कोणत्याही राज्यात तेथील जनता केंद्रबिंदू असायला हवी. त्या जनतेला डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेण अपेक्षित आहे. महाराष्ट्र असो की, भा
कोणत्याही राज्यात तेथील जनता केंद्रबिंदू असायला हवी. त्या जनतेला डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेण अपेक्षित आहे. महाराष्ट्र असो की, भारत असो, या देशात अजूनही बहुसंख्य जनता गरिबीखाली आहे. त्यामुळे त्यांच्या हिताचे, त्यांच्याशी संबंधित प्रश्न सोडवायला प्राधान्य देण्याची गरज आहे. जर असे झाले असते, तर इर्शाळवाडीची घटना घडलीच नसती. मात्र, आजमितीस अनेकांनी आप-आपले हितसंबंध राज्याचे, देशाचे वाटोळे करणे लावले आहे. राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्याचे कारणे शोधायला गेलो तर, वाळूचा बेसुमार उपसा, पर्यावरणाचा र्हास, यामुळे तापमानवाढ होतांना दिसून येत आहे. मात्र त्यावर निर्णय होतांना दिसून येत नाही. खरंतर महाराष्ट्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे दुहेरी संकट ओढवले आहे. राज्यात केवळ 20-30 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. मुसळधार पावसामुळे या पेरण्या वाया गेलेल्या आहेत. तर ज्याठिकाणी सिंचनाच्या सोयी-सुविधा आहेत, त्याठिकाणी मे महिन्याच्या किंवा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पेरण्या झालेल्या आहेत. त्याचे पीक आलेले असतांना, ते पीक पाण्यात आता सडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. तर त्याचबरोबर आपत्ती समोर आहेतच. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची खरी गरज असतांना, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्राला सध्या दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रशासनावर चांगलीच पकड आहे. त्याचा प्रत्यय वेळोवेळी आलेला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापूर्वी पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांची काम करण्याची क्षमता मोठी आहे. त्यामुळे महाराष्ट्र एका उंचीवर घेवून जाण्यास त्यांची मदतच होणार आहे, यात शंका नाही. मात्र राज्यात विकासाचा वेध घेण्याची गरज आहे. सत्ता, येत राहते, जात राहते, मात्र विकासाचा केंद्रबिंदू हा माणूस असायला हवा. तरच विकासाची उंची गाठता येवू शकेल. महाराष्ट्राचा गेल्या तीन वर्षाचा कालावधी बघता, महाराष्ट्र अस्थिरतेतून गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आता उंचीवर घेवून जाण्याची गरज आहे. राज्यावर आज आपत्ती ओढवली आहे, यवतमाळमध्ये शेकडो माणसे पुरात अडकले आहेत. मात्र महाराष्ट्रात जनतेच्या समस्यांचा विसर पडलेला दिसून येत असून, त्याजागी, राज्यावर सध्या आपत्तींचा डोंगर कोसळला असून, या संकटातून सावरण्याआधीच राजकीय चर्चांनी जोर धरला आहे. इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळून तब्बल 25-30 कुटुंबे गाडली गेली आहेत, त्यात 25 जणांचा मृत्यू झाला असून, हा मृतांचा आकडा 100 च्या घरात जाण्याची भीती व्यक्त होत असतांना, आणि यवतमाळ, विदर्भ, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पूराची समस्या असतांना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला नियोजित नसलेल्या दौर्यावर गेले आहेत. यावेळी कुटुंबासहित त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर राज्यात अशाच आपत्तीच्या वेळी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे. खरंतर राज्यात सध्या आणीबाणीची परिस्थती आहे, अशावेळी त्या लोकांना मदत तात्काळ मिळणे गरजेचे असतांना, त्याकडे दुर्लक्ष करून, राज्यातील सत्ता केंद्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे. राज्यात पुन्हा मुख्यमंत्री बदलांच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यामुळे अशा आपत्तीच्या वेळी देखील अशा चर्चा होणे दुर्देवी आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हायचे असतील तर होतील, मात्र आता अशावेळी त्याची चर्चा करणे अयोग्य आहे. तूर्तास इतकेच.
COMMENTS