सातारा/प्रतिनिधी ः महाराष्ट्रात सध्या भाजपविरोधातील असंतोष वाढत असून, या रोषामुळेच भाजप सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास तयार

सातारा/प्रतिनिधी ः महाराष्ट्रात सध्या भाजपविरोधातील असंतोष वाढत असून, या रोषामुळेच भाजप सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास तयार नसून, या निवडणुका पुढे ढकलण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 64 व्या पुण्यतिथी निमित्त मंगळवारी सातार्यातील कर्मवीर समाधी परिसरात शरद पवार यांनी अभिवादन केले, यावेळी ते बोलत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकार पुढे पुढे ढकलत आहे, याचा अर्थ या सरकारला लोकांना सामोरे जायला भीती वाटते आहे, त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात येत असल्या तरी, जनतेच्या रोषापासून भाजपला जास्त दिवस पळ काढता येणार नाही, असे देखील पवार यावेळी म्हणाले. राज्यात एकीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा राजकीय सामना चालू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांमध्येही एकमेकांवर आरोप केले जात असल्याचे दिसून येत आहे. यावर पवार म्हणाले, आघाडीमध्ये सर्वजण सगळ्या मुद्द्यांवर सहमत असेलच असे होत नाही. सर्वांची ध्येय धोरणे वेगळी असतात त्याप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने व्यक्त करत असतो.पक्षात नव्या नेतृत्त्वाची फळी निर्माण कशी करायची, हे आमच्यातील प्रत्येकाला माहिती आहे. आम्ही कुणाला संधी दिली, ते बाहेर जाऊन त्याची प्रसिद्धी करत नाही. मग त्यांनी काय लिहिले त्याला आम्ही महत्त्व देत नाही, असे सांगत शरद पवारांनी खासदार संजय राऊतांना देखील चांगलेच फटकारले. आम्ही काय करतोय हे आम्हाला माहिती आहे आणि त्यात आम्हाला समाधान आहे, असे पवार यांनी टीकेला उत्तर दिले. कर्नाटकातील प्रचारात बजरंग बली की जय अशी घोषणा देऊन मते मागण्यात येत आहेत यावर बोलताना पवार म्हणाले, ज्यावेळी आम्ही निवडणुकीचा अर्ज भरतो, निवडून येतो शपथ घेती त्यावेळी आम्ही राज्यपाल, सभापती, लोकांच्या समोर शपथ घेतो. त्यावेळी आम्ही शपथ घेतो की, आमचा, लोकशाही, धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे. जे आमदार झाले, मंत्री झाले. त्यांनीही या शपथा घेतल्या आहेत. पण धर्माच्या आणि जातीच्या नावाने मते मागणे त्या शपथेचा भंग आहे. पण देशाचे पंतप्रधान या प्रकारची भूमिका देशासमोर मांडतात, याची मला गंमत वाटते. भाजपचे मंत्री लोकसभा मतदारसंघांमध्ये जनसंपर्क यात्रा काढत आहेत. मागील पाच वर्षांत ज्यांना देशातले मतदारसंघ कळाले नाहीत. मंत्री कोण आहेत कोण कोठे काम करतात हे देशातील लोकांनाच माहीत नाही. ते दाखविण्यासाठी या मंत्र्यांच्या जनसंपर्क यात्रा सुरू आहेत. यापेक्षा वेगळे काही नाही. आजपर्यंत मिश्रा नावाचे मंत्री आहेत हे मी तरी ऐकले नव्हते. पण ते सातारा जिल्ह्यात आल्यानंतर कळले, असा टोला देखील पवारांनी यावेळी लगावला.
रयतच्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड – रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली. मंगळवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत पवार यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची फेरनिवड करण्यात आल्याचे रयत शिक्षण संस्थेच्या सूत्रांनी सांगितले. संस्थेचे विद्यमान सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांना सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे. आगामी काळात या पदावर माजी सनदी अधिकार्याची नेमणूक केली जाणार असल्याची चर्चा आहे.
COMMENTS