अहिल्यानगर ः अभिजात मराठी भाषेचा गौरव म्हणजे मायमराठी च्या संस्कृतीला प्रतिष्ठित करणे असून... भाषा मरता देशही मरतो... परकीचे पद चेपू नका हे कविवर्

अहिल्यानगर ः अभिजात मराठी भाषेचा गौरव म्हणजे मायमराठी च्या संस्कृतीला प्रतिष्ठित करणे असून… भाषा मरता देशही मरतो… परकीचे पद चेपू नका हे कविवर्य कुसुमाग्रजांच्या तळमळीच्या आवाहनातील सूत्र लक्षात घेऊन मराठी भाषेची प्रतिष्ठा राखली जावी असे मत श्रीरामपूर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शाखा उपाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
शेवगाव येथील न्यू आर्टस, कॉमर्स ण्ड सायन्स कॉलेजमध्ये अभिजात मराठी भाषादिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते.अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे होते. मान्यवरांनी प्रारंभी ज्ञानपीठ विजेते वि.वा.शिरवाडकर तथा कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात केले. स्वागत, प्रास्ताविक करून मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ. वसंत शेंडगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मराठी भाषा पंधरवाडा आणि मातृभाषा कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिन, मराठी राजभाषा गौरवदिन या महापर्वणीनिमित्त मराठी विभाग आणि अनुराधा प्रकाशन पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवाद, साहित्य आणि सृजनशीलता या विषयावर बोलताना डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी मराठी भाषेचा अडीच हजार वर्षातील गौरवशाली ऐतिहासिक संदर्भ सांगून आजच्या काळातील. मराठी भाषेची स्थितीगती विशद करून मान्यवर व विद्यार्थ्यांना अनेक पुस्तके भेट दिली. प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, मातृभाषेतूनच आपली भावनिक व बौद्धिक क्षमता वाढते. मातृभाषे पेक्षा परकीय भाषा पचविणे आणि वापरात आणणे कष्टप्रद ठरते. ज्या देशांनी मातृभाषेतून शिक्षण आणि व्यावहारिक कलाकौशल्ये प्राप्त केले, त्या देशांनी जगात गतीने प्रगती केली, नोबेल पुरस्कार प्राप्त केले, असे सांगून मराठी भाषेला प्रतिष्ठा देणार्या कवी,लेखक, समीक्षक,संशोधकांचे अपूर्व योगदान लक्षात घ्यावे. कविवर्य कुसुमाग्रजांच्या कविता सादरीकरण करून त्यांनी कुसुमाग्रजांचे चरित्रकथन केले. मराठी विभागाच्या उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमात अध्यक्षीय सूचना कु.गीता रोडगे यांनी केली.अनुमोदन कु. अश्विनी कापसे हिने दिले. सार्थक कापसे, सोमनाथ रोडगे, अभिमन्यू आहेर, साक्षी साळवे, भारती सर्जे, रूपाली जगधने, वर्षा घोडेचोर, बेबी जाधव, सानिया बेग या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. यानिमित्ताने घेतलेल्या निबंध व कवितालेखन स्पर्धेचे प्रमाणपत्रे,पुस्तके रोख रकमा मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब गबाजी कसबे यांनी केले तर कु. अनुराधा शेटे यांनी आभार मानले. सामुहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या वाचन संस्कृतीने बळ दिले: प्रो. डॉ. वसंत शेंडगे
डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी 1977-78पासून नगर जिल्ह्यात वाचन संस्कृतीला दिशा आणि बळ दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला पीएच.डी. पदवी मिळाली. लेखन प्रकाशित झाले, हे गुरुवर्य डॉ. उपाध्ये यांचे सकारात्मक, संस्कृतीशील, वाचन,लेखनातील कौशल्य उपयुक्त ठरले. त्यांचा मी विद्यावाचस्पती म्हणून प्रथम विद्यार्थी ठरलो, आज माझ्या मार्गदर्शनाखाली 22 विद्यार्थी संशोधन करतात काहींना डीग्री मिळाली, शेवगावचा मराठी विभाग गुणवत्ताशील आहे, याचा सार्थ गौरव वाटतो, त्यामुळेच असे गुरुवर्य लाभणे सदभाग्य असल्याचे सांगून डॉ. वसंत शेंडगे यांनी कविवर्य कुसुमाग्रज, मराठी भाषेचे महत्त्व याविषयी विस्तृत विवेचन करुन डॉ. उपाध्ये यांचा सन्मान केला.

COMMENTS