श्रीनगर : जम्मू येथे एका विवाह सोहळ्यात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घट

श्रीनगर : जम्मू येथे एका विवाह सोहळ्यात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र सुरक्षा कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि अब्दुल्ला यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
माहितीनुसार, जम्मू शहरात एका विवाह समारंभात अब्दुल्ला उपस्थित होते. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते. समारंभ सुरू असताना कमल सिंग जामवाल नावाचा व्यक्ती मागून पुढे आला आणि अब्दुल्ला यांच्या डोक्याकडे बंदूक रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचार्यांनी तत्काळ हल्लेखोराचा हात बाजूला ढकलल्याने गोळी हवेत गेली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. काही क्षणांतच सुरक्षा कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी आरोपीला पकडून ताब्यात घेतले. या घटनेनंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडल्यानंतर त्याला मारहाण केल्याची माहितीही समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. प्राथमिक चौकशीत आरोपीने धक्कादायक कबुली दिल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, तो सुमारे वीस वर्षांपासून फारुख अब्दुल्ला यांच्यावर हल्ला करण्याचा विचार करत होता आणि त्यांना ठार मारणे हेच त्याचे उद्दिष्ट होते. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीकडे अनेक वर्षांपासून परवानाधारक शस्त्र होते. ज्या विवाह सोहळ्यात ही घटना घडली तो एका स्थानिक राजकीय कार्यकर्त्याच्या मुलाचा कार्यक्रम होता. आरोपी हा त्या कुटुंबातील नातेवाईक असल्याची माहितीही समोर आली आहे. तो स्थानिक व्यापारी असून जुन्या शहर भागात त्याची काही दुकाने असल्याचे सांगितले जाते.

COMMENTS