पत्रकार बाळ बोठेचा शोध घेणे ठरले आव्हानात्मक…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकार बाळ बोठेचा शोध घेणे ठरले आव्हानात्मक…

पोलिस अधीक्षक मनोज पाटलांची प्रयोगशीलता राहिली चर्चेत

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्याचे मावळते पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना नगर जिल्ह्यातील 2 वर्षाच्या कारकीर्दीत महिलेच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आ

एक कर्ज मिटवण्यासाठी दुसर्‍या कर्जाचा घाट : नगर अर्बनचा गैरव्यवहार चर्चेत
शेत जमीन व्यवहार फसवणुक प्रकरणी महेश संचेतीवर कोतवालीतही गुन्हा दाखल
Ahmednagar : दरोडे टाकून लूटमार करणारी टोळी गजाआड (Video)

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्याचे मावळते पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना नगर जिल्ह्यातील 2 वर्षाच्या कारकीर्दीत महिलेच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी पत्रकार बाळ ज. बोठेचा शोध घेणे जास्त आव्हानात्मक ठरले. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जर यांचा सूत्रबद्ध खून करून तब्बल 102 दिवस फरार असलेल्या बाळ बोठे याला शोधण्यात अखेर पाटील यांना यश मिळाले व जिल्ह्यातील राजकारण्यांसह पोलिस व माध्यम क्षेत्रानेही निःश्‍वास टाकला. दरम्यान, ई-टपाल प्रणालीसारखी प्रयोगशीलता व सराईत गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करून त्यांची जेलची हवा जवळपास कायमस्वरूपी ठेवण्याचे पाटलांचे कसब प्रभावी ठरले व चर्चेत राहिले. जाता जाता जिल्ह्यातील राहुरी व बेलवंडी येथे दोन पोलिस कर्मचार्‍यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून केलेल्या आत्महत्यांचा डाग मात्र त्यांना लागला.
राजकीय व गुन्हेगारीच्यादृष्टीने राज्यात सतत गाजत असलेल्या नगर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी ऑक्टोबर 2020 मध्ये रुजू झालेल्या मनोज पाटलांचा 2 वर्षाचा काळ आव्हानात्मक राहिला. ऑक्टोबर 2022मध्येच त्यांचा कार्यकाळ संपला. पण ही दोन वर्षे त्यांच्यासह जिल्हावासियांनाही स्मरणात राहण्यासारखी ठरली. सार्वजनिक कार्यक्रमांतून आकर्षक भाषणबाजी वा स्टाईलबाज पोलिसिंग टाळून शांतपणे सर्वांशी सुसंवाद साधत व प्रसंगी कामचुकार अधिकारी व कर्मचार्‍यांबाबत कठोर भूमिका घेण्यात ते मागे हटले नाही व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम करणारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यातही त्यांनी हात आखडता घेतला नाही. कोविडच्या ऐन बहराच्या काळात सारेच बंद असल्याने व सर्वच जण घरी असल्याने गुन्हेगारीच्या घटनाही कमी होत्या. पण दुसरीकडे कोविडच्या लॉकडाऊन काळात शुकशुकाट असलेल्या रस्त्यांवर सहकारी पोलिस कर्मचारी थांबवताना त्यांना कोविडच्या भीतीपासून दूर ठेवण्याचेही कसब दाखवावे लागले. तरीही काही पोलिस बळी गेलेच, पण त्यांच्या परिवारांना मदत मिळवून देण्यातही त्यांनी विशेष पाठपुरावा केला. दुसरीकडे हाच कोविडचा शांततेच्या काळ सत्कारणी लावत पाटील यांनी ई-टपाल सेवा अद्ययावत केली. पोलिस ठाणी व पोलिस अधीक्षक कार्यालयात येणारे विविध टपाल तातडीने निकाली काढण्याचे आदेश देताना या टपालाचे ट्रॅक रेकॉर्ड ठेवल्याने आता पोलिस ठाणी वा पोलिस अधीक्षक कार्यालयात येणारे टपाल निर्णयाविना फारसे पेंडिंग राहात नाही. याशिवाय, जुनी अनेक तपासाअभावी जवळपास बासनात गुंडाळून ठेवलेली सुमारे 10 हजारावर गुन्हेगारी प्रकरणे बाहेर काढून व त्यावर तपासी अधिकारी यांना निर्णय घ्यायला लावून तेही निकाली काढले. सराईत गुन्हेगार पकडल्यावर न्यायालयीन सुनावणीनंतर काही दिवसात जामिनावर सुटतात व फरार होतात. त्यामुळे अशा गुन्हेगारांना समाजापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यावर मोक्का कारवाई सुरू केली व त्यांच्या जास्तीतजास्त काळ कारागृहात कसा राहील, यावर भर दिला. फरार आरोपी शोध मोहिमेत अनेक गुन्हेगार पकडून त्यांनी केलेले, पण रेकॉर्डवर आले नसलेले गुन्हे उघड केले. शिर्डीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी साई मंदिराजवळ पोलिसांचा मदत कक्ष सुरू केला. चेन स्नॅचिंग करणार्‍या गुन्हेगारी टोळ्या पकडल्या. राज्यात सर्वाधिक 20 ते 21 टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई केली व 22 ते 23 टोळ्यांना हद्दपार केले. अनेक ठिकाणी गावठी कट्टेही पकडले, पण त्यांची पाळेमुळे खणून काढण्याचे राहून गेले. पोलिस कर्मचार्‍यांना व्यक्तीमत्व विकासासाठी प्रशिक्षण देऊन त्यांना प्रोत्साहन दिले व त्यांच्यातील क्रीडा कौशल्यही विकसित केले. पोलिस अधीक्षक मनोेज पाटील पुण्यात नियुक्तीला असताना पुण्यातील वाहतूक सुधारण्याबाबत त्यांचा बोलबाला झाला होता. मात्र, नगरची वाहतूक सुधारण्यात त्यांना फारसे यश आले नाही. आता नगरहून बदली झाली असली तरी त्यांना अजून नवी पदस्थापना मिळालेली नाही, पण ती लवकरच मिळेल व मनोज पाटील यांचे प्रयोगशील पोलिसिंग त्या नव्या ठिकाणीही बहरेल, असा विश्‍वास आहे.

बोठेमुळे विश्‍वासार्हता पणाला
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी हत्या झाल्यावर पोलिसांनी तातडीने हालचाल करीत पाचजणांना पकडले व त्यांच्याकडून या खुनाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे यांचे नावही समजले, पण पत्रकारितेतील बडे नाव व जिल्ह्यातील अनके बड्या राजकारण्यांशी त्याच्या असलेल्या संबंधांमुळे काहीशी अडचण झाली, पण खुनाची गंभीर घटना पाहिल्यावर पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी कठोर कारवाईचा निर्णय घेतला, पण त्याला काहीसा उशीर झाला. तोपर्यंत बोठे फरार झाला. त्याचा शोध घेताना पोलिसांची दमछाक झाली. त्याच्याविरुद्ध जिल्ह्यातील पहिली लूक आऊट नोटीस जारी केली गेली, त्याची मालमत्ता सील करण्याची प्रक्रिया सुरू केली, तो फरार असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील, राज्यातील व देशातील पोलिसांना शोध घेण्याचे कळवले गेले, मुंबईच्या गुन्हे शोध पथकाची तांत्रिक मदतही घेतली, बोठेचे पोलिसही अनेक मित्र असल्याने तो सापडत नसल्याने राजकारण्यांकडून पोलिसांवर दबाव असल्याचे आरोप होऊ लागले, जरे कुटूंबाने कँडल मोर्चा काढला, त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढत होता. या काळात पाटील अत्यंत गंभीर होते, त्यांच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याने त्या काळात ते हसणे जवळपास विसरले होते. रोज त्यांना बोठे सापडला का, या प्रश्‍नाला उत्तर द्यावे लागत होते, पण न वैतागत ते तपासातील प्रगती सांगत होते, पण त्याला शोधण्यात येत असलेल्या अपयशाचा ताण चेहर्‍यावरून ते लपवू शकत नव्हते…अखेर एक क्ल्यू मिळाला व अत्यंत गोपनीय पद्धतीने तसेच त्याचा शोध घेणार्‍या पथकालाही कोठे जायचे व काय करायचे हे ऐनवेळी सांगून तब्बल 102 दिवसांनी बोठेला हैद्राबादला पोलिसांनी जेरबंद केलेे आणि मग इकडे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या चेहर्‍यावर स्मित हास्य पसरले.

लोकमंथनवर विशेष प्रेम
दैनिक लोकमंथन व लोकन्यूज 24 माध्यम समूहाचे प्रमुख संपादक डॉ. अशोक सोनवणे व पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यात विशेष मैत्री आहे. याच मैत्रीतून लोकमंथन समूहाच्या विविध कार्यक्रमांतून पोलिस अधीक्षक पाटील आवर्जून सहभागी झाले. कोविड काळात दैनिक लोकमंथनने कोविड योद्ध्यांचा गौरव केल्यावर, असा उपक्रम राबवणारे राज्यातील एकमेव वृत्तपत्र दैनिक लोकमंथन असल्याचे व यामुळे कोविड योद्ध्यांना अधिक जोमाने कोविडचा सामना करण्यात प्रोत्साहन मिळाल्याचे गौरवोदगारही पाटील यांनी व्यक्त केले होते. याशिवाय नगर तालुक्यातील सांडवे (चिचोंडी पाटील) येथे डॉ. अशोक सोनवणे यांनी उभारलेल्या बांबू हाऊसचेही लोकार्पण करताना नगरचे पर्यटन विकसित होण्यात बांबू हाऊस मोलाचा वाटा उचलेल, असा विश्‍वासही पाटील यांनी व्यक्त केला होता. लोकमंथनच्या कार्यालयासही त्यांनी दोन-तीनदा भेट देऊन सर्वांशी संवाद साधताना विविध जिल्ह्यात काम करताना आलेले अनुभव सांगितले होते. नगर जिल्ह्यात काम करणे आव्हानात्मक असल्याचेही आवर्जून स्पष्ट केले होते.

COMMENTS