Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री शिवाजीराव नाईक स्वगृही; हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत दाखल; भाजपला मोठा धक्का

शिराळा : माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल त्यांचे स्वागत करताना खा. शरद पवार शेजारी खा. श्रीनिवास पाटील, ना. बाळासाहेब पाट

टाटा कमिन्स कंपनीचे दीड कोटीचे इंधन इंजेक्टरची चोरी
कला पथकाच्या माध्यमातून शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत
महाविकास आघाडीला स्वाभिमानी राम राम ठोकण्याच्या पवित्र्यात

शिराळा / प्रतिनिधी : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागरी सत्कार, पक्ष प्रवेश व शेतकरी मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. श्री शिव छत्रपती विद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या कार्यक्रमास शिराळा विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते, शेतकरी, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली. सुरुवातीस सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी स्वागत व प्रास्तविक केले. मान्यवरांचे सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आ. मानसिंगराव नाईक यांनी केले. शेतकरी मेळाव्यात भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचेही स्वागत व सत्कार खा. शरद पवार यांनी केले
शिवाजीराव नाईक यांची राष्ट्रवादीत घरवापसी झाल्यानंतर राष्ट्रवादी नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. राज्यातील प्रत्येक गावात पवारांच्या विचारांचा माणूस असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. ’मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो. असा एकही जिल्हा नाही, गाव नाही तिथे पवार साहेबांचे विचार मानणारा माणूस नाही. प्रश्‍न भरपूर आहेत. मात्र, ते सोडवण्यासाठी चांगला मार्गदर्शक पाहिजे. पवार साहेबांच्या रुपाने आमच्याकडे अवघे विद्यापीठ आहे. असेही जयंत पाटील यांनी यावेळी म्हटले. पवार साहेबांनी मला जलसंपदा विभागाची जबाबदारी दिली. जलमय महाराष्ट्र हे आमचे उद्दिष्ट आहे. सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, शिराळा ज्या-ज्या भागात पाण्याची कमतरता आहे, ती कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही काम करत आहोत. गुढीपाडव्याच्या दिवशी नाईक यांचे स्वागत करत असताना मला आनंद होतोय. भाजप सारख, रोज म्हणत मंत्री फुटणार, आमदार फुटणार असे आम्ही बोलत नाही, तर काम करतो. येणार्‍या निवडणुकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समोर आल्याशिवाय राहणार नाही. सन 1995 मध्ये शिवाजीराव नाईक विधानसभेत निवडून गेले. अनेक वेळा यश मिळाले. काही वेळा अपयश आले पण त्यांनी काम थांबवले नाही. आम्ही विरोधात असताना देखील आमच्यात कोणताही द्वेश नव्हता. कोणत्याही घरात गेले तरी माझ्या घरात यावे लागेल याची खात्री मला होती. संपूर्ण राज्यभर पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्‍वास आहे.
आमच्या या भागातील सर्व गावांतील खडा अन् खडा माहीत आहे. आमच्या भागात नोकर्‍यांचा प्रश्‍न आहे. चांदोली धरणाचा पर्यटन विभागाकडून विकास झाला तर विकास होईल. चांदोलीला एक सर्प उद्यान काढा, मत्स्यालय उभा करा इथे नोकरीचा प्रश्‍न सुटेल. राज्याचा विकास केवळ शरद पवार साहेब करू शकतात, असे प्रतिपादन शिवाजीराव नाईक यांनी केले.
खा. शरद पवार म्हणाले, कोण व्यवसाय चांगला करत असेल तर तो कोणत्याही जाती धर्माचा असला तरी व्यवसाय करु शकतो. पण हा अमुक एका धर्माचा म्हणून त्याच्याकडून माल घ्यायचा नाही अशी भूमिका देश पुढे घेऊन कसा जाईल. कर्नाटकमध्ये अल्पसंख्याकांच्या दुकानातून माल खरेदी करु नका, असा काही संघटनांनी फतवा काढला. या मुद्यावरुन पवारांनी भाजपवर निशाणा साधला. सध्या राज्यात उसाची शेती इतकी वाढली आहे की मला याची काळजी वाटते. जवळपास मे अखेरपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील असे दिसत आहे. ब्राझील, अमेरिकासारख्या देशात इथेनॉलचा वापर जास्त करतात. आपल्याला देखील तसा विचार करावा लागेल. शिवाजीराव नाईक हे यशस्वी जि. प अध्यक्ष होते. राज्यात ते अग्रभागी असत. ते पुन्हा स्वगृही परतत आहेत याचा मला आनंद आहे. त्यांच्या कामाचा राज्यातील सर्व भागात उपयोग करुन घेतला पाहिजे. आज देशाचं राजकारण वेगळ्या दिशेनं जातं आहे. धर्माच्या नावानं देशात अंधकार पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे वक्तव्य खा. पवार यांनी केले.
आ. मानसिंगराव नाईक म्हणाले, तालुक्याचा विकास झपाट्याने होत आहे. शेती पाणी रस्ते या पायाभूत विकासाकडे आम्ही लक्ष दिले आहे. यापुढे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक चांदोली पर्यटन केंद्र विकासासाठी प्रयत्नशील राहू.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल, सातारचे खा. श्रीनिवास पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील प्रमुख उपस्थितीत होते. आ. अरुण लाड, अविनाश पाटील, सारंग पाटील, देवराज पाटील, बाळासाहेब पाटील, रणधीर नाईक, सुस्मिता जाधव, बाबासाहेब मुळीक, रविंद्र बर्डे, सुनीतादेवी नाईक, सुनंदाताई नाईक, छायाताई पाटील, सुनीता देशमाने, अमरसिंह नाईक, राजेंद्रसिंह नाईक, सम्राटसिंग नाईक, संजय पाटील, रणजीत पाटील, विजयराव नलवडे, सुखदेव पाटील, बी. के नायकवडी, साधना पाटील, हर्षद माने, लिंबाजी पाटील, सुरेश चव्हाण आदी मान्यवर व शिराळा विधानसभा मतदारसंघातून विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS