डॉ. आंबेडकर पुतळ्यासाठी नगरमध्ये रिपब्लिकन ऐक्य

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. आंबेडकर पुतळ्यासाठी नगरमध्ये रिपब्लिकन ऐक्य

तीन आठवड्यांचा दिला अल्टीमेटम

अहमदनगर/प्रतिनिधी : आठवले, आंबेडकर, गवई वा कवाडे या दिग्गज रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना जे जमले नाही, ते रिपब्लिकन ऐक्य या नेत्यांच्या नगरमधील अनुया

कोपरगावमध्ये ८ मे पर्यंत कडक जनता कर्फ्यु
अहमदनगर मध्ये मयत झालेल्या माणसांच्या रक्षा,अस्तीचा काळाकारभार | LokNews24
भंडारदरा येथे वन्यजीव विभागाच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी : आठवले, आंबेडकर, गवई वा कवाडे या दिग्गज रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना जे जमले नाही, ते रिपब्लिकन ऐक्य या नेत्यांच्या नगरमधील अनुयायांनी प्रत्यक्षात आणले आहे. नगरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी शहरातील रिपब्लिकन चळवळीतील सर्व गटांचे व विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले असून, येत्या तीन आठवड्यात या पुतळा कामाचे भूमिपूजन झाले नाही तर डॉ. आंबेडकर जयंतीच्या दिवशी कोणत्याही शासकीय अधिकार्‍याला डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याच्यानिमित्ताने पुष्पहार घालू दिला जाणार नाही, असा इशाराही दिला आहे.
राज्य वा राष्ट्रीय राजकारणात रामदास आठवले, बाळासाहेब आंबेडकर, रा. सु. गवई, जोगेंद्र कवाडे या नेत्यांचे नेतृत्व मानत रिपब्लिकन पक्षाचे काम करणारे वा राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस व अन्य पक्षांच्या सामाजिक न्याय विभागाची धुरा सांभाळणारे नगरमधील आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते नगर शहरात डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याच्या मागणीसाठी एकत्र आले आहेत. मध्यंतरी या सर्वांनी मार्केट यार्ड चौकातील सध्याच्या डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर लाक्षणिक आंदोलनही केले होते व मनपात बैठकही घेतली होती. डॉ. आंबेडकरांच्या सध्याच्या असलेल्या पुतळ्याच्या जागेवरच पूर्णाकृती पुतळा उभा करण्याची त्यांची मागणी आहे. मात्र, परिसरातील एका हॉटेल अतिक्रमणासंदर्भात न्यायालयीन खटला सुरू असल्याने त्याच्या निकालाची प्रतीक्षा आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील रिपब्लिकन चळवळीतील सर्व पदाधिकार्‍यांनी पुतळा समिती स्थापन केली असून, येत्या 14 एप्रिलला डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन महापालिकेने करावे, अशी मागणी केली आहे. या दिवशी असे भूमिपूजन झाले नाही तर त्या दिवशी कोणत्याही शासकीय अधिकार्‍याला डॉ. आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी पुष्पहार घालू दिला जाणार नाही, असा इशाराही दिला आहे.
रिपब्लिकन चळवळीतील अजय साळवे, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, प्रतीक बारसे, बंडू आव्हाड, संजय कांबळे, प्रशांत गायकवाड, किरण दाभाडे, सोमा शिंदे, बंटी भिंगारदिवे, योगेश थोरात, सागर ठोकळ, नितीन खंडागळे, संतोष जाधव, संदीप वाघमारे, सुशांत म्हस्के, सुनील शिंदे, नाथा अल्लाट, सुनील क्षेत्रे आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मार्केट यार्ड चौकात डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे येत्या चौदा एप्रिलला भूमिपूजन करा, अशी मागणी केली आहे. यासाठी विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा कृती समितीची स्थापना करण्यात आल्याचेही स्पष्ट केले. डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे 14 एप्रिल रोजी भूमिपूजन झाले नाही तर अधिकार्‍यांना हार घालू दिले जाणार नाही व आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
नगर शहरातील आंबेडकर चळवळीतील विविध पक्ष संघटनांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मार्केट यार्ड चौकात बसवण्यात यावा म्हणून वेळोवेळी आंदोलन करून पाठपुरावा केला आहे. त्या प्रयत्नांना यश येत असल्याचे मनपाच्या हालचालीवरून दिसून येत आहे. त्याकरिता आंबेडकरी चळवळीतील विविध राजकीय पक्ष व संघटना यांनी आपले राजकीय अस्तित्व बाजूला ठेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा नगर शहरात स्थापन केला जावा म्हणून एकत्र येत पूर्णाकृती पुतळा समिती स्थापन केली असून या समितीच्या माध्यमातून पूर्णाकृती पुतळा बसवण्यासंदर्भाचा लढा देण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळा संघर्ष समिती, संयोजन समिती, सल्लागार व मार्गदर्शक समिती, महिला समिती, प्रसिध्दीप्रमुख, सोशल मीडिया प्रमुख या समित्यांची घोषणा करण्यात आली.

चार पुतळे उभे राहणार
मनपाच्यावतीने औरंगाबाद महामार्गावरील मनपा मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठीत पुतळा उभारण्यात येणार असून माळीवाडा येथे महात्मा फुले, सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराज व मार्केट यार्ड चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे मनपाचे नियोजन सुरू आहे. यासाठी मनपाने स्थापन केलेल्या पुतळा समिती सदस्यांसह पोलिस व प्रशासनातील अधिकार्‍यांनी संबंधित जागांची सुरक्षेच्यादृष्टीने पाहणीही केली आहे.

COMMENTS