Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्राने साखर निर्यात अनुदान न दिल्यास साखर उद्योगासमोर आर्थिक संकट : पी. आर. पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय करारास बाधा येईल ही सबब देत गेल्या वर्षांपासून साखर निर्यात अनुदान बंद केले आहे. दुसर्‍या बा

साखर होणार स्वस्त, कारखान्यांना बसणार फटका
देशात महागाई आणि बेरोजगारीचा उच्चांक
अन्यथा सहकार मंत्र्याची शिमगा दिवाळी साजरी करू : आ. सदाभाऊ खोत

इस्लामपूर / प्रतिनिधी : केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय करारास बाधा येईल ही सबब देत गेल्या वर्षांपासून साखर निर्यात अनुदान बंद केले आहे. दुसर्‍या बाजूला त्यांनी 60 लाख मेट्रीक टन साखर निर्यातीचा निर्णय घेवून प्रत्येक कारखान्यास ठराविक कोटा बंधनकारक केला आहे. हा मोठा विरोधाभास आहे. केंद्र सरकारने साखर निर्यातीस अनुदान दिले नाही, तर साखर उद्योगासमोर मोठे आर्थिक संकट उभा राहील, असे भाष्य राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केले.
साखराळे येथे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020-21 या आर्थिक वर्षाच्या 52 व्या वार्षिक साधारण सभेत ते बोलत होते. यावेळी राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, माजी नगराध्यक्ष पै. भगवान पाटील, जलसिंचन समितीचे अध्यक्ष एल. बी. माळी, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रा. शामराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
पाटील म्हणाले, केंद्र सरकार पूर्वी साखर निर्यातीस रुपये 1044 अनुदान देत होते. ते पुढे रुपये 600 व रुपये 400 केले. गेल्या वर्षापासून ते बंद केले आहे. देशातील अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यात अनुदान सुरू करायला हवे. सध्या साखर विक्रीचा दर प्रतिक्िंवटल रुपये 3100 आहे. तो किमान 3600 करावा, अशी मागणी साखर संघ, राज्य सरकार सातत्याने करत आहे. मात्र, केंद्र शासनाने त्यास वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. आपण ना. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखराळे युनिटची क्षमता प्रतिदिन 7 हजार मेट्रीक टन केली आहे. येथे आपण प्रतिदिन 28 मेगावॅट वीज निर्मिती करत आहोत. यातील 5 कोटी 48 लाख युनिट वीज वितरण कंपनीस विक्री करून आपणास 37 कोटी 35 लाख रुपये मिळाले आहेत. वाटेगाव-सुरुल युनिटमध्ये प्रतिदिन 12 मेगावॅट वीज निर्मिती करतो. त्यातील 1 कोटी 85 लाख युनिट वीज वितरण कंपनीस विकून 8 कोटी 87 लाख रुपये मिळले आहेत. आपण दररोज 1 हजार मेट्रीक टन शिरफ अर्कशाळेकडे घेवून दररोज 78 हजार लिटर इथेनॉल निर्मिती करीत आहोत. पुढच्या हंगामात ही क्षमत 1 लाख 50 हजार लिटल प्रतिदिन करत आहोत. यावेळी त्यांनी जल सिंचन विभाग व 39 कारखाना पुरस्कृत पाणी पुरवठा संस्थांचे कौतुक करून कोरोना काळात केलेल्या कामांची, शेती विभागातील योजनांची माहिती दिली.
कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी सभेच्या नोटीस वाचन केले. तत्पूर्वी सचिव प्रताप पाटील यांनी दिवंगत मान्यवर, सभासद व कर्मचार्‍यांचा श्रध्दांजली ठराव मांडला. सर्वांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रध्दांजली अर्पण केली. त्यांनी मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी आभार मानले. प्रसिध्दी अधिकारी विश्‍वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.

COMMENTS