जामखेड/प्रतिनिधी ः धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तब्बल 21 दिवसांपासून यशवंत सेनेचे उपोषण सुरू होते. अखेर ग्
जामखेड/प्रतिनिधी ः धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तब्बल 21 दिवसांपासून यशवंत सेनेचे उपोषण सुरू होते. अखेर ग्रामविकास मंत्री यांनी दुसर्यांचा चौंडी येथे येवून उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसेच यावेळी त्यांनी उपोषणकर्त्याना लेखी आश्वासन दिल्यानंतरच उपोषणकर्त्यांनी 21 व्या दिवशी उपोषण सोडले. यावेळी आ. राम शिंदे, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, उपोषणकर्ते यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील, उपोषणकर्ते आण्णासाहेब रूपनवर, उपोषणकर्ते सुरेश बंडगर, गोविंदराव नरवटे, नितीन धायगुडे, माजी आ. प्रकाश शेडगे, माजी आ रमेश शेंडगे, नाना देवकाते पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ तहसीलदार योगेश चंद्रे स्वप्निल मेमाने बाळासाहेब गायके, किरन धालपे, सरपंच अजय काशिद महारूद्र महारनवर, लहू शिंदे, मुन्ना गडदे, प्रेम आगोणे, नंदू खरात, तसेच धनगर समाजाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपोषणकर्त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनद्वारे बोलणे करून दिले. मंत्री गिरिश महाजन यांनी आणलेल्या पत्रात उपोषणकर्त्यांनी चारवेळा दूरूस्त्या सुचवल्या.
राज्य सरकारकडून दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत आयोजित बैठकीत सर्वांनी एकमताने राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा दिला. आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेल्या नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा तसेच, सदर समितीमध्ये धनगर समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरक्षणाबाबत वरील कार्यवाही 50 दिवसात पूर्ण करण्याबाबत ठरविण्यात आले आहे. तसेच, धनगर समाजाला लागू करण्यात आलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे लिखीत स्वरुपात आश्वासन दिले आहे.
धनगर समाजाला फसविणे परवडणार नाही : बाळासाहेब दोडतले- आतापर्यंत आमचा वाटा इतरांनी खाल्ला मात्र आता आमच्यात ढवळाढवळ कोणी केली तर त्यांच्या झिरमाळ्या केल्या शिवाय धनगर समाज स्वस्थ बसणार नाही. बारामती येथील आश्वासनांचा कित्ता समाज विसरला नाही. धनगर समाजाला फसविणे आता सरकारला परवडणार नाही. सरकारकडून आरक्षण अंमलबजावणी व अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र येत्या 50 दिवसात देण्याचे आश्वासन दिले आहे. तोपर्यंत पुढील 50 दिवस विविध मार्गाने धनगर आरक्षण आंदोलन चालूच राहणार असल्याचेही उपोषणकर्ते यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले.
विखे पिता-पुत्रांविषयी केला संताप व्यक्त – चौंडी येथे तब्बल 21 दिवसांपासून धनगर समाजाकडून आरक्षणासाठी उपोषण करण्यात येत आहे. मात्र उपोषणस्थळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी उपोषणस्थळी भेट देण्याचे औदार्य दाखवले नसल्यामुळे यावेळी उपोषणकर्त्यांनी संताप व्यक्त करत त्यांचा निषेध केला. विशेष म्हणजे मंत्री गिरिश महाजन यांच्या उपस्थितीत विखे पिता पुत्राच्या जाहीर निषेधाच्या घोषणा धनगर समाजाने दिल्या.
COMMENTS