सरण विझलं…राख उरली…अश्रू थिजले…निर्विकार झाली मने…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरण विझलं…राख उरली…अश्रू थिजले…निर्विकार झाली मने…

धडधड पेटलेलं सरण अखेर विझलं आणि उरली राख..

साईराज प्रतिष्ठानची दहीहंडी उत्साहात
अहमदनगर : नवरात्रोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने घातले विविध निर्बंध…
मनपाच्या संभाव्य घरपट्टी वाढीविरोधात ; शहर काँग्रेस एल्गार पुकारण्याच्या तयारीत

अमरधाममध्ये अंत्यसंस्कारांसाठी पाहावी लागते वाट, विखरून बसतात शोकाकुल माणसे

श्रीराम जोशी/ अहमदनगर : धडधड पेटलेलं सरण अखेर विझलं आणि उरली राख…रडून रडून डोळे सुजले व अश्रूही थिजले…कधी आपल्या माणसाच्या मृतदेहाचा नंबर लागतो, या विचारात व त्याच्या जाण्याचे दुःख उराशी बाळगत शोकाकुल माणसं विखरून बसलेली…असं हृदयद्रावक चित्र नगरच्या अमरधामचे आहे. मागील बुधवारी 19, त्यानंतर गुरुवारी 42, शुक्रवारी 49 व शनिवारी सायंकाळपर्यंत 40…अशा 150जणांचे अंत्यसंस्कार मागील चार दिवसात येथे झाले. कोरोनाने केलेले हे तांडव गेेलेल्यांच्या आप्तस्वकियांना फार काळ रडूही देत नाही व दुःखही व्यक्त करू देत नाही. कारण, गेलेल्याच्या आत्म्याला मुक्ती मिळाली असली तरी त्याच्या शरीराला मूठमाती द्यायची राहिलेली असते व तिच्यासाठी कधी नंबर लागेल, हे सांगता येत नाही. त्यामुळेच काहीकाळ दुःख व्यक्त करून निर्विकार मनाने पुढील सोपस्कार कधी होतात, याची वाट पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

नगरचे अमरधाम मागील दोन दिवसात राज्यभरातील मिडियात चर्चेत आहे ते केवळ गुरुवारी (8 एप्रिल) या एकाच दिवशी झालेल्या 42 अंत्यसंस्कारांमुळे. यानिमित्ताने मनपाच्या एकाच शववाहिकेत सहा मृतदेह आणले गेल्याचीही घटना चर्चेत राहिली. पण हा एकच दिवस नव्हे तर मागील चार दिवस अमरधाममध्ये दिवस-रात्र चिता जळत आहेत. शुक्रवारी तर पहाटे पाचपर्यंत लाकडाचे सरण रचणे, त्यावर मृतदेह ठेवणे, लाकडे ओली असल्याने खालच्या बाजूला डिझेल फवारणे व चिता पेटल्यावर ती धडधडत राहावी म्हणून खडी मीठ मारण्याचे काम सुरू होते. बुधवारी 19जणांवर, गुरुवारी 42जणांवर, शुक्रवारी विक्रमी संख्येने म्हणजे 49 जणांवर व शनिवारी सायंकाळी 7पर्यंत 34जणांवर अंत्यसंस्कार झाले होते व अजून 6 मृतदेह सिव्हील हॉस्पिटलमधून येणार होते. त्यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार होणार होते. या गेलेल्या सगळ्यांचे नातेवाईक अमरधाममध्ये होते. आपला माणूस गेल्याची घटना कळल्यावर त्यांना रडू आवरेनासे होते. त्यांच्या रडण्याने परिसर शोकाकुल होतो. पण या रडारडीचा आवाज अमरधाममध्ये अन्य कोणालाही विचलित करीत नाही. कारण, अन्य मृतदेहांचे नातेवाईकही रडवेले झालेले असतात तसेच येथे अंत्यसंस्काराचे काम करणारांना हे रोजचेच झाले आहे. त्यामुळे रडणारे काहीवेळाने थकतात व थांबतात आणि मग आपल्या माणसावरील अंत्यसंस्कार कधी एकदा मार्गी लागतील व कधी एकदा अमरधाममधून बाहेर पडू, असे त्यांना होते.

रोज येते लाकडाची गाडी

अमरधाममध्ये मोक्षधाम विद्युत दाहिनी आहे. तेथे दोन युनिट आहे. एका मृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनीत सव्वा तास लागतो. त्यामुळे या दोन्ही युनिटमध्ये प्रत्येकी दहा म्हणजे रोज 20 अंत्यसंस्कार होतात. नगर शहरासह जिल्हाभरातील कोरोना आजाराने गेलेल्यांवरील अंत्यसंस्कार नगरच्याच अमरधाममध्ये होतात. विद्युत दाहिन्यांची क्षमता संपल्यावर मग राहिलेल्या मृतदेहांवर लाकडाचे सरण रचून अंत्यसंस्कार होतात. मागील तीन-चार दिवसात अंत्यसंस्कारांसाठी येणार्‍या मृतदेहांची संख्या वाढल्याने  6 ते 7 टन लाकडे घेऊन रोज दोन ट्रक येथे येतात. एका मृतदेहासाठी 350 ते 400 किलो लाकूड (प्रत्येकी 40 किलोचे 7 ते 8 मण) लागते. एक टन लाकडात तीन ते चार अंत्यसंस्कार होतात. रोज अडीच ते तीन हजार गोवर्‍याही येथे लागतात. याशिवाय चिता पेटण्यासाठी तूप-तेल, मीठ, डिझेल असे अन्य साहित्यही लागते. एकीकडे चिता पेटवताना दुसरीकडे सरणासाठीचे साहित्य नियोजनाची हालचाल येथे सुरू असते.

 खरे कोरोना योद्धे

कोरोना काळात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, रस्त्यावर सुरक्षा करणारे पोलिस, कोविड सेंटर्स चालवणार्‍या स्वयंसेवी संस्था, गोरगरीबांना अन्नधान्य पुरवणारे कार्यकर्ते कोरोन योद्धे आहेतच, पण खरे कोरोना योद्धे अमरधाममध्ये काम करीत आहेत. दुर्दैवाने त्यांची साधी दखलही नगरमधील कोणी घेतलेली नाही. अमरधाममध्ये अंत्यसंस्कार सहायक मंडळ व मूलतानचंद बोरा ट्रस्ट यांच्या सहकार्याने मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. रडणार्‍या नातेवाईकांचे सांत्वन केल्यानंतर ज्याच्यावर अंत्यसंस्कार करायचे त्याच्या नावाचा फलक (ब्लॉक) त्याच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी लावायचा, लाकडाचे सरण स्वतःच रचायचे, चिता पेटल्यावर ती विझू नये म्हणून लक्ष द्यायचे व दुसर्‍या दिवशी सावडायला येणार्‍या नातेवाईकांना अस्थि व राख व्यवस्थित द्यायचे काम ही मंडळी मनापासून करीत आहेत. अंत्यसंस्कार हा भावनेचा विषय असल्याने कोणाचाही रोष येणार नाही, यादृष्टीने स्वप्निल कुर्‍हे व त्याचा भाऊ संकेत कुर्‍हे येथे काम करतात. त्यांना या कामात अक्षय पाचारणे, नंदू घोडके, कौस्तुभ वाडेकर, अक्षय पाखरे, अर्जुन स्वामी, नितीन पोटे, गणेश स्वामी, सतीश टेकाळे यांच्यासह मनपाचे सुरक्षा रक्षक जावळे, चांदणे व होले मदत करतात. एवढेच नव्हे तर मृतदेह घेऊन येणार्‍या अ‍ॅम्ब्युलन्सचे चालकही गोवर्‍या नेणे व सरण रचण्यासह मृतदेह उचलून सरणावर ठेवण्याचे कामही करतात. याशिवाय रोज सकाळी महापालिकेचे स्वच्छता कर्मचारीही येथे येऊन परिसराची स्वच्छता ठेवतात. प्रत्येक गोष्टीसाठी मदत करण्याच्या तयारीतून येथील वातावरण प्रसन्न ठेवण्याचे प्रयत्न येथे होत असले तरी ज्याचे जळते, त्यालाच कळते म्हणतात ना, त्यामुळे गेलेल्याचे दुःख वागवत सुन्न चेहरा व मनाने येथे येणारे प्रत्येकजण अस्वस्थ असतात.

सगळीकडे राखच राख

सर्व कोरोना रुग्णांवर अमरधाममध्येच अंत्यसंस्कार होत असल्याने जिल्हाभरातून मृतांचे नातेवाईक येथे येतात. अमरधाममध्ये पुढच्या बाजूला बरीचशी झाडी व मोकळी जागा असल्याने तेथेच सारे विखरून बसतात. अंत्यसंस्कारांच्या पाठीमागील भागात चार लोखंडी जाळ्यांसह खाली फरशीवर व जमिनीवरही चिता पेटवल्या जातात. यामुळे येथे एकीकडे आगीने धडधडत असलेली चिता व दुसरीकडे आग शांत होऊन नुसती राख राहिलेले ढिगारे दिसतात. मृतदेह जळाल्यावरही काही लाकडे जळत असतात, ती बाजूला करून एका कोपर्‍यात पेटलेली राहतात व जागा मोकळी करून तेथे दुसरे सरण रचले जाते. संवेदनशील व्यक्तींना अस्वस्थ करणारे हे चित्र तेथे आहे.

COMMENTS