Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आढळा खोरे बारमाहीसाठी शेतकरी व कार्यकर्ते एकवटले

अकोले ः आढळा बारमाही बागायती करण्याचे स्वप्न आढळा खोर्‍यातील शेतकर्‍यांनी वर्षानुवर्ष उराशी बाळगले आहे. आज आढळा खोर्‍यातील सर्व गावांमध्ये तयारी

तुम्ही हाक द्या आम्ही साथ देण्यासाठी सज्ज ः विवेक  कोल्हे
कोपरगाव तालुक्यात पावसाच्या सरी
ध्रुव ग्लोबल स्कूलची उज्ज्वल निकालाची पंरपरा कायम

अकोले ः आढळा बारमाही बागायती करण्याचे स्वप्न आढळा खोर्‍यातील शेतकर्‍यांनी वर्षानुवर्ष उराशी बाळगले आहे. आज आढळा खोर्‍यातील सर्व गावांमध्ये तयारी करून समशेरपुर रेस्ट हाऊस या ठिकाणी या संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहिले. किसान सभेने यावेळी पश्‍चिम आढळा विभागामध्ये जांभूळ व सिताफळाची शेकडो रोपे 16 गावातून आलेल्या कार्यकर्त्यांना वितरित केली.
पश्‍चिमेकडे वाहून जाणारे पाणी आढळा खोर्‍यात वळवण्याच्या विविध पर्यायांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. आजपर्यंत या संदर्भात झालेल्या सर्व प्रयत्नांची माहिती घेत यासंदर्भामध्ये पुढे करावयाच्या कामाची आखणी करण्यात आली. आढळा  खोर्‍याचे तीन विभाग करून तिन्ही विभागांचे वेगवेगळे प्रश्‍न धसास लावण्यासाठी कार्यनीती ठरवण्यावर यावेळी कार्यकर्त्यांनी जोर  दिला. बिताका वळण चराबरोबरच, पाचपट्टा परिसरामध्ये सुद्धा अशाच प्रकारे पश्‍चिमेकडे वाहून जाणारे पाणी वळवता येऊ शकते. याबाबत अभ्यास करण्याचा व  ठोस प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. समशेरपुरचे सरपंच कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांनी ही बैठक यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी आढळा खोरे बारमाही बागायती व्हावे यासाठी करावयाच्या विविध प्रयत्नाबाबत सविस्तर मांडणी केली. जोडीला वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून आढळा खोरे सदाहरित करण्यावर भर देण्यासाठी कार्यक्रम घेण्यावर जोर दिला.  या खोर्‍यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळे आहेत मात्र या पर्यटन स्थळांचा विकास व प्रसिद्धी करण्यात कमतरता राहिली आहे. आढळा धरण, तवा धबधबा, टहाकारी येथील जगदंबा मंदिर, केळेश्‍वर मंदिर, खिरवीरे येथील चोमदेवाची गुहा, बितंगगड, विश्रामगड आदी पर्यटन स्थळांचा विकास व प्रसिद्धीबाबत ठोस उपाययोजना करण्यावर जोर देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. जलबिरादरीच्या वतीने विठ्ठलराव शेवाळे सर यांनी आढळा नदी संवाद यात्रे अंतर्गत तयार केलेला अहवाल सर्वांच्या समोर चर्चेसाठी ठेवला. नदी अधिक प्रवाही करण्यासाठी अनेक मौल्यवान सूचना त्यांनी यावेळी केल्या. जलसंपदा विभागातून निवृत्त झालेले इंजिनिअर श्री.संपतराव देशमुख यांनी या सबंध खोर्‍यात यापूर्वी जलसंपदाच्या व वन विभागाच्या वतीने सिंचनासंदर्भामध्ये राबवलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली व आगामी काळात काय करणे शक्य आहे याबाबत मार्गदर्शन केले. जलबिरादरीचे नारायण उगले, प्राचार्य सुभाष देशमुख, गुलाबराव सहाने, हरिभाऊ उगले व त्यांचे अनेक सहकारी यावेळी उपस्थित होते. किसान सभेचे नामदेव भांगरे, तुळशीराम कातोरे, राजाराम गंभीरे, ज्ञानेश्‍वर काकड, आदींनी रोपे वाटप उपक्रमासाठी विशेष प्रयत्न घेतले. आढळा खोर्‍यातील जुने जाणते नेते कोंडाजी पाटील  ढोन्नर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी सोमनाथ मेंगाळ, सुदाम नेहे, मधुकर दराडे, बादशाह एखंडे, बबन सदगीर, लहानु सदगीर, रामा एखंडे, सचिन दराडे, अरुण बेनके, निवृत्ती बेनके, शंकर चोखंडे, पंढरी चोखंडे, संदीप दराडे, दत्तू माळी, दत्तू चौधरी, दत्तू गोडसे, आदी विविध पक्षांचे कार्यकर्ते चर्चेत व उपक्रमात सामील झाले होते.

COMMENTS