Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक प्रवासातील सातारा

सुशिल गायकवाड / लोणंद / वार्ताहर : शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, विद्यार्थ्यांनो जागृत व्हा, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या

आटपाडी तालुक्यातील समन्यायी पाणी वाटपाचे सादरीकरण
किल्ले प्रतापगडावर शिवजयंती उत्साहात साजरी
सरकारी नोकर्‍यांमध्ये कंत्राटी पध्दतीने नोकर भरतीचा दुर्भाग्यपूर्ण निर्णय : आ. पृथ्वीराज चव्हाण

सुशिल गायकवाड / लोणंद / वार्ताहर : शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, विद्यार्थ्यांनो जागृत व्हा, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. अशी गर्जना करणारे विद्यार्थी प्रिय व विद्यार्थ्यांचे प्रेरणास्त्रोत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. त्यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रवासात सातारच्या मातीपासून ते अगदी परदेशाच्या मातीतून शिक्षणाचे धडे गिरवत शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याची मोठी किमया केली आहे. उच्च विद्याभूषित बनलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ आपल्या देशासाठीच नव्हे तर जगासाठी प्रेरणास्त्रोत बनले आहेत. ते भारतरत्न नाही तर विश्‍वरत्न म्हणून ओळखले जात आहेत. बाबासाहेबांच्या कार्याची कीर्ती ही जगात असून ज्या सातार्‍यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले शैक्षणिक पाऊल पडले त्या सातारच्या मातीसाठी ही अभिमानाची आणि गौरवाचीच बाब आहे.
7 नोव्हेंबर 1900 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सातार्‍यातील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 7 नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. या शाळेत त्यांनी 7 नोव्हेंबर 1900 ते 1904 पर्यंत इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता चौथीपर्यंत इंग्रजीतून शिक्षण घेतले. आजही शाळेच्या रजिस्टर मध्ये 1914 या अनुक्रमांकावर भिवा हे नाव पाहायला मिळते. हा एक ऐतिहासिक असा दस्तऐवज शाळेत जपून ठेवण्यात आला आहे. या शाळेस भेट देणार्‍या अनेकांना हा ऐतिहासिक दस्तऐवज पाहण्यास मिळत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी सपकाळ हे लष्करातून सेवानिवृत्त झाल्यावर ते आपल्या कुटुंबाला सातार्‍यात घेऊन आले. त्यामुळे भिवा म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाची सुरुवातच सातार्‍यातून झाली.
प्राथमिक शिक्षणाचा पाया सातार्‍यात भक्कमपणे रोवला गेला. रामजी सपकाळ सातार्‍यात वास्तव्यास आल्याने भिवाचे शिक्षण येथे झाले. आज बाबासाहेबांची महानता लक्षात घेता सातारा हा शैक्षणिक उर्जेचे ऊर्जा स्त्रोत बनलेले आहे. याच शाळेतून अनेक विद्वान व्यक्तींनी शिक्षण घेतले आहे. त्यामुळे शाळेस विशेष कौतुकाने पाहिले जाते.
रामजी सपकाळ आणि त्यांचे कुटूंब सातार्‍यात वास्तव्यात आल्यानंतर दैनंदिन जीवनात अनेक अडचणी समोर होत्या. भिवाच्या शिक्षणाचा प्रवास हा खडतर असाच होता. जातीयता आणि अस्पृश्यतेने इथली समाज व्यवस्था माणसा माणसाला माणसापासून दूर लोटत असताना यातून मार्ग काढत एक शैक्षणिक संघर्ष चालू होता. परंतू इथल्या व्यवस्थेला प्रश्‍न विचारण्याची सद्सद् विवेकबुध्दी भिवामध्ये लहान वयापासूनच होती. संघर्ष तर चारी बाजूने होता. परंतु ह्यास भिडण्याची क्षमता होतीच होती. आज हाच संघर्ष नव्या परिवर्तनाची नांदी बनत जाताना सातार्‍याला ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक प्रवासाने ऐतिहासिक व उर्जेचे केंद्र म्हणून बनलेल्याने एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारच्या मातीतून ते परदेशात उच्च शिक्षण घेण्यापर्यंत संघर्षमय असाच शैक्षणिक प्रवास केलेला आहे. हे जगाला ज्ञात आहे. आज हेच जग त्यांच्या कार्याची दखल घेत असताना एक ज्ञानी विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडे पाहत आहे. हेच सातार्‍यासाठी अभिमानाची बाब आहे. बाबासाहेबांसारखा ज्ञानी विद्यार्थी हा एक ज्ञानाचा महासागर आहे. त्यामुळे बाबासाहेब हे आजच्या विद्यार्थ्यांना कळणे गरजेचे आहे. विद्यार्थी हित व त्यांचे शिक्षण विषयक प्रश्‍न, अडीअडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेब हे मार्गदर्शक ठरणारे आहेत.बाबासाहेब हे विद्यार्थी प्रिय होते.
प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे काम करत असताना विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम ही त्यांनी केले आहे. सातार्‍यात शैक्षणिक प्रवासाचा आरंभ झालेल्या बाबासाहेबांच्या कार्याचे कौतुक तर सातार्‍याच्या मातीला राहणारच. शिवाय याच मातीतून विद्यार्थी दिनी दरवर्षी विद्यार्थी दिनाच्या अनुषंगाने 7 नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते. त्यांना दरवर्षी मानवंदना दिली जात असते. सातार्‍यातूनच नव्हे तर राज्यातील कानाकोपर्‍यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम घेणे अपेक्षित आहे. या दिनी गरीब गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्य देण्यापासून ते अनेक विद्यार्थी दत्तक घेण्यापर्यंतचे कृतिशील उपक्रम हे घेता येऊ शकतात. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या जीवन प्रवासाबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. आजच्या विद्यार्थ्यांसाठी, विविध विद्यार्थी संघटनांसाठी तसेच इथल्या प्रत्येक व्यक्तींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा ज्ञानी विद्यार्थी हा एक ज्ञानाचा महासागर आहे. त्यामुळे बाबासाहेब हे आजच्या विद्यार्थ्यांना नव्हे तर सर्वानाच कळणे गरजेचे आहे.

COMMENTS