जलयुक्तच्या कारवाईला चौकशी अहवालाची प्रतीक्षा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जलयुक्तच्या कारवाईला चौकशी अहवालाची प्रतीक्षा

अहमदनगर/प्रतिनिधी- भाजपच्या सत्ताकाळातील महत्त्वाकांक्षी असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी झाल्याने या योजनेची चौकशी राज्यात

काँग्रेसला पुन्हा सोनेरी दिवस आणण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करा…
कल्याण -विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर एकाच रात्रीतुन ६ वाहने पलटी
वंचितांना ऊबदार ब्लँकेट, कपडे व फराळचे वाटप

अहमदनगर/प्रतिनिधी- भाजपच्या सत्ताकाळातील महत्त्वाकांक्षी असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी झाल्याने या योजनेची चौकशी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सुरू केली आहे. मात्र, अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी नगरमध्ये बोलताना जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख़ यांनी, जलयुक्तच्या कामांबाबत चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. राज्यामध्ये मागील भाजपच्या सत्ताकाळामध्ये राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानसंदर्भात ज्या तक्रारी आलेल्या आहेत, त्यांची खुली चौकशी करण्याची शिफारस समितीने केली आहे. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर निश्‍चितपणे कारवाई केली जाईल, असे मंत्री गडाख यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, मागील पाच वर्षाच्या सरकारच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियानाची कामे करण्यात आली होती. त्या कामाच्या संदर्भात तक्रारी आल्यानंतर व कॅगने त्याबाबत अहवाल दिल्यानंतर या योजनेमध्ये जी कामे झाली, त्यातील 70 टक्के कामांमध्ये अनियमितता असल्याचे निष्पन्न झाले होते. 2000 कामांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकरणाची खुली चौकशी करावी, अशी शिफारस समितीने सरकारकडे केली होती. कामाचा दर्जा तसेच निकष या सर्व बाबींची पडताळणी करून ती समिती आपला अहवाल देणार आहे. अकराशे ते बाराशे कामांची चौकशी होणार असल्याचे मंत्री गडाख यांनी सांगितले.
संबंधित समितीने अहवाल दिल्यानंतर त्यानंतरच पुढील कारवाई निश्‍चितपणे केली जाईल, असेही गडाख यांनी यावेळी सांगितले. राज्यामध्ये त्यावेळेला नऊ हजार कोटी रुपयांचा खर्च जलसंधारण विभागाचा या अभियानावर झालेला होता. अनेक जिल्ह्यातून या कामांच्या तक्रारी आल्या होत्या. पण कामांची संख्या मोठी असल्यामुळे सर्वच कामांची चौकशी न करता समितीने अंतिम अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचेही मंत्री गडाख यांनी सांगितले.

ते चांगले काम करतात
नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबद्दल विचारले असता, सध्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ चांगल्या पद्धतीने काम करत आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असून कुठल्याही पक्षाच्या काही तक्रारी असतील, तर त्या एकत्रितपणे सोडवल्या जातात. समन्वयाने काम केले जाते. मी पालकमंत्री व्हावे, ही कार्यकर्त्यांची भावना असेलही, मात्र येथील पालकमंत्री चांगल्या पद्धतीने काम करत आहे. संवादातून अनेक प्रश्‍न मार्गी लागतात, आगामी काळामध्ये सुद्धा संवाद ठेवून जिल्ह्यातील सर्व प्रश्‍न आम्ही मार्गी लावणार असल्याचेही मंत्री गडाख यांनी सांगितले.

COMMENTS