यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट गडद होतांना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. एकतर जून महिन्
यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट गडद होतांना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. एकतर जून महिन्यामध्ये पाऊस न झाल्यामुळे पेरण्या उशीरा झाल्या. जुलै महिन्याच्या मध्यावधीत पाऊस झाल्यानंतरच शेतकर्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर पीक चांगलेच बहरत असतांना, गेल्या 20 दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जर राज्यात आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास राज्यावर दुष्काळ कोसळू शकतो. एकतर कर्जाअभावी शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत असतांनाच, पुन्हा एकदा राज्यावर जर दुष्काळ कोसळला तर, शेतकर्यांसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहु शकतात. कारण यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने नद्या नाले, धरणात पुरेसे पाणी नाही. परिणामी शेतकर्यांची जनावरांची, सर्वसामान्यांची तहान कशी भागवायची हा प्रश्न उभा राहतांना दिसून येत आहे. जनावरांना पुरेसा चारा मिळतांना दिसून येत नाही, त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये चारा महागण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राने अनेक दुष्काळ पाहिले आहेत. या दुष्काळात पिण्यासाठी पाण्याचा अभाव, जनावरांना चारा छावणीत नेऊन ठेवण्याची पाळी, ग्रामीण भागात रोजगारीचा अभाव व त्यामुळे जवळच्या शहरांकडे ग्रामस्थांची होणारी वाटचाल ही या वर्षीच्या दुष्काळाची ठळक वैशिष्ट्ये दिसून येतात. 1972 साली पण असाच मोठा दुष्काळ पडला होता. दोन वाईट गोष्टींची तुलना करू नये पण 1972 चा दुष्काळ या दुष्काळाच्या मानाने सुसह्य होता. कारण त्या दुष्काळात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती आजच्या मानाने बरी होती. याचे प्रमुख कारण म्हणजे स्वत:चे पोट भरण्याच्या हव्यासापोटी मानवाने जमिनीचे पोट आजच्या सारखे रिकामे करून ठेवले नव्हते. 75 वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा शिकत होतो त्यावेळी आम्हाला शिकविले गेले की पाच वर्षातून एक हंगाम चांगला, एक बरा व तीन कष्टदायक अशी परिस्थिती असते. आजही 75 वर्ष उलटून गेल्यावर सुध्दा या परिस्थितीत काहीही बदल झालेला दिसत नाही. हे केव्हा तर सिंचनावर लाख करोड रूपये खर्च केल्यावर. आपल्या नियोजनात काही चुकत तर नाही ना अशी शंका यावयास दाट जागा निर्माण झाली आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागाचे अंदाज सपशेल फेल ठरतांना दिसून येत आहे. हवामान विभागाकडून राज्यात 17 ऑगस्टपासून चांगल्या पावसाला आणि 18 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र ऑगस्ट महिन्याचा शेवट सुरू असतांना देखील राज्यात पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आगामी काही दिवसांमध्येे जर पाऊस न झाल्यास राज्यात भयावह परिस्थिती निर्माण होवू शकते, याचा अंदाज व्यक्त न केलेलाचा बरा. मात्र सरकारने आणि प्रशासनाने सावध राहून उपाययोजना करण्याची गरज आहे. आजमितीस पिके होरपळतांना दिसून येत आहे. अजून काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर, पिके जळून खाक होण्याची शक्यता आहे. अशावेळी शेतकर्यांनी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, आणि घरात काय खायचे, मूलभूत गरजा कशा पूर्ण करायच्या, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, यासह अनेक बाबी शेतकर्यांसमोर तोंड वासून उभ्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव आत्महत्येचा पर्याय निवडतो. त्यामुळे राज्यात शेतकर्याला वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून हवामान विभागाचा अंदाज अचूक येत असल्यामुळे शेतकर्यांना फायदा होत होता. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागाचा अंदाज देखील चुकतांना दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून एक स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ देखील पावसाचे चांगेलच भविष्य सांगतांना दिसून येत आहे. मात्र या स्वयंघोषित तज्ज्ञांचे अंदाज देखील चुकत आहे. त्यामुळे अशा हवामान तज्ज्ञांनी आता स्वतःला आवर घालण्याची गरज आहे. राज्यात दुष्काळाचे सावट गडद होण्यापूर्वीच उपाययोजना आखण्याची गरज आहे. महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राजकीय नेत्यांनी केली आहे. राज्यात 2016, 2018 मध्ये पडलेले दुष्काळ, त्यानंतरच्या वर्षांमध्ये झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुष्काळ पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे तापमान वाढ होय. पावसाचे बदलते स्वरूप, म्हणजे मोसमात कधी पावसात घट तर कधी अतिवृष्टी, अवर्षणामुळे दुष्काळाच्या झळा असह्य होतात. राज्यातल्या अनेक भागात कोरडा दुष्काळ पडल्यामुळे भूजलपातळीवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे या भागातील विहिरी कोरड्या पडून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
COMMENTS