Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला; फळबागा आणि रब्बीच्या पिकांवर परिणाम

शिराळा / प्रतिनिधी : मे महिन्यापासून सुरु झालेला पाऊस पावसाळा संपला तरी काही पाठ सोडत नाही. कधीही डिसेबर महिना उजाडला तरी पाऊस हजेरी लावत आहे. पु

बळीराजा शेतकरी संघटनेचे कराडमध्ये धरणे आंदोलन
कोयनेच्या वीज प्रकल्पाचा ’महानिर्मिती’ समवेत केलेला 35 वर्षाचा करार संपला; प्रकल्प खाजगी प्रवर्तकाकडे हस्तांतरीत होण्याची शक्यता
यंदा पाऊस चांगला झाल्याने तुर पिकं डोलु लागल्याने शेतकरी समाधानी 

शिराळा / प्रतिनिधी : मे महिन्यापासून सुरु झालेला पाऊस पावसाळा संपला तरी काही पाठ सोडत नाही. कधीही डिसेबर महिना उजाडला तरी पाऊस हजेरी लावत आहे. पुढचे दोन तीन दिवस देखील राज्यात असाच पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
बळीराजाच्या मागे लागलेली निसर्गाची अवकृपा काही केल्या कमी होत नाही. काही महिन्यांपूर्वी ओल्या दुष्काळातून सावरलेला शेतकरी आता कुठे उभारी घेतो न घेतो तोच अवकाळी पावसाने त्याचे कंबरडे मोडले आहे. रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे.
मागील दोन दिवसांपासून चांदोली पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असून अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. मेणी ओढ्याला पाणी आले आहे तर वारणा नदी दुथडी भरुन वाहत आहे.
बुधवारी सकाळीपासून अवकाळी पावसाने सुरवात केली आहे. दिवसरात्र पडणार्‍या पावसामुळे शिराळा पश्‍चिम आणि उत्तर भागातील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाळ्यानंतर प्रथमच मेणी ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. अवकाळी पडलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचुन रब्बी हंगामात पेरणी केलेल्या गहू, हायब्रीड, ज्वारी, मका या पिकांचे नुकसान झाले आहे
पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पिक कुजण्याची भीती शेतकर्‍यांना आहे. यातून सावरण्यासाठी औषध फवारणीचा जास्तीचा खर्च शेतकर्‍यांच्या मानगुटीवर येऊन बसला आहे. पाऊस, धुके यामुळे रब्बी हंगामातील पिकांनवर परिणाम होतो आहे. याची झळ शेतकर्‍यांना बसणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यंदा सर्वच हंगामातील पिकांवर निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम पाहवयास मिळाला आहे. दर पंधरा दिवसांनी वातावरणात होणारा बदल शेती व्यवसायासाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. कारण शेतकर्‍यांचे परिश्रम तर निष्फळ ठरत आहेतच पण अधिकचा पैसा खर्ची करुन उत्पादन पदरी पडत नाही ही मोठी शोकांतिका आहे. आता फळबागासह, रब्बी हंगामातील पिकांनवर किडीचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेती करावी कशी असा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे.
धुक्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. बुधवारी दुपारपासुनच शिराळासह तालुक्यातील बिळाशी, कोकरुड, खुजगांव, चरण, आरळा, मेणी या भागात रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. ऊस तोड करणारे मजूर आणि फड मालकांची तारेवरची कसरत झाली. पाण्याने भरलेल्या रानातून तोडलेला ऊस बाहेर काढावा लागला. त्यामुळे पिकांच्या नियोजनासाठी शेतकर्‍यांना अधिकचा पैसा खर्च करावा लागणार आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर पाळीव जनावरावरही होत आहे. पावसामुळे शेतकर्‍यांची तारांबळ उडाली असून शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. खराब वातावरणामुळे लहान मुलांसह वृध्दांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. पावसामुळे ऊस तोडणीचा खोळंबा झाला असून पालावरील मजुरांचे हाल होऊ लागले आहेत.

COMMENTS