Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. डॉ. विखेंनी दिली…शहर भाजपला चपराक

माफी मागायला लावली तरी जगतापांच्या सलगीला दिले महत्त्व

अहमदनगर प्रतिनिधी - ज्या आ. संग्राम जगताप(Sangram Jagtap) यांच्या सलगीवरून शहर भाजपने स्वपक्षीय खासदार डॉ. सुजय विखे(Dr. Sujay Vikhe) यांना माफी

Ahmednagar :वाराईचा प्रशन बिकट…व्यापारी गेले जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारी
Ahmednagar : किरण काळे अदखलपात्र आहे तर जगतापांनी १ कोटीची नोटीस का पाठवली (Video)
अहमदनगर शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या कामास सुरुवात : आमदार संग्राम जगताप

अहमदनगर प्रतिनिधी – ज्या आ. संग्राम जगताप(Sangram Jagtap) यांच्या सलगीवरून शहर भाजपने स्वपक्षीय खासदार डॉ. सुजय विखे(Dr. Sujay Vikhe) यांना माफी मागण्यास भाग पाडले, त्या खा. विखेंनी उड्डाण पुलाचे उदघाटन निर्धोकपणे पार पडण्याची चिन्हे दिसल्यावर शहर भाजपला सणसणीत चपराक लगावली. उड्डाण पुल उदघाटनातच आ. जगतापांची भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी त्यांनी भेट करवून दिली व जगतापांच्या खांद्यावर वारंवार हात थोपटत खा. विखेंनी त्यांच्या उड्डाण पुल उभारणीसाठीच्या सहकार्याची माहितीही गडकरींना दिली. त्यामुळे गडकरींनीही आपल्या भाषणात विखे-जगताप जोडगोळीवर कौतुकाचा वर्षाव केला. या सगळ्या प्रकाराने शहर भाजप मात्र तोंडघशी पडले आहे. शिवाय, मागील दोन वर्षात विखे-जगतापांच्या मैत्रीला शहर भाजपने आक्षेप घेतला नाही व उड्डाण पुल उदघाटनाच्यावेळीच का घेतला, या प्रश्‍नाने आता शहर भाजप संशयाच्या घेर्‍यात सापडले आहे व याचे दूरगामी परिणाम शहर भाजपवर पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे.
नगरच्या उड्डाण पुलाचे उद्घाटन निश्‍चित झाल्यावर 8-10 दिवसांपूर्वी खा. डॉ. विखे यांनी आ. जगतापांना समवेत घेत उड्डाण पुलाची पाहणी केली. उड्डाण पूल उभारणीसाठी (स्व.) माजी खा. दिलीप गांधी व आ. जगतापांच्या मिळालेल्या सहकार्याचे आभारही मानले. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार (स्व.) अनिलभय्या राठोड यांचे नाव घेण्यास विसरल्यावर व त्यावरून शहर शिवसेनेसह अनेकांनी त्यांच्यावर टीका केल्यावर खा. विखे यांनी मनमोकळेपणाने राठोडांचे नाव घेण्यास विसरल्याचे सांगून राठोडांची माफीही मागितली. मात्र, त्यानंतर चार-पाच दिवसांनी उड्डाण पुल उदघाटन नियोजनासाठी शहर भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीत खा. विखेंवर पक्षाचीच माफी मागण्याची वेळ आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारासोबत उड्डाणपुलाची पाहणी केल्याची बाब पक्षाच्या शहरातील पदाधिकार्‍यांना पसंत पडली नाही व पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्यांनाही रुचलेली नाही, असे ठामपणे त्यांना सुनावत, ते आपले विरोधक आहेत व तुम्ही विरोधकांच्या बरोबर फिरत आहात, हे कितपत योग्य आहे?, असा सवालही त्यांना केला गेला. शहरामध्ये भाजपचा आमदार कसा होईल या दृष्टिकोनातून व महापालिकेमध्ये पक्षाची सत्ता कशी येईल याचे नियोजन तुम्ही केले पाहिजे. मात्र उलट तुम्ही विरोधकांबरोबरच फिरता अशी तक्रार झाल्याने खा. विखेंनी तेथे तातडीने स्पष्टीकरण दिले व प्रोटोकॉल आहे, त्यानुसार आमदारांसमवेत गेलो होतो. पण, कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो, असे त्यांनी स्पष्ट करून त्यावेळी त्या वादावर पडदा टाकला. पण प्रत्यक्ष उदघाटन समारंभात मात्र शहर भाजपच्या आक्षेपाला काडीचीही किंमत दिली नाही व कार्यक्रमास उपस्थित आ. जगतापांचा स्वतः सत्कार केला तसेच त्यांना गडकरींजवळ घेऊन जाऊन जगतापांनी उड्डाण पुलासाठी केलेल्या सहकार्याची माहिती दिली. पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनीही जगतापांविषयीची माहिती आवर्जून गडकरींना दिली. त्यामुळे गडकरींनीही भाषणात त्याची दखल घेतली व विखे-जगतापांनी आगळावेगळा पायंडा सुरू केला असून, त्याचे अनुकरण सगळीकडे झाले पाहिजे असे सांगत त्यांनीही शहर भाजपच्या आक्षेपावर पाणी ओतून विखे-जगताप मैत्रीवर शिक्कामोर्तब केले. मात्र, आता हा विषय शहरात चर्चेचा झाला आहे.
आताच आक्षेप का?
तीन वर्षांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत खा. विखे व आ. जगताप हे परस्परांसमोर उभे ठाकले होते. त्यात विखेंनी जगतापांवर मात करून खासदारकीची निवडणूक जिंकली. पण त्या निवडणुकीतील कटूता विसरून नंतर विखेंनी जगतापांशी जुळवून घेतले. अर्थात त्यावेळी मनपात राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरील भाजपचीच सत्ता होती. त्यामुळे विखेंनी जगतापांशी सलगी ठेवत शहरातील बहुतांश विकास कामांमध्ये त्यांना समवेत घेतले. त्यावेळी शहर भाजपने मात्र या मैत्रीला अजिबात विरोध केला नाही. त्यानंतरही शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर या महाविकास आघाडीच्या सत्तेच्या काळातही विखे-जगताप मैत्रीला शहर भाजपचा कधी विरोध झाला नाही. त्यामुळे अचानक उड्डाण पुलाच्या उदघाटनाच्यावेळी शहर भाजपने या मैत्रीला घेतलेला आक्षेप चर्चेत आला आहे. मात्र, पक्षाच्या बैठकीत खा. विखेंनी माफी मागून उड्डाण पुलाचे उदघाटन सुरळीतपणे पार पाडून घेतले व उड्डाण पुलाच्या प्रत्यक्ष उदघाटन कार्यक्रमात मात्र आक्षेप घेणार्‍या शहर भाजपच्या नाकावर टिच्चून आ. जगतापांची गडकरींशी भेट घडवून आणली व वारंवार जगतापांच्या खांद्यावर थोपटत त्यांचे राजकीय महत्त्वही गडकरींना सांगितल्याने शहर भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

त्या रागातून तर नव्हे? – उड्डाण पुलाखालील पाणीपुरवठा वाहिन्या, विद्युत तारा व ड्रेनेज शिफ्टिंगसाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 53 कोटी रुपये मंजूर झाले होते व त्यातील 17 कोटी पहिल्या टप्प्यात आले होते. त्यातून भूसंपादन व अन्य काही कामे झाली. पण नंतर महाविकास आघाडी सरकार आल्याने या काळात राहिलेले पैसे मिळावेत व पुलाचे काम सुरळीत व्हावे म्हणून विखेंनी जगतापांशी जुळवून घेतल्याचे सांगितले जाते. या मैत्रीमुळे पुलाचे व त्याखालील शिफ्टींगचे कामही विना अडथळा पार पडले. त्या काळातील विखे-जगतापांच्या मैत्रीला शहर भाजपचा आक्षेप नव्हता. त्यामुळे आताचा होत असलेला विरोध मनपातील विरोधी पक्ष नेतेपद मिळत नसल्याच्या रागातून तर नव्हे ना, अशीही चर्चा रंगू लागली आहे.

COMMENTS