नवी दिल्ली/प्रतिनिधी : मणिपूर राज्यातील हिंसाचार प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून, मंगळवारी अविश्वासाचा प्रस्ताव मंगळवारी विरोधकांनी लोकसभेत
नवी दिल्ली/प्रतिनिधी : मणिपूर राज्यातील हिंसाचार प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून, मंगळवारी अविश्वासाचा प्रस्ताव मंगळवारी विरोधकांनी लोकसभेत मांडला असून, यादिवशी विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. राजधर्माचे पालन करून, मणिपूरला जा असा सल्लाच काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी दिला.
गोगोई यांनी म्हटले की, मणिपुरमध्ये हिंसाचार सुरू असताना पीएम मोदी विदेशात दौरे करत होते. देशाच्या एका राज्यात हिंसाचार सुरू असताना मोदींनी त्यावर मौन कशासाठी पाळले?, आम्ही त्यांचे मौन तोडण्यासाठीच अविश्वास ठराव मांडल्याचे गौरव गोगोई यांनी म्हटले आहे. निवडणुका लागल्या की अनेक राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्यात आले, परंतु मणिपुरमधील मुख्यमंत्र्यांचा अद्यापही राजीनामा का घेण्यात आला नाही?, असा सवाल करत गौरव गोगोई यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल करतांना केला आहे. मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी-नागा या समाजांना भांडवणारे लोक कोण आहे?, मणिपुरमध्ये आग लावणार्या लोकांवर पंतप्रधान मोदी कधी कारवाई करणार आहे?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत गोगोई यांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी गुजरात दंगलीच्या काळात तात्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्माचे पालन करण्याचे आवाहन केले होते, राजासाठी कोणत्याही राज्यात किंवा लोकांमध्ये भेद असू शकत नाही. मग मणिपुरकडे पंतप्रधान मोदी यांनी का दुर्लक्ष केलेले आहे?, स्वत:च्या प्रतिमेसाठी ते मणिपूरवर बोलत नाही, त्यांनी तातडीने मणिपुरला जाऊन अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलेल्या राजधर्माचे पालन करायला हवे, असेही गौरव गोगोई यांनी म्हटले आहे. मणिपूरमध्ये पाच हजार लोकांकडे हत्यारे असून दोन महिन्यांपासून आरोपी पोलिस ठाण्यातील शस्त्र लूटून नेत आहे. याला कोण जबाबादार आहे?, याची उत्तरे मोदींनी लोकसभेत द्यायला हवी, अशी मागणी गोगोई यांनी केली आहे.
अदानीचे नाव घेताच तुम्हाला राग का येतो? – लोकसभेत बोलताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, मी नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा भाजपच्या अन्य नेत्यांवर बोलतो तेव्हा कुणालाही राग येत नाही. परंतु ज्यावेळी मी गौतम अदानी यांचे नाव घेतो त्यावेळी भाजपच्या खासदारांना राग का येतो?, असा सवाल गौरव गोगोई यांनी करत भाजपला सुनावले आहे. याशिवाय इंडोनेशियात पंतप्रधान मोदी आणि चीनचे पंतप्रधान यांच्यात काय डील झाली?, कोणत्या विषयांवर चर्चा झाली?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
आपण शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकू ः पंतप्रधान मोदी – संसदेत अविश्वास ठरावावर चर्चा सुरू असताना ’चिंता करू नका, आपण अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकू’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना आश्वस्त केले आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील खासदारांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी अविश्वास ठरावावर भाष्य केले आहे. त्यामुळे आता राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या 10 ऑगस्ट रोजी म्हणजेच गुरुवारी पंतप्रधान मोदी अविश्वास ठरावावर लोकसभेत भाषण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकर्याचे उत्पन्न दुप्पट झाले का? सुप्रिया सुळे – मोदी सरकारने 9 वर्षात काय केले याचा पाढाच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाचला. महागाई, एलपीजीच्या वाढलेल्या किंमती, अर्थव्यवस्था, कायदा सुव्यवस्था, 9 वर्षात 9 सरकार भाजपने पाडली सगळ्याची आठवण करुन देत सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. मोदी सरकार शेतकरीविरोधी काम करत आहे. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करु, असे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. कोणत्या शेतकर्याचे उत्पन्न वाढले, ते सरकारने स्पष्ट करावे. कांदा, दूध उत्पादक शेतकर्यांची निराशा झाली आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
COMMENTS