंद्र गांधी नको होते. त्यावरून शुक्रवारी दिवसभर खल सुरू होता. पण यातून मार्ग निघत नसल्याने वातावरण तापले होते. मात्र, अखेर बँक बचाव पॅनेलमधून उमेदवारी दाखल केलेल्यांपैकीही काहीजणांनी लढण्यास असमर्थता दर्शवल्याने व त्यापैकी काहींनी आपले अर्जही मागे घेतल्याने बँक बचावचे नेते एकाकी पडल्याची स्थिती आली व अखेर या सार्‍यांनीच आपले अर्ज मागे घेऊन सहकार पॅनेलला पुन्हा बँकेची सत्ता बहाल केल्याचेही सांगितले जात आहे.

भांडणे व वादावादी रंगली
अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दोन्ही पॅनेलच्या समर्थकांची गर्दी झाली होती. त्यांच्यात यावेळी आपसात भांडणे व वादावादीही झाली. बँक बचाव पॅनेलचे प्रमोद मोहोळे यांचे दादा बोठे व सुमित देवतरसे यांच्याशी वाद झाले. बँक बचावचे वसंत लोढा यांनी या वादात मध्यस्थी करून मोहोळे यांना सावरण्याचा प्रयत्न केला. माघारीची मुदत संपल्याने कोणाचेही अर्ज घेऊ नका, असे मोहोळे यांचे म्हणणे होते तर आरडाओरड करून वातावरण बिघडवू नका, असे काहींचे म्हणणे होते. यातून ही वादावादी व भांडणे झाली. यावेळी परस्परांना मारहाणही झाल्याचे बोलले जाते. पण त्याला दुजोरा मिळाला नाही. दिवसभराच्या या घडामोडींनंतर निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी सायंकाळी निवडणूक रिंगणातील उमेदवारांची नावे असलेली अंतिम यादी समाज माध्यमांवर टाकली व याद्वारे सहकार पॅनेलच्या 4 जागा बिनविरोध होऊन राहिलेल्या 14 जागांसाठी 21 उमेदवार रिंगणात असल्याचे व त्यांच्यासाठी आता निवडणूक होणार असल्याचेही स्पष्ट झाले. दरम्यान, बँकेच्या निवडणुकीत चार जागा बिनविरोध झाल्याने सहकार पॅनेलच्या समर्थकांनी जल्लोेष केला.

बिनविरोध उमेदवार असे
अर्बन बँकेच्या निवडणुकीत चार जागा बिनविरोध निवडल्या गेल्या असून, या चारही जागा सहकार पॅनेलच्या आहेत. हे बिनविरोध निवडले गेलेले नवे संचालक असे- मनपा-भिंगार कॅन्टोन्मेंट मतदार संघ-महिला राखीव जागेवर संगीता दीपक गांधी व अनुसूचित जाती-जमाती राखीव जागेवर मनेष साठे. तसेच राज्य कार्यक्षेत्र मतदार संघातील महिला राखीव जागेवर मनीषा रवींद्र कोठारी यांची आणि महाराष्ट्राबाहेरील मतदार संघाच्या एका जागेवर दिनेश कचारिया बिनविरोध निवडले गेले आहेत. या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.

रिंगणात राहिले 21 जण
नगर अर्बन बँकेच्या एकूण 18 जागांपैकी 4 जागा बिनविरोध झाल्याने राहिलेल्या 14 जागांसाठी आता रिंगणात 21 उमेदवार राहिले आहेत. यात मनपा-कॅन्टोन्मेट मतदार संघातील 10 जागांसाठी 14जण रिंगणात आहेत. त्यात सहकार पॅनेलचे ईश्‍वर बोरा, अनिल कोठारी, संपतलाल बोरा, राहुल जामगावकर, राजेंद्रकुमार अग्रवाल, शैलेश मुनोत, गिरीश लाहोटी, दीप्ती गांधी, महेंद्र उर्फ भय्या गंधे व अजय बोरा या उमेदवारांव्यतिरिक्त स्मिता पोखरणा, अनिल गट्टाणी, संजय डापसे व दीपक गुंदेचा यांचा समावेश आहे. तर उर्वरित महाराष्ट्र म्हणजे शाखा मतदार संघाच्या 4 जागांसाठी 7जण रिंगणात असून, यात सहकार पॅनेलचे कमलेश गांधी (शेवगाव), अशोक कटारिया (पारनेर), अतुल कासट (संगमनेर) व सचिन देसर्डा (नेवासा) या चारजणांसह रमणलाल भंडारी (जैन), गणेश राठी व रजाक इनामदार या अन्य तीन उमेदवारांचा समावेश आहे.

COMMENTS