Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विशाळगडावरील अतिक्रमणे महाशिवरात्रीपूर्वी काढणार

कोल्हापूर / प्रतिनिधी : येत्या महाशिवरात्रीपूर्वी विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिवदुर्ग स

जावळी तालुक्यात चोरट्यांकडून 21 बंद घरे लक्ष्य : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सह्याद्री खरेदी-विक्री संघ खत कारखाना उभारणार : सत्यजित देशमुख
पाडेगावच्या नववधूचे आधी लगीन परीक्षेसोबत; परिक्षेनंतर निरेत संपन्न झाला विवाह सोहळा

कोल्हापूर / प्रतिनिधी : येत्या महाशिवरात्रीपूर्वी विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिवदुर्ग संवर्धन समिती सदस्यांच्या बैठकीत दिली.
गुरुवार, दि. 8 पासून विशाळगडावरील अवैध धंदे रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त देणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार संभाजीराजे यांनी, विशाळगडावर ज्यांनी अतिक्रमण केले आहे, ते सर्वच काढा; त्यात हिंदू-मुस्लिम असा कोणताही वाद नसून, विशाळगडाची ओळख ही शौर्यस्थान म्हणून निर्माण करण्याची गरज आहे, असे सांगितले.
विशाळगडावर गेल्या काही वर्षांपासून पुरातत्त्व खात्याचे नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामे होत आहेत. तेथे अनेक अवैध व्यवसाय होत असल्याची बाब हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. याअनुषंगाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलवण्यात आली. यामध्ये विशाळगडावरील ग्रामस्थ व दुर्गप्रेमी उपस्थित होते.
संभाजीराजे यांनी विशाळगडाचा इतिहास सांगत असताना, गेल्या 30 वर्षांपासून विशाळगडावर अतिक्रमण वाढत असल्याचे सांगितले. जे मूळचे रहिवासी आहेत ते सोडून अन्य गावांतून व राज्यांतून लोक आले आणि कायमचे स्थायिक झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली. येथे इतिहासाची साक्ष देणारी मंदिरे तसेच दर्गाही आहे. पण मूळ दर्ग्याचा जीर्णोध्दार कोणाच्या परवानगीने केला, असा सवाल उपस्थित केला. ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी रस्तेही नाहीत, त्या रस्त्यांवर अतिक्रमणे केली आहेत. पर्यटकांना राहण्यासाठी लहान घरे बांधली गेली आहेत. गडावर तीन मजली इमारती उभारल्या आहेत. त्यांना परवानगी कोणी दिली? सध्या 17 बोअर मारले गेले आहेत. त्या कोणाच्या परवानगीने? अनेक घरे बांधताना बुरूज पाडून त्यातील दगडांचा वापर केला आहे. कोल्हापूर आगाराची एकच एसटी रात्री गडावर मुक्कामाला असते. पण विजापूर, हुबळी, रत्नागिरी येथील बसेस दररोज रात्री मुक्कामी असतात. त्यामधून कोण येते, याची चौकशी व्हावी. तसेच पुरातत्त्व विभागाला जो 5 कोटी रुपयांचा निधी मिळाला त्यातून जी कामे झाली त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.
यावेळी विशाळगडावरील ग्रामस्थ बंडू भोसले यांनी आमच्या अनेक पिढ्या गडावर वास्तव्यास आहेत, असे सांगितले. पण काळाच्या ओघात पर्यटकांची संख्या वाढत गेल्यानंतर काही प्रमाणात अतिक्रमण झाले आहे, याकडे लक्ष वेधले. आयुब कागदी यांनी हा दर्गा प्राचीन आहे. आम्ही सन 1960 पूर्वी राहत असल्याचे पुरावे आहेत. गडावर हिंदू-मुस्लिम समाज गुण्यागोविंदाने नांदत आहे. कोणताही वाद नाही, असे सांगितले. आबा वेल्हाळ यांनी, जे अतिक्रमण झाले आहे ते काढलेच पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी अन्य काही नागरिकांनी आम्ही ग्रामस्थ एकत्र येऊन अतिक्रमण काढून घेऊ, असे सांगितले.
आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही; पण जी ऐतिहासिक स्थळे आहेत त्यांची माहिती देणारे फलक आम्ही लावले होते, त्यावर काळे फासले गेले. कोंबड्या तसेच बकरी कापून त्यांची घाण गडावरच टाकली जाते. प्लास्टिक कचरा तसेच स्वच्छतेचा अभाव असून, अनेक ऐतिहासिक स्थळांचे अस्तित्व कायमचे पुसून जाण्यापूर्वी प्रशासनाने कारवाई करावी, असे बंडा साळोखे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शासन आदेशाप्रमाणे यापूर्वीच विशाळगडावरील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. महाशिवरात्रीपूर्वी ही कारवाई होईल. यासाठी लवकरच पोलीस विभाग, वन खाते, पुरातत्त्व खाते यांची बैठक घेऊन कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिले. बैठकीला अमित अडसुळे, दिलीप भिवटे, दिलीप देसाई, राम यादव, आझाद नायकवडी, किशोर घाटगे, प्रमोद सावंत, सुखदेव गिरी व शिवप्रेमी तसेच विशाळगड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS