भोकर प्रतिनिधी - तेलंगणा - महाराष्ट्र राज्य सिमेलगत असलेल्या मराठवाड्यातील मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणार्या व माजी मुख्यमंत्री अशोक
भोकर प्रतिनिधी – तेलंगणा – महाराष्ट्र राज्य सिमेलगत असलेल्या मराठवाड्यातील मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणार्या व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील भोकर कृषि उत्पन्न बाजार समितीचे स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर असे नामांतर होऊन जवळपास पाच वर्ष होऊन गेलीत.परंतू सद्या होऊ घातलेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक कामकाजात स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांचे नाव कुठल्याही प्रशासकीय कागदपत्रांवर दिसत नसल्याची गंभीर बाब निदर्शनास येत असून ’त्या’ नामांतराची प्रशासकीय नोंदीत अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याने ही अक्षम्य चूक तत्कालीन संचालक मंडळाच्या पाठपुरावा न करण्याची आहे का तालुका व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अधिकार्यांची आहे ? यावर प्रश्नचिन्ह उभे आहे.तर निवडणूक प्रचारात ते नाव वापरावं का नाही ? अशी चर्चा संभ्रमावस्थेतील काही उमेदवारांतून होत आहे.
भोकर कृषि उत्पन्न बाजार समिती,भोकर जि.नांदेड ची दि.25 ऑगस्ट 1960 मध्ये स्थापना झाली.महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी ही बाजार समिती असून पुर्वीचे आंध्रप्रदेश व आजच्या तेलंगणा राज्य सिमेलगत असल्याने दोन राज्यांतील शेतकर्यांचा शेती उत्पन्न माल या बाजार पेठेत विक्रीसाठी येतो.अनेक वर्ष सदरील बाजार समितीचा कारभार आमदार स्व.बाबासाहेब देशमुख गोरठेकर,माजी आमदार स्व.बापूसाहेब देशमुख गोरठेकर,माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर,माजी सभापती नागनाथ घिसेवाड यांसह आदींच्या गटांनी पाहिला.तर सन 2009 मध्ये भोकर विधानसभा मतदार संघाची रचना बदलली व येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची एंट्री झाली.त्यांच्या अधिपत्याखाली सदरील बाजार समितीवर एकहाती सत्ता आली व सभापती जगदिश पाटील भोसीकर यांच्या संचालक मंडळाने भोकर विधानसभा,नांदेड जिल्हा,महाराष्ट्र राज्य व देश पातळीवर नेतृत्व करुन विविधांगी विकास साधणार्या माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि योगदानाची दखल घेऊन भोकर कृषि उत्पन्न बाजार समितीचे स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती असे नामांतर करण्याचा ठराव सन 2017 मध्ये घेतला. यानंतर भोकर कृषि उत्पन्न बाजार समितीची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी बहुउद्देशीय भव्य इमारत बांधण्याचा निर्णय घेतला.ठरावानुसार स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नुतन इमारतीच्या बांधकामाचा भूमीपूजन सोहळा दि.25 ऑगस्ट 2018 रोजी तत्कालीन मंत्री अशोकराव चव्हाण व तत्कालीन आमदार अमिता भाभी चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भुमिपूजन कोणाच्या हस्ते करायचे ? म्हणून काँग्रेस पक्ष व भाजपा- शिवसेनेच्या संचालकांत वाद रंगला आणि दोन्ही गटांनी आपापल्या परीने भुमिपूजन केले.सदरील इमारत पुर्णत्वास आली व या इमारतीचा लोकार्पण सोहळा दि.14 जून 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता तत्कालीन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या इमारतीस ही स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले असून याच इमारतीत स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे कार्यालय सुरु करण्यात आले.देशाच्या एका कर्तुत्ववान व्यक्तीमत्वाचे नाव सदरील बाजार समितीस देण्यात आल्याने अनेकांतून त्या संचालक मंडळाचे कौतुक व अभिनंदन केले. याच बाजार समितीच्या 18 संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सद्या होऊ घातलेली आहे.काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,भाजपा- शिवसेना,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष,भारत राष्ट्र समिती व आदी पक्ष अपक्षांच्या गटातील जवळपास दोनशे इच्छूक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. छाननी झाली आहे व दि.6 एप्रिल 2023 पासून ते दि.20 एप्रिल 2023 पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुद्दत आहे.उमेदवारी अर्ज माघारी नंतर प्रत्यक्ष कितीजण निवडणूक लढणार आहेत हे चित्र स्पष्ट होईल. दि.28 एप्रिल 2023 रोजी मतदान होईल व दि.29 एप्रिल 2023 रोजी मतमोजणी पार पडेल आणि नुतन संचालक मंडळ अस्तित्वात येईलही.परंतू हे होत असतांना दरम्यानच्या काळात पार पडत असलेल्या निवडणूक कामकाजात एक दखलपात्र बाब निदर्शनास येत आहे,ती म्हणजे निवडणूक प्रक्रियेतील कामकाजात कुठल्याही प्रशासकीय कागदपत्रांवर स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर असे लिहलेले दिसत नाही.देशाच्या एका कर्तुत्ववान नेत्याचे नाव उल्लेखिल्या जात नाही ही बाब अक्षम्य आहे,नव्हे तर निंदनीय आहे.तसेच उमेदवार असोत का त्यांचे नेते असोत याबाबद कोणीही काहीही बोलण्यास तयार नाहीत किंवा ही चुक दुरुस्त करावी म्हणून निवडणूक विभागास सांगत ही नाहीत.यामाघिल गौडबंगाल काय आहे ? हे जाणून घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी एस.जी.गन्लेवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,या बाजार समितीच्या नामांतराचा ठराव नक्कीच झालेला आहे.परंतू राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण,महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाने तशी नोंद घेऊन अधिसूचना काढायला पाहिजे.त्यांनी का काढली नाही याबाबत मी काहीही सांगू शकत नाही. कारण मला तसे अधिकार नाहीत म्हणून मी त्यांना अधिक विचारु शकत नाही.त्यांनी व माझ्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे हे माझे काम असून त्यानुसार मी माझे कर्तव्य करत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे वडील म्हणून नव्हे तर देशाच्या एका कर्तुत्ववान नेत्याचे नाव सदरील बाजार समितीस दिलेले असतांना या नामांतराची प्रशासकीय नोंदीत अंमलबजावणी का बरे करण्यात आली नाही ? याचा जाब सर्वांनीच विचारला पाहिजे.कारण निवडणूक प्रक्रियेतील प्रचार,प्रसिद्धी फलकांवर अधिकृतपणे स्व. डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर असे लिहणे गरजेचे आहे.आणि जर तसे लिहिले तर प्रशासकीय नोंदीनुसार ते योग्य राहणार नाही.असे असतांना या दखलपात्र बाबींकडे लक्ष न देता मलाच कशी अधिकृतपणे मोठ्या पॅनल कडून उमेदवारी मिळेल ? यातच अनेकजण मशगुल आहेत.देशाचे नेते स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांना माणणार्यांनी तरी किमान या बेदखल बाबीकडे लक्ष घालून तात्काळ ’त्या’ नामांतराची अंमलबजावणी करुन घेतली पाहिजे,असे अनेकांतून बोलल्या जात आहे.पाहुयात ही दुरुस्ती होते का ? दुरुस्तीविनाच निवडणूक पार पडते ?
COMMENTS